Bookstruck

डॉ. विजय भाटकर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
डॉ. विजय भाटकर

भारतातील संगणक क्रांतीचे अध्वर्यू!

माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. एक कळ (बटण) दाबताक्षणी असंख्य विषयांतील माहितीच्या स्रोतांचे विशाल दालन आपल्यासमोर खुले होते. ही स्वप्नवत वाटणारी कामगिरी, एका भारतीय संगणक तज्ज्ञाने करून दाखविली. ह्या स्वदेशी बनावटीच्या संगणकाचे जनक होते डॉ. विजय भटकर.

डॉ. के. आर. नारायणन् (माजी राष्ट्रपती) यांनी स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांचे सुपर कॉम्प्युटरचे (परमसंगणकाचे) स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी डॉ. भटकर यांचे नाव सुचविले व ते त्यांनी सार्थ करून दाखविले. यातून पुढे ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हांस्ड कॉम्प्युटिंग (सी- डॅक )’ ही संस्था पुणे येथे स्थापन झाली व ‘परम’ या महासंगणकाचा जन्म झाला.

१९४६ मध्ये अकोला जिल्ह्यातील मुरांबा येथे (मूर्तिजापूरजवळ) उच्चशिक्षित आई-वडिलांपोटी डॉ. भाटकर यांचा जन्म झाला. मूर्तिजापूर येथील संत गाडगे महाराजांनी स्थापन केलेल्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या डॉ. भाटकरांनी वयाच्या १८ व्या वर्षी  अभियांत्रिकी पदवी मिळवली. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून एम.टेक. केल्यानंतर ते दिल्लीच्या आय.आय.टी.मध्ये दाखल झाले. वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी त्यांनी डॉक्टरेट मिळवली.

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील ‘केल्ट्रॉन’या संस्थेच्या संचालक पदावर त्यांनी अनेक वर्षे  काम केले. या माध्यमातून कोलकता मेट्रो, महानगरांतील वाहतूक नियंत्रण, संरक्षण विभागासह अनेक शासकीय विभांगासाठी सुरक्षा योजना, वीज केंद्र नियंत्रण अशा अनेक प्रकल्पांच्या संगणकीकरणाचे कार्य त्यांनी केले. ते काही काळ केंद्रीय विज्ञान सल्लागार समितीचे सदस्यही होते. पुढे सी-डॅकच्या माध्यमातून त्यांनी सर्व भारतीय भाषा संगणकामध्ये सहजपणे वापरता येतील अशी ‘संगणकीय बहुभाषिक पद्धत’ विकसित केली.  

विज्ञान व तंत्रज्ञानात रमणारा हा शास्त्रज्ञ भारतीय संस्कृती, वेद-उपनिषदे, संत साहित्य व अध्यात्मविचार यांच्यातही रस घेणारा आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी यातायात कमी व्हावी, या विचाराने त्यांनी सी-डॅक मधून मुक्त होऊन ‘एज्युकेशन टु होम’ (ETH) या प्रकल्पाला वाहून घेतले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जबाबदार्‍या सांभाळताना त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. केंद्र शासनाने त्यांना पद्मश्रीनेगौरविले, तर महाराष्ट्र शासनाने त्यांना  ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित बहुमान केला. ७० हून अधिक शोधनिबंध व आठ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

संत गाडगे महाराजांचा आदर्श समोर ठेवून विज्ञान व अध्यात्माची सांगड घालीत ते कार्यरत आहेत. संपूर्ण देशातील तीर्थक्षेत्रे ‘ज्ञानतीर्थक्षेत्रे’ व्हावीत यासाठी आळंदीपासून त्या स्वरूपाचे काम त्यांनी सुरू केले आहे. युरोपिअन संस्कृतीचा अभ्यास करणारे, तसेच आध्यात्मिक अनुभूतीसाठी ध्यानधारणा करणारे व आजही सक्षमतेने कार्यरत असलेले डॉ. विजय भाटकर भारतीय युवकांचे आदर्श ठरलेले आहेत.

« PreviousChapter ListNext »