Bookstruck

लता मंगेशकर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
लता मंगेशकर

कलेवरील दृढ निष्ठा, अपूर्व भक्ती, अखंड साधना यांच्या साहाय्याने भारतीय संस्कृतीचे प्रतीक ठरणारा विशुद्ध, अनाहत स्वर साकार करणार्‍या  सर्वश्रेष्ठ गायिका!

 

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर म्हणजे चित्रपट पार्श्र्वगायन क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राज्ञी. त्यांची थोरवी व त्यांचे चित्रपट पार्श्र्वगायनातील योगदान याचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडावे इतके त्यांचे कार्य व त्यांचा लौकिक मोठा आहे. लता मंगेशकर यांच्या प्रमुख उल्लेखाशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचं, संगीत क्षेत्राचं वर्णन पूर्ण होणारच नाही. नुसत्याच महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण भारत देशाला ललामभूत असणार्‍या आणि भारताचं नाव जगातील संगीत क्षेत्रात सतत उच्चस्थानावर ठेवणार्‍या एकमेवाद्वितीय कलावंत म्हणजे लता मंगेशकर; सर्व भारतीयांच्या लतादीदी!

१९२९ मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शुद्धमती उर्फ माई मंगेशकर यांच्या पोटी लतादीदींचा जन्म झाला. पाच भावंडांत सर्वात मोठ्या म्हणून त्यांची सर्व भावंडे त्यांना लतादीदी किंवा ‘दीदी’ असेच म्हणतात. तेच नाव इतर निकटवर्तीयही प्रेमाने घेतात. मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी संगीत नाट्यक्षेत्रातील एक गाजलेले, दिग्गज गायक. याच श्रेष्ठ पित्याचा वारसा त्यांच्या पाचही अपत्यांना म्हणजेच लता, आशा, मीना, उषा व हृदयनाथ यांना अगदी भरभरून मिळाला. ही सर्व भावंडे संगीताची सेवा-आराधना आयुष्यभर करत आली आहेत व आपल्या कर्तृत्वाने त्यांनी आपला स्वरगंध भारतातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडेही पसरवला आहे. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हेच त्यांचे पहिले गुरूही. सुरुवातीला दीदींनी काही काळ वडिलांकडूनच संगीताचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खान, पं. अमान अली खान (भेंडीबाजारवाले), उस्ताद अमानत खान आणि काही काळ पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.

दिनांक १६ डिसेंबर, १९४१ रोजी पहिले गाणे आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले. १९४२ साली लतादीदींनी चित्रपटासाठी पहिले गाणे गायले आणि नंतरचे सुमारे अर्धशतक त्या गातच राहिल्या. आजही त्या एखाद-दुसरे गीत गातात, एखाद्या ध्वनिमुद्रिमेच्या माध्यमातून आपला ‘अभिजात’ सूर ऐकवून रसिकांना आनंद देतात. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे वयाच्या १३ व्या वर्षीच पूर्ण कुटुंबाच्या लालनपालनाची जबाबदारी त्यांच्या कोमल खांद्यावर येऊन पडली. प्रथम अर्थार्जनासाठी म्हणून त्या चित्रपट पार्श्र्वगायनाकडे वळल्या. त्यांना सुरुवातीची काही वर्षे अतिशय शारीरिक, मानसिक व भावनिक हालअपेष्टांमध्ये काढावी लागली.

पार्श्वगायक व पार्श्वगायिका यांना त्या काळात ‘रॉयल्टी’ तर सोडाच पण मानधनही धड मिळत नसे. पण या परिस्थितीशी झगडत, नेटाने प्रयत्न करत लतादीदींनी या क्षेत्रात त्यांची मार्गक्रमणा सातत्याने आणि धैर्याने केली. पार्श्वगायकाचा वा गायिकेचा उल्लेखही चित्रपटाच्या नामोल्लेखात त्या वेळी केला जात नसे. केवळ मुख्य नायिकेला श्रेयनामावलीत स्थान असे. लतादीदींनी आपल्या कलेद्वारे व आपल्या खंबीर भूमिकेद्वारे ही पद्धत बदलून नामोल्लेखात पार्श्वगायक व गायिकेच्या नावाचा उल्लेख करण्याचा पायंडा पाडला. याचं श्रेय पूर्ण चित्रपट सृष्टी लतादीदींनाच देते.

