Bookstruck

बकासुरवध

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकचक्रा नगरीतील ब्राह्मणाने जेव्हा असा निर्णय घेतला की तो स्वतः बकासुराला स्वतःची आहुती देणार तेव्हा त्याच्या घरातील कोलाहल कुंतीने ऐकला. ब्राह्मणाशी संभाषण केले व आपल्या पाच पुत्रांपैकी एक पुत्र त्याच्याजागी द्यायला ती तयार झाली. पण ब्राह्मणाला आपल्याकडच्या ब्राह्मण अतिथीला असे पाठवणे म्हणजे पाप करण्यासारखे वाटले. स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी स्वार्थबुद्धीने आपण आपल्या अतिथीचा बळी देणार नाही असे त्याने निक्षून सांगितले. आपल्यासाठी होणार्‍या ब्रह्मवधापेक्षा आपला स्वतःचा आत्मवध त्याला श्रेयस्कर वाटतो. शेवटी कुंती त्याला नीट समजावून सांगते की तिचा पुत्र मंत्रसिद्धी जाणणारा असल्याने राक्षस त्याला मारु शकणार नाही. त्यानंतर ब्राह्मण कुंतीला अनुमती देतो.

बकासुरवध

कुंती--

"जाऊ नको विप्रवरा धाडिन मी पुत्राला

बाहूबल अधिक त्यास मारिल त्या निशाचरा ॥धृ॥

रोक एक माणसास नगरातुन पाठविती

गाडाभर अन्न पुन्हा क्रूराला त्या देती

येता क्रम अता तुझा चिंता ती सर्व घरा ॥१॥

तुमचे ते करुण बोल ऐकलेत मी सगळे

बलिदाना सिद्ध जणू तुझ्या सर्व घरातले

खरोखरी संकट हे वेढितसे या नगरा ॥२॥

विप्रा तू शोक सोड मी करिते साह्य तुला

देऊ नको बळी तुझा निष्कारण अधमाला

सुचला मजसी उपाय स्मरुन तुझ्या उपकारा ॥३॥

वनी वनी फिरताना आलो या नगराला

अबलेला पुत्रासह आश्रय रे तूच दिला

छत्र तुझे राहू दे दुःखी या परिवारा ॥४॥

पाचातिल एक पुत्र देते मी तुजसाठी

माझ्या त्या पुत्राला सांभाळिल जगजेठी

उपकारा जो स्मरतो मानव रे तोच खरा ॥५॥

ब्राह्मण---

"वंदनास योग्य असे पुत्र गे तुझे गुणी

अतिथी ते स्नेहशील सत्त्वशील आचरणी

पाठवु तव सुता कसे देत ज्यास आसरा ? ॥६॥

हा माझा धर्म नसे पाठविणे अतिथीला

दानव तो ठार करिल निरपराध विप्राला

पातकीच मी ठरेन माते हे जाण जरा" ॥७॥

कुंती--

"हत्तीचे बळ माझ्या आहे रे पुत्राला

करिल युद्ध असुराशी, चिंता ती नको तुला

मंत्रांची सिद्धीही आहे त्या वीराला ॥८॥

राक्षसास भिऊन दूर गेला रे नृप तुमचा

शूर इथे नसे कुणी रक्षक जो सर्वांचा

रक्षिल तो नगराला सुत माझा शूर खरा ॥९॥

« PreviousChapter ListNext »