Bookstruck

व्यासांची संहिता

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महाभारतकार व्यास महर्षींची प्रतिभा अलौकिक आहे. जन्मतःच ते मातेजवळ न राहता पराशर मुनींबरोबर गेले व तेथेच वाढले. तेथे वेद, शास्त्रे व अनेक विद्यांत पारंगत झाले. त्यांनी दीर्घ असे खडतर तप केले. त्यांना तपोबलाने दिव्यशक्‍ती प्राप्त झाल्या होत्या. अंतर्ज्ञानाने सर्व जाणून ते योग्य प्रसंगी प्रकट होत व कौरवपांडवांना उपदेश करीत. बली, कृप इत्यादी जे सात चिरंजीव या जगात आहेत त्यापैकी कृष्णद्वैपायन व्यास एक होत ! परंपरेने त्यांना जरी चिरंजीव मानलेले असले तरी महाभारतासारख्या अप्रतीम ग्रंथाची त्या काळात रचना करुन ते अमर झाले आहेत. त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभाशक्‍तीने महाभारतातून नीतिमत्तेचा उच्च आदर्श समाजमनापुढे ठेवला आहे.

व्यासांची संहिता

वर्णिती भारतयुद्ध महान

मुनिवर लोकोत्तर आख्यान ॥धृ॥

अग्रगण्य हा ऋषी तपोधन

पाराशर करी वेद-विभाजन

महाकाव्य हे रचि द्वैपायन

जयाचे स्वर्गी होई गान ॥१॥

जे जे येथे जगती ते ते

जे नच ग्रंथी कुठेच ना ते

चित्रित केले सर्व युगाते

संहिता नीतीचे गुणगान ॥२॥

वर्णन केले पुरुषार्थांचे

धर्मतत्त्व, जीवनमूल्यांचे

पांडुसुतांच्या सुखदुःखांचे

नसे या काव्याला उपमान ॥३॥

ला म्हणती वेद पाचवा

ह्याच्या छायी मिळे विसावा

ज्ञानदीप हा असे मानवा

दावि जो परमसुखाचे स्थान ॥४॥

उपनिषदांचे विचारसौष्ठव

वनातल्या दुःखांचे वास्तव

इथे पहावे रणिचे तांडव

भासते आदर्शांची खाण ॥५॥

व्यासांची ’जय’ मूळ संहिता

वैशंपायन करी ’भारता’

लक्ष एक विस्तारित गाथा

निर्मितो सौती तो मतिमान ॥६॥

भारत आणि वेदसंहिता

या दोहोंची तुलना होता

अर्थ, आशया याच्या बघता

अर्पिले यासी वरचे स्थान ॥७॥

इथे असे कृष्णाची गीता

आत्मबोध जी देई जगता

मधुर अमृताहुनिही चित्ता

सर्वही विद्यांचे जणु प्राण ॥८॥

तेजामध्ये जसा दिनमणी

काव्यजगी हे तसे अग्रणी

दिव्य अशी व्यासांची वाणी

साधते मनुजाचे कल्याण ॥९॥

« PreviousChapter ListNext »