लतादीदिंनी जवळ जवळ पावणे दोनशे संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर काम केले असून, सुमारे २३ भाषांमध्ये हजारो गाणी गायलेली आहेत. सी. रामचंद्र, सलील चौधरी, नौशाद, मदनमोहन, सचिनदेव बर्मन, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम, पंचमदा (राहूल देव बर्मन), दत्ता डावजेकर, सुधीर फडके,  श्रीनिवास खळे व पं. हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या स्वररचनांना लतादीदींचा स्वर्गीय स्वर लाभल्यामुळे अजरामर गाणी निर्माण झाली.

संत तुकारामांच्या अभंगगाथेतील अभंग, संत ज्ञानेश्र्वरांचे अभंग, विराण्या;  लावण्या, बालगीत, अंगाईगीत, देशभक्तीपर गीत, धृपद,  कव्वाली, रवींद्र संगीत; शांता शेळके, पी. सावळराम, मंगेश पाडगावकर, कवी कुसुमाग्रज, ग्रेस अशा दिग्गज कवींच्या रचना; गालिबच्या उर्दूतील गझल - हे सगळेच गानप्रकार लतादीदींच्या आवाजाने लीलया पेलले, इतकेच नव्हे तर सर्व गाणी अमृतमय झाली.

हिंदी चित्रपटांत पार्श्र्वगायन, मराठी चित्रपटगीते व मराठी भावगीते-भक्तिगीते या प्रमुख क्षेत्रांमध्ये दीदींनी संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या अविश्वसनीय, अद्वितीय असे योगदान दिले आहे. हिंदी चित्रपटांत सलील चौधरी, खेमचंद्र प्रकाश, नौशाद यांच्यापासून  ते ए. आर. रहमान यांच्यापर्यंतच्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. हिंदी व मराठीमध्ये त्यांनी प्रामुख्याने मोहम्मद रफी, किशोर कुमार, हेमंतकुमार, मन्ना डे, मुकेश, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुधीर फडके, पं. हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर या दिग्गज गायक-गायिकांसह युगुलगीते गायली आहेत. लतादीदींनी ‘आनंदघन’ या नावाने ५ मराठी चित्रपटांना उत्कृष्ट संगीतही दिले आहे. या महान गायिकेने हजारो गाणी गायली आहेत, त्यातील अक्षरश: शेकडो ‘सार्वकालिक सर्वश्रेष्ठ’ आहेत. त्यांचे ‘मालवून टाक दीप’ श्रेष्ठ की ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ श्रेष्ठ यावर लिहिण्यासाठी समीक्षकांच्या लेखण्या सरसावतात. त्यांचं ‘आएगा आनेवाला’ श्रेष्ठ की ‘रसिक बलमा’ त्याहून श्रेष्ठ अशा रसिकांच्या चर्चा आजही रंगतात. ध्वनिमुद्रणाच्या ठिकाणी किंवा रंगमंचावरून गाताना नेहमी अनवाणी होऊनच सादरीकरण करणार्‍या या सरस्वतीच्या सच्च्या उपासक! यांच्या हिंदी-मराठी गीतांची, त्यांच्या सहकलाकारांची (संगीतकार, गीतकार, सहगायक, सहवादक, ज्यांना आवाज दिला, त्या अभिनेत्री) केवळ यादी करणे - हा देखील एक मोठा अभ्यासाचा, संशोधनाचा विषय आहे. खरे तर त्यांच्या एका-एका गीतावर रसिक आयुष्य ओवाळून टाकतात. पण त्यातही त्यांनी गायलेली श्रीगणपतीची आरती; त्यांनी सुरांच्या साहाय्याने मागितलेले ‘पसायदान’, शिवरायांची सावरकरकृत आरती पुढच्या अनेक मराठी पिढ्या ऐकणार आहेत, आणि त्यांचे ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत ऐकून हजार वर्षानंतरचा भारतीय माणूसही भारावून जाणार आहे हे निश्चित!

