Bookstruck

अश्वत्थाम्याचा कट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दुर्योधनाचे निधन झाले तेव्हा त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली व गंधर्वांची वाद्ये ऐकू आली. दुर्योधनाने त्यांच्यावर केलेली खरमरीत टीका ऐकून पांडव विचारमग्न झाले, त्यांना अपराध्यासारखे वाटू लागले. महाभारतात धर्म व अधर्म यावर बरीच चर्चा असून सूक्ष्मधर्माचा विचार मांडला आहे. सत्य बोलणे हा धर्म खरा पण एखाद्या प्रसंगी आपल्या सत्य बोलण्याने जर हजारो माणसांची हत्या होणार असेल तर अशा वेळी खरे बोलणे पातक ठरते. सर्व प्राणिमात्रांच्या जे हिताचे असते तेच सत्य होय. कृष्णाने पांडवांना हेच सांगितले की या चार रथींना असे विविध उपाय योजून मारावेच लागले. त्यानेच पृथ्वीवरची दुष्ट प्रवृत्ती नष्ट झाली व धर्मप्रवृत्तीचे रक्षण झाले. हे ऐकल्यावर पांडवांचे समाधान झाले पण त्यांना गांधारी शाप देईल की काय याची भीती वाटू लागलि. म्हणून कृष्ण तिचे सांत्वन करण्याकरिता नगरात गेला व पांडव त्या रात्री नदीतीरावर राहिले. इकडे अश्वत्थामा, कृतवर्मा व कृपाचार्य हे घायाळ दुर्योधनाला भेटले. दुर्योधनाची अवस्था पाहून त्यांना फार दुःख झाले. अश्वत्थाम्याने सूड घेण्याचा निर्धार केला. दुर्योधनाने त्याला त्याक्षणी सेनापतीपद दिले. हे तिघे रथी त्या रात्री पांडवशिबिरात गेले व त्यांनी पांडवांकडील झोपलेल्या वीरांची, राजांची, धृष्टद्युम्नासहित द्रौपदीपुत्रांची निर्दयपणे हत्या केली; सर्व शिबीर पेटवून दिले. महायुद्धाचा शेवट हा असा भयानक झाला.

अश्वत्थाम्याचा कट

रात्र ही राक्षसीच ठरणार

करिन मी शिबिरी नरसंहार ॥धृ॥

बघवेना मज राजा विव्हळ

पडे एकटा वनी भूमिवर

किती पातके करिल वृकोदर

घात अह नाही मी सहणार ॥१॥

धर्म डावलुन रथी मारिले

शस्त्रविहिन कर्णासी वधिले

भीष्मांनाही रणी फसविले

अशांचा सूड आज घेणार ॥२॥

उत्तम विद्या विप्राचा गुण

प्रताप मोठा क्षत्रिय-लक्षण

पित्याप्रमाणे क्षत्रिय मी पण

शत्रुचा खुपतो हा जयकार ॥३॥

धर्मच माझा शौर्य दाविणे

शक्य न कोणा मला आवरणे

रिपू तोडिती नीतिबंधने

कशाला करु मी धर्मविचार ? ॥४॥

संतापाची आग अंतरी

उसळे क्रोधित सागरापरि

जिवंत पांडूपुत्र जोवरी

तोवरी नाही ती शमणार ॥५॥

क्षत्रवृत्तिचा मी अभिमानी

अस्त्रनिपुण हे हात असोनी

पाहि द्रोणवध या डोळ्यांनी

कसे मी मुख दावू शकणार ? ॥६॥

नृपे मला केले सेनानी

उपकाराते त्याच्या स्मरुनी

निर्दयतेने मारिल द्रौणी

एकही सुटेल ना पाञ्चाल ॥७॥

नराधमा त्या धृष्टद्युम्ना

ज्याने वधिले द्रोणगुरुंना

स्वस्थ रथी बसले असतांना

मारतो घालुन भीषण वार ॥८॥

कृपाचार्य कृतवर्म्या ऐका

माझ्यासोबत पाउल टाका

पहा आज अग्नीचा भडका

छावणी नाहि उद्या दिसणार ॥९॥

अंधाराचा आश्रय घेउन

वज्रासम मी खङ्‌ग चालविन

निजलेल्यांची शिरेच उडविन

ढीग तो प्रेतांचा पडणार ॥१०॥

उरि मावेना दुःख पित्याचे

स्मरण सदा घायाळ नृपाचे

करुन कंदन पांडुसुतांचे

फेडतो राजाचा ऋणभार ॥११॥

« PreviousChapter ListNext »