Bookstruck

गोड निबंध-भाग १ 42

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

असो. तेव्हां शेतकर्‍या, तूं कोणावरहि विसंबून राहूं नकोस. तुझीच स्वत:ची संघटना कर. आपली काँग्रेस आहे. तिच्या मार्फत न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न कर. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ऑफिसांत खैरात कर. १०।१०, १५।१५ खेड्यांतील शेतकर्‍यांची सभा घेऊन त्या ठिकाणीं जि.काँ.कमिटीच्या अध्यक्षाला बोलवा. ते तुम्हांला मदत केल्याशिवाय राहणार नाहींत. वेळच आली तर ५००-५००, १०००-१००० शेतकर्‍यांचे जथे जि.काँग्रेस कमिटीवर न्या. कां.च्या लोकांना तुमच्या परिस्थितीची जाणीव नाहीं म्हणून तशी जाणीव करून देण्याकरितां ह्या गोष्टी तुम्ही करीत आहांत असें नाहीं. तर सरकारला कळलें पाहिजे कीं आमचीं दु:खें कोणतीं, हें आमचें आम्हांसच आतां कळावयास लागलें आहे. व तीं दु:खें दूर करण्याकरितां काँ.कमिटीच्या वतीनें आम्ही प्रयत्न करीत आहोंत असा तुमच्या जथ्याचा व सभेचा अर्थ आहे. सरकारला सांगा कीं, आज ५।६ वर्षे झालींत; पीक आहे तर भाव नाहीं, भाव आहे तर पीक नाहीं, असें चाललें आहे. एकहि वर्ष शेतकर्‍याला लाभलें नाहीं. हें वर्ष तर अगदींच वाईट आलेलें आहे. घरंदाज शेतकर्‍याला देखील खर्चापेक्षां उत्पन्न कमी आलें आहे. ही परिस्थिती काँग्रेस अधिकार्‍यांच्या मार्फत सरकारच्या कानावर घाला. आणेवारी बरोबर लावली जात आहे कीं नाहीं याबद्दल काँ.अधिकार्‍यांना काळजी घ्यावयास सांगा. आणि शेवटीं म्हणजे कर्जतहकुबी व सारासूट ह्या बाबतींत शक्य तितक्या सवलती जर आम्हांस मिळाल्या नाहींत तर आमचें जिणें अत:पर कठीण आहे असें त्यांना पटवून द्या. स्वस्थ बसूं नका, उठा.
२१ नोव्हेंबर, १९३८.

दिवाळी

बंधुभगिनींनो, दिवाळीचा मंगल आनंददायक सण कालपासून सुरू झाला. आपण गरीब असलों, गुलाम असलों तरी त्यांतहि आनंद निर्माण केला पाहिजे. स्पेनमध्यें भीषण युध्द चाललें असतांहि ते शूर लोक आनंद करतात, क्षणभर दु:ख विसरतात. दु:ख व दारिद्रय यांच्यावर स्वार होणें हाच खरा पुरुषार्थ आहे. दु:खांतहि हंसेन, दु:खांतहि दिवाळी करीन आणि दु:खाची नांगी मोडून टाकीन, असें मनुष्य म्हणतो.

शेतेंभातें पिकलीं आहेत, नद्यांचें पाणी निर्मळ झालें आहे, शरद ऋतु सुरू झाला आहे, तळयांतून कमळें फुललीं आहेत, वादळें थांबलीं आहेत, आकाश निरभ्र आहे, अशा वेळेस आपण हा सुंदर सण योजिला आहे, व्यापारी नवीन वर्षाच्या वह्या घालतात, लक्ष्मीची पूजा होऊं लागते. देशाच्या संसाराचें नवीन पान दिवाळींत उघडायचें असतें.

नवीन वर्ष जणुं सुरू होतें. नवीन संसार, नवीन वर्ष. या वेळेस दिवे लावावयाचे. जीवनांत आशा व प्रकाश आणावयाचा. गोड खावयाचें. मनांत प्रकाश व आनंद; जिभेवर गोड सांजोरी. अशा प्रकारें अंतर्बाह्य आशावंत व मधुर अशा वृत्तीनें नवीन वर्षांसाठीं उभें रहावयाचें.

दिवाळीला नरकासुर मारला अशी कथा आहे. नरकासुर मारल्याशिवाय कोठली दिवाळी ? आपण आधीं नरकासुर मारूं या. नरक म्हणजे घाण. आपल्या समाजांत हा प्रचंड अक्राळ विक्राळ नरकासुर थैमान घालीत आहे. या नरकासुराला मारायला उठा. हा नरकासुर सर्वव्यापी आहे.

आपण रस्त्यावर घाण करतों. केरकचरा फेंकतों. वाटेल तेथें शौचास बसतों. अशा ठिकाणीं लक्ष्मी कशी येईल ? आज गांवांत अवकळा आली आहे. लक्ष्मी गावांत शिरूं पाहते. परंतु ती नाकाला पदर लावते व पुन्हां माघारी जाते. गांव म्हणजे जणुं उकिरडे. गांवांत शिरतांच दोन्ही बाजूंनीं गलिच्छ विष्ठा पडलेली असते. माणसास याची लाज वाटली पाहिजे. भाग्य कसें येईल, लक्ष्मी कशी नांदेल ? लक्ष्मी निर्मळ कमळांतून जन्मास येते. जेथें सुगंधी सुंदर कमळें फुललीं आहेत, म्हणजेच जेथें स्वच्छता आहे तेथें लक्ष्मी जन्मते. ही घाण, हा नरकासुर नाहींसा करा. तरच दिवाळी तुम्हांला समजली असें होईल.

परंतु बाहेरच्या घाणीपेक्षा मनांतील स्वार्थ, दंभ यांची घाण तर फारच भयंकर. सेनापति बापट नेहमीं म्हणतात 'अंतर्बाह्य स्वच्छ व्हा. बाहेरची घाण नाहींशी करा.' आंतील घाण नाहींशी करा. ही आंतरिक घाण या देशांत तर फारच आहे. म्हणून गुलामगिरी कित्येक वर्षें नशिबीं आली.

« PreviousChapter ListNext »