Bookstruck

अभिमन्यु प्रताप

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भीष्मांनंतर द्रोण सेनापती झाले. दुर्योधनाने द्रोणांना विनंती केली की त्यांनी युधिष्ठिराला जिवंत पकडून आणावे. त्यामागील गुप्त हेतू हा होता की त्याला पुन्हा द्यूतात अडकवायचे व बारा वर्षांसाठी वनवासात पाठवायचे. अर्जुन सतत युधिष्ठिराचे रक्षण करीत असल्याने हे साध्य झाले नाही. द्रोण पाच दिवस सेनापती राहिले. त्यातल्या तिसर्‍या दिवशी अभिमन्यूचा वध झाला. चवथ्या दिवशी अर्जुनाने जयद्रधवधाची प्रतिज्ञा पूर्ण करुन त्यास मारिले. चवथ्या दिवशी रात्रीही युद्ध सुरु राहिले. त्या रात्री घटोत्कचवध कर्णाने केला. इंद्रदत्त शक्‍तीचा कर्णाला वापर करावा लागला. ती शक्‍ती वापरल्याने कृष्णास आनंद झाला. कारण आता कर्णवध शक्य होता. पाचव्या दिवशी द्रोणांचे निधन झाले. तिसर्‍या दिवशी रचलेला चक्रव्यूह फार कठीण होता. त्याचा भेद करु शकेल असा फक्‍त अभिमन्यू होता. त्याला परत येण्याचे मात्र माहीत नव्हते. त्याच्यावर हा भार धर्माने टाकला. अभिमन्यूने भेद केला व तो आत गेला. अभिमन्यूच्या मागे असलेल्या पांडवांकडील रथींना जयद्रथाने रोखून धरले म्हणून अभिमन्यू संकटात सापडला. कर्ण, द्रोणांनाही अभिमन्यूचे असामान्य शौर्य दिसले. पण शेवटी सहा महारथींनी त्याला घेरले व घनघोर युद्ध झाले. अभिमन्यूने त्यांच्याशी एकटयाने लढा दिला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. पण शेवटी तो धारातीर्थी पडला.

अभिमन्युप्रताप

भासला, शौर्याचा अवतार ॥धृ॥

चक्रव्युहाची होती रचना

व्यूह फोडणे ज्ञात न कोणा

चिंता घेरी पांडवधुरिणा

कोण रे फोडिल ह्याचे दार ? ॥१॥

धर्म बोलवी सुभद्रासुता

व्यूहाविषयी तोच जाणता

भेद व्युहाचा त्यास सोपता

वाटला संकटात आधार ॥२॥

अभिमन्यूचा प्रताप आगळा

फोडुन जाऊ शके व्युहाला

परतायाचे ज्ञान न त्याला

घेतला कार्याचा तरि भार ॥३॥

व्यूह भेदुनी जाई पुढती

जाउ न शकले रथी मागुती

सिंधुपती ना देई वाट ती

करोनी शस्त्रांचा भडिमार ॥४॥

रणात भिडला त्या दुर्योधन

द्रोण नृपाचे करिती रक्षण

परी पराभव झाला दारुण

पाहती त्याचे शौर्य अपार ॥५॥

कर्ण येइ चालून वायुसम

दिसे वीर त्या जणु सूर्यासम

वनगज देती झुंजच अंतिम

घेतसे कर्ण थकुन माघार ॥६॥

सैनिक आले, क्षणी निमाले

शलभ जणू ज्योतीवर पडले

अश्व, शस्त्र, नर रणि विखुरले

मारला दुःशासन-सुत ठार ॥७॥

शिरु न शकले पांडव व्यूही

लढे एकटा रिपुशी तोही

झाकि दिशा बाणांनी दाही

शरांना जणु वज्राची धार ॥८॥

चालुन आला तो दुःशासन

केले त्याचे भीषण कंदन

नेति तयासी दूर रथातुन

वीर ते घेत अशी माघार ॥९॥

घेरति युवका सहा अतिरथी

सोडुन नियमा वार्‍यावरती

सहा श्वापदे गजा रोधिती

करी तो चहूदिशांनी वार ॥१०॥

सहा रथींनी केला मारा

शस्त्ररथाविण लढू लागला

अंति गदेचा प्रहार बसला

भूवरी, पडला वीर कुमार ॥११॥

शवाभोवती कुरु नाचले

परी मनातुन स्तंभित झाले

असे तेज रणि कधि न पाहिले

पांडवा, दिसे परी अंधार ॥१२॥

« PreviousChapter ListNext »