Bookstruck

अनुद्यूत आणि वनवास

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रथम द्यूत संपल्यावर धृतराष्ट्राने द्रौपदीला तीन वर दिले व पांडवांनी द्यूतात जे जे गमावले होते ते ते सर्व त्यांना परत मिळाले. ते आपल्या इंद्रप्रस्थ राजधानीला जाण्यास निघाले. इकडे दुर्योधन, दुःशासन, शकुनी इत्यादी एकत्र जमून चिंताकुल होऊन विचार करु लागले. पांडव आपला घोर अपमान व द्रौपदीची अवहेलना विसरणार नाहीत; ते गेल्याबरोबर युद्धाची तयारी करुन त्वरित आपल्यावर हल्ला चढवतील. अशी तीव्र भीती दुर्योधनाला वाटल्याने त्याने पुन्हा दुसरे द्यूत खेळण्याचा घाट घातला. पांडव परतीच्या प्रवासातच होते आणि युधिष्ठिराला पुन्हा धृतराष्ट्राचा निरोप आला की त्याने द्यूत खेळण्यासाठी हस्तिनापुरास परत यावे. नियतीपुढे सर्वांना शरण जावे लागते असे उद्‌गार काढून युधिष्ठिर परत फिरला. दुसरे द्यूत खरोखर भीषण झाले. बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगण्याच्या अटीवर डाव खेळला गेला. युधिष्ठिराचा पराजय जणू काही ठरलेलाच होता.

अनुद्यूत आणि वनवास

पांडवनेत्रांमधल्या ज्वाळा क्रोधाच्या पाहिल्या

सुयोधनाच्या मनी अचानक भयलहरी दाटल्या ॥१॥

सर्प विषारी सारे पांडव सुयोधना भासले

डंख कराया येतिल परतुन शस्त्र घेतलेले ॥२॥

वनवासाचा पन लावुनिया द्यूत करावे पुन्हा

बृहस्पतीची नीती जाणुन आखावी योजना ॥३॥

धृतराष्ट्राची घेइ सुयोधन द्यूताला संमती

दूत पाठवून युधिष्ठिराला आमंत्रण देती ॥४॥

शकुनी बोले --- "हे सम्राटा, एकच पण हा खास

हरतिल जे ते बारा वर्षे सोसतील वनवास ॥५॥

वर्ष एक आणखी काढतिल राहुनिया अज्ञात

ओळखले जर गेले तेव्हा, जातिल पुन्हा वनात" ॥६॥

जाणुन नियती धर्म खेळतो टाकुनिया निःश्वास

फासे कसले ? ते तर होते काळाचे जणु पाश ॥७॥

डाव टाकता श्वास रोखुनी स्तब्ध सभा जाहली

डाव जिंकता सुबलसुताने विजयघोषणा दिली ॥८॥

विषण्ण पांडव क्षणात एका हरला सर्वस्वास

नियतीने जणु पूर्ण आवळला गळ्याभोवती फास ॥९॥

अजिने नेसुन निरोप घेती पांडव जाण्या वनी ।

सोडुन वैभव निघे द्रौपदी वाट भिजे अश्रुनी ॥१०॥

दुष्ट सुयोधन हिणवी त्यांना अभद्र ते बोलुनी

आनंदाच्या भरात नाचे, राज्यविहिन पाहुनी ॥११॥

दिन सौख्याचा संपुन गेला दृष्टिपुढे अंधार

कुणि न कल्पिले मुळी न राहिल युधिष्ठिरा आधार ॥१२॥

झेलित होते राजे ज्यांचे शब्द आपुल्या शिरी

वनी हिंडता शब्द तयांचे विरतिल पर्णान्तरी ॥१३॥

पांडुसुता कवटाळुन कुंती धाय मोकलुन रडे

असे कसे हे उलटे फिरले धर्माचे पारडे ? ॥१४॥

« PreviousChapter ListNext »