Bookstruck

गोड निबंध-भाग १ 25

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पश्चिम खानदेशांतील बॅ. मोरे मागच्या निवडणुकींत नामदेवरावांसाठीं खटपट करीत होते. परन्तु आज त्यांना खरी दृष्टि आली आहे. ते खेड्यांतून सांगत 'मला मतें द्या किंवा देऊं नका. परन्तु कांग्रेसचें कार्य ऐका. कांग्रेसचे विचार सर्वत्र जाऊं दे. कांग्रेसच कल्याण करील.' बॅ. मोरे पूर्वी तसे होते म्हणून का मी त्यांना झिडकारूं ? तें पाप होईल. तो अधर्म होईल. बॅ. मोरे कांग्रेसचा झेंडा घेऊन नाचूं लागतांच मीहि त्यांना डोक्यावर घेऊन नाचलें पाहिजे.

कांग्रेसच्या झेंड्याखालीं येऊन हे का जातिनिष्ठ राहतील ? नसते भेद  माजवतील ? कांग्रेसच्या पवित्र मंदिरांत हे का क्षुद्रपणाचे तमाशे सुरू करतील ? कांग्रेसमातेजवळ येऊन श्री. हरिशेट वाणी का शंभराचे दोनशें लिहून घेत बसतील ? असें करतील तर कांग्रेस का दुबळी आहे ? तिच्या दृष्टिक्षेपांत यांना नमविण्याचें सामर्थ्य आहे.

गायनाच्या मजलसींत अरसिक मनुष्यहि मान डोलवूं लागतो. भजनी मेळयांत नास्तिकहि विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवतो. त्याचप्रमाणें कांग्रेसच्या मेळाव्यांत हे नूतन बंधू आले म्हणजे तेहि तोच तालसूर धरतील, तोच राष्ट्रैक्याचा राष्ट्रहिताचा सूर आळवूं लागतील.

जे पूर्वीपासून कांग्रेसभक्त आहेत ते आहेतच. आपणांस आपला पंथ वाढवावयाचा आहे. नवीन सेवक निर्मावयाचे ओत. त्यांना जवळ घेऊं या. त्यांच्यावर विश्वास टाकूं या. तेहि आणाभाका घेऊन येत आहेत. अशा वेळीं खर्‍या कांग्रेसभक्तानें न रागावतां उलट या नवीन कांग्रेससेवकांचें कौतुक केलें पाहिजे. चला उठा सारे. सर्व कांग्रेस-उमेदवारांना निवडून द्या. हा तो असें म्हणूं नका. आपण सारे एका अमृत-सिंधूंतील बिंदू. एका कांग्रेस संस्थेचे पाईक. बोदवड भागांतील मतदारांनो, श्री. पंढरी पाटील व श्री. संपत पाटील दोघांना निवडून द्या. मी वर सांगितलेली मंगल व निर्मळ दृष्टि घ्या. चाळीसगांव तालुक्यांतील मतदारांनो, तुम्ही तेंच करा. सर्व ठिकाणच्या मतदारांनीं हीच दृष्टि घेऊन उभें राहिलें पाहिजे. हाच खरा मार्ग आहे.
१६ मे, १९३८.

« PreviousChapter ListNext »