"काय भयंकर उकडतंय...,
एक मिनिटभर ही नकोसं वाटतंय उन्हात बाहेर पडणं,." ऑफिसमधून बाहेर पडता पडता मी बोललो..
नेरूळ विभागातील मानव संसाधन विभागाचे हेडक्लर्क कोळी साहेबांची ह्या महिन्यात रिटायरमेंट असल्याने त्यांनी काही मोजक्या लोकांसाठी जेवणाचा बेत ठेवला होता, तशी त्यांची नि माझी जरी इतकी खास ओळख नसली तरी कर्मचारी संघटनेचा सचिव ह्या नात्याने मलाही खास असे निमंत्रण होते, त्यामुळे आणि बुधवार म्हणजे मस्तच मांसाहारी बेत असणार म्हणून भयंकर ऊन असूनही मित्रासोबत बाईकवर आम्ही नेरूळला निघालो. ऑफिसमधून बाहेर निघताच उन्हाचा तडाखा जाणवायला लागला. इतक्या उन्हात जाण्यापेक्षा नकोच ते जेवण वगैरे असं ही मनात आलं पण पंधरा मिनिटांच्या अंतरासाठी काय कारण देत बसणार, आणि काही सहकाऱ्यांच्याही भेटीगाठी होतील ह्या विचाराने आम्ही ऑफिसमधून निघालो.
भर उन्हातान्हात आम्ही कधी पर्यावरणाच्या, वातावरण बदलाच्या, पृथ्वीच्या तापमानवाढीबद्दल चर्चा करत मोजून २० व्या मिनिटाला नेरूळच्या ऑफिस मध्ये दाखल झालो, जेवणाला छानपैकी मटण भाकरीचा बेत... जेवण आणि पाहुणचार सर्वच अप्रतिम... यथावकाश जेवण उरकलं, नेरूळ मधील मित्रमंडळी भेटली संघटनेचे इतर पदाधिकारी भेटले, काही चर्चा झाल्या, आणि पुन्हा जो तो आपापल्या ऑफिसला जायला निघाला, मस्तपैकी तृप्तीचा ढेकर देऊन आम्हीही निघालो..
पुन्हा निघताना तेच ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वगैरे... थोड्याच वेळात हमरस्ता सोडून सायन-पनवेलच्या महामार्गावर आलो, लाल सिग्नल असल्यामुळे सिग्नलवर थांबलो. थांबल्यावर जरा उन्हाची जास्तच जाणीव होत असल्यामुळे पुन्हा उन्हापासून वाचण्यासाठी काय करायला हवं, रस्त्याच्या दुतर्फा कशी झाडे असायला हवीत, सरकारने ह्या वर्षी किती झाडे लावली ह्याचा विनाकारण रवंथ चालू असताना इकडे तिकडे भिरभिरणाऱ्या नजरेस समोर एक विदारक दृश्य दिसले आणि अंगावर सरकन काटा मारला, पूर्ण अंगप्रत्यांग थरारल्यागत झालं.. पुढची काही सेकंद काय बोलावं नि काय करावं काही म्हणजे काही समजतं नव्हतं, सिग्नल हिरवा झाला, मित्राने गाडीही पळवली पण मी मात्र अडकून पडलो समोर दिसलेल्या त्या दृश्यात..
मला आता ना उन्हाची जाणीव होत होती ना घामाची.
मला गप्पगार झालेला पाहून त्यानेही दोनदा कसला विचार करतो रे, काय झालं म्हणून विचारलं, पण त्याला नक्की काय बोलू नि काय सांगू हे ही मला समजत नव्हते.
समोर एक बारा चौदा वर्षाची मुलगी अंदाजे वर्ष दीड वर्षाच्या निरागस कोकराला कडेवर घेऊन सिग्नलवर भीक मागत होती.
इतक्या रणरणत्या उन्हात, जिथे आपल्याला बाहेर निघावसं वाटत नव्हतं त्या उन्हात त्या मुक्या लेकराचे काय हाल होत असतील????
बापरे!!!!! ऑफिसला पोहोचलो तरी हा प्रश्न काही डोक्यातून जात नव्हता. त्या बाळाच्या विचारानेच कसंतरी होत होतं. तिच्यासोबत असणाऱ्या त्या मोठ्या मुलीला हे जाणवत नसावं का? तिच्या पालकांना हे समजत नसावं का? इतक्या भयंकर उन्हात तो कोवळा जीव अक्षरशः भाजून निघत असेल, मग तरी तिचे पालक इतके निष्ठुर कसे? की त्यांचीही काही मजबुरी असावी? नक्की काय अडचण असावी त्यांची? की ते ही मजबूर असावेत एकवेळच्या भुकेसाठी? आणि त्यामुळेच पोटातील आगेच्या दाहकतेपुढे उन्हाचं काही वाटतं नसेल त्यांना?
ना डोक्यातील प्रश्न थांबत होते, ना त्यांची उत्तर मिळत होती.
स्वतःच्या नाकर्तेपणाचीही चीड येत होती आणि नेमकं काय करायला हवं होतं ह्यांच ही उत्तर मिळत नव्हतं.
एकवेळच्या भीकेने तिचा त्रास काही संपणारा नव्हता, मग नक्की काय करायला हवं होतं किंवा नक्की काय करायला हवं आहे हे ही उमजत नव्हतं. आज दोन दिवस झाले पण ती मुलगी आणि तिच्या कडेवरचं कोकरू अजूनही पिच्छा सोडायला तयार नाहीत.
सत्तर वर्षे होऊन गेली स्वातंत्र्य मिळून..
पण अजूनही आपण प्रत्येक हाताला काम नाही मिळवून देऊ शकलो किंवा अजूनही प्रत्येक तोंडाला निदान एकवेळच्या का होईना पोटभर जेवणाची सोय नाही करू शकलो.
नक्की कोणाचा हा दोष??
आपला? व्यवस्थेचा की सरकारच्या अनास्थेचा?
की त्या लहान मुलीचा? जिला अजून श्वास घेण्याव्यतिरिक्त काहीही माहिती नाही की ती ह्या देशात जन्माला आली त्याचा?
कुठे शोधू आणि कोणाला विचारू ह्याची उत्तरं?
कोण सांगेल मला ह्या प्रश्नांची कायमस्वरूपी उत्तरं?
आज ही दुपारी मी काही कामासाठी ऑफिस मधून बाहेर पडलो होतो पण आज मात्र मला वरून लागणाऱ्या उन्हाची जाणीवच होत नव्हती पण तरीही मनात पेटलेल्या प्रश्नांच्या दाहकतेने मात्र मी आतून बाहेरून होरपळून निघत होतो..
©मनमिलिंद.