लता मंगेशकर हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती भारतात आढळणं  कठीण आहे. पूर्ण जगभर लतादीदींचे असंख्यचाहते आहेत.लंडन येथील रॉयल अॅल्बर्ट हॉल येथे गाणारी आशिया खंडातील पहिली गायिका असा त्यांचा मान आहे. एकामागोमाग एक असे तीन कार्यक्रम त्याच सभागृहात ‘हाऊस फुल्ल’ गर्दीत यशस्वी करणार्‍या त्या पहिल्या कलावंत आहेत.

लतादीदींना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीसाठी, प्रामुख्याने पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी ‘भारतरत्न’हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करण्यात आला. तसंच त्यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारही देण्यात आला. महाराष्ट्र शासनानेही राज्य स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार - ‘महाराष्ट्र भूषण’ - देऊन दीदींचा गौरव केला. त्यांना त्यांच्या संगीतातील कामगिरीबद्दल अनेक मान सन्मान व पदव्या मिळाल्या आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाची मानद डी. लिट् ही पदवी, खैरागड संगीत विद्यालय, हैद्राबाद विश्वविद्यालयातर्फे डॉक्टरेट, बालाजी मंदिर ट्रस्ट (तिरुपती) येथील ‘विद्वान’ किताब, संकेश्वर येथील शंकराचार्यांकडून ‘स्वरभारती’ हा किताब, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण - अशी असंख्य पुरस्करांची मोठी सूची करता येईल. या जाहीर मानसन्मान आणि पदव्या-पुरस्कारांबरोबरच त्यांचे असंख्य चाहते आणि श्रोते त्यांना ‘स्वरसम्राज्ञी’, ‘गानकोकिळा’, ‘गानसम्राज्ञी’ या अशा उत्स्फूर्त पदव्यांनी संबोधतात. ’Indian Nightingle’  हा किताबही त्यांना देण्यात आला आहे. या अशा एक ना अनेक पुरस्कारांनी मंडित लतादीदी एकप्रकारे आख्यायिकाच बनून गेल्या आहेत.

लतादीदींना पार्श्वगायनासाठी चार वेळा ‘फिल्मफेअर अँवॉर्ड मिळाले आहे. १९६९ नंतर नवीन कलाकारांना संधी मिळावी म्हणून त्यांनी हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्या काळात जेव्हा हा एक पुरस्कार मिळणं हे अतिशय प्रतिष्ठेचे समजले जायचे, अशा वेळेला नवीन कलाकारांना संधी मिळण्यासाठी आपला मान बाजूला ठेवण्याची ही लतादीदींची कृती खरोखरच त्यांच्या शालीनतेची ग्वाही देते. दैवी गळ्याबरोबर विशाल मनही लतादीदींकडे आहे याचंच हे द्योतक आहे. त्यांना असंख्य पुरस्कार तर प्राप्त झालेच आहेत, शिवाय त्यांच्या नावाने श्रेष्ठ कलाकारांना पुरस्कारही देण्यात येतात. महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासनातर्फे त्यांच्या नावाने संगीत क्षेत्रात अतुलनीय कार्य करणार्‍या कलाकाराला पुरस्कार दिला जातो.

इतके मानसन्मान, ऐश्वर्य यांच्यासह सतत प्रसिद्धीच्या झोतात असूनसुद्धा स्वत: लतादीदी अत्यंत साध्या आहेत. त्या अत्यंत साधेपणाने राहतात. स्वच्छ परिटघडीची पांढरी साडी, दोन लांब वेण्या, दोन्ही खांद्यावरून पूर्ण अंगभर घेतलेला पदर, विनम्र नाजूक बोलणं, निरागस हास्य (आणि ऐश्वर्याची एकच खूण म्हणून की काय कानातल्या हिर्‍यांच्या कुड्या) असं लतादीदींचं शालीन व्यक्तिमत्त्व पाहिलं की पूर्ण भारतीय शील, संयम, सौंदर्य आणि संस्कृती यांचं चालतंबोलतं प्रतीक म्हणजे लतादीदी,असं प्रतिबिंब प्रत्येकाच्याच मनात उमटतं.

लतादीदी अतिशय संवेदनशील आहेत. मुक्या प्राण्यांवर त्यांचं निरातिशय प्रेम आहे. लतादीदी कमालीच्या ईश्वरभक्त आहेत. त्या मुंबईत त्यांच्या ‘प्रभूकुंज’ या घरी असोत किंवा देशा-विदेशात असोत, त्यांच्या पूजाअर्चा, व्रतवैकल्यात कधीही खंड पडत नाही. त्या ‘आपल्या’ माणसांना खूप जपतात आणि त्यांची प्रेमळपणाने काळजी घेतात. आपल्याबरोबरच्या अगदी ज्युनियर कलावंतांची सुद्धा अगदी घरच्या नातेवाईकासारखी काळजी वाहतात आणि त्यांना बरोबरीची वागणूक देतात. परदेशात त्यांच्याबरोबर दौरा करणार्‍या कलावंतांच्या जणू त्या आईच असतात. इतक्या उंचीवर पोहोचल्यावरदेखील त्या विनम्रशील आहेत. संगीत दिग्दर्शक अनुभवी असो वा नवखा पण त्या एका विद्यार्थ्याच्या भावनेनेच त्या संगीतकाराकडे गाणं शिकतात आणि परिपूर्णतेच्या ध्यासापायी कार्यक्रमापूर्वी किंवा ध्वनिमुद्रणापूर्वी अनेक वेळा गाण्याची तालीम करतात.

लतादीदींना छायाचित्रणाचा विलक्षण छंद आहे. त्या स्वत: उत्तम फोटोग्राफी करतात. वाचन हा लतादीदींचा दुसरा आवडीचा छंद आहे. लतादीदींना क्रिकेटमध्येही खूप रस आहे. जेव्हा शक्य असेल, तेव्हा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी त्या स्टेडियमवरही जातात. १९८३ साली तर त्यांनी विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी विशेष कार्यक्रम सादर केला होता. क्रिकेट पंढरी लॉर्डस् स्टेडियमवर त्यांच्यासाठी एक खास कक्ष कायमस्वरूपी आरक्षित करण्यात आलेला आहे.

राष्ट्रभक्ती व सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. कोणाला आर्थिक मदत सढळ हाताने करणे असो किंवा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलचे बांधकाम व व्यवस्थापन असो लतादीदींनी अशा अनेक समाजोपयोगी कार्यांना फार गाजावाजा न करता खूप मदत केली आहे. श्रीकृष्ण, मंगेशी, संत ज्ञानेश्र्वर, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर ही त्यांची श्रद्धा स्थाने आहेत. लतादीदी या प्रखर राष्ट्रभक्त आहेत. युद्धाच्या काळात जवानांच्या मनोरंजनासाठी व निधी उभारणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामाच्या निधी संकलनासाठी कार्यक्रम, बाबा आमटेंच्या कार्याला सहकार्य, गुजरात भूकंपासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींच्यावेळी आर्थिक मदत अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

पूर्ण जगात मंगेशकर घराण्याचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव दुमदुमत ठेवणार्‍या या महाराष्ट्रकन्येविषयी जेवढं लिहावं; या मराठी कन्येची थोरवी जितकी गावी, तितकी थोडीच आहे. म्हणून त्यांच्याविषयी एकच म्हणावसे वाटते -

दिव्यात्वाची जेथे प्रचिती। तेथे कर माझे जुळती।।

« PreviousChapter ListNext »