Bookstruck

गोड निबंध-भाग १ 61

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कैदी
ते सत्याग्रहाचे दिवस होते. सत्याग्रहांत कोण भाग घेत होते ? लहान मुलें व तरुण यांची गर्दी होत होती. संसारांत बरबटलेले भाग घेत नव्हते. परन्तु स्वातंत्र्य या मंत्रानें ज्यांचें हृदय उचंबळत होतें. बुध्दि पेटत होती, ते झेंडे हातीं घेऊन, लाठीकाठीस न जुमानतां तुरुंगांत घुसत होते.

त्या तुरुंगांत अधिकारी जुलमी होते. राजकीय कैद्यासहि जेथें तलवारीच्या धारेवर धरण्यांत येई, तेथें चोर डाकू म्हणून आलेल्या कैद्यांची काय स्थिति असेल याची कल्पनाच करणें बरें. रामदासाला त्या कैद्यांची स्थिति पाहून त्वेष येई. परन्तु तो आपला संताप बेताल होऊं देत नसे. रामदास वयानें फार मोठा नव्हता, १७।१८ वर्षांचा होता; परन्तु संयमी होता. विचाराला आपल्याला जीवनांत त्यानें प्राधान्य दिलें होतें.

रहिमू हा जुना कैदी होता. कामांत मोठा हुशार होता. अनेक वेळां कैदी शिक्षा कमी होऊन सुटले. परन्तु रहिमू सुटला नाहीं. त्याला १५ हून अधिक वर्षे झालीं. त्याला घरची हकीकत किती तरी वर्षांत कळली नाहीं. त्याची पत्नी मरण पावली होती. परन्तु लहान मुलगा घरीं होता. त्याचें काय झालें ? रहिमूच्या मनांत येई. आपण सुटूं, आपला मुलगा पाहूं. परन्तु कोठें असेल मुलगा ?

रामदासाला रहिमूबद्दल दया वाटे. रहिमू खिन्न असे. तो कोणाशीं बोलत नसे. तो आपला नमाज किती गंभीरपणें करी ! त्या दिवशीं होता रविवार. कपडे धुण्याचा तो दिवस. सारे कैदी हौदावर कपडे धूत होते. रहिमू कपडे धूत होता. परन्तु त्याचें लक्ष कोठें होतें ? त्याच्या डोळयांतील पाणी त्या कपड्यांवर पडत होतें. रामदासचें लक्ष त्याच्याकडे गेलें. तो रहिमूजवळ गेला व म्हणाला, 'तुमचें कपाळ दुखतें वाटतें ? द्या तुमचे कपडे मी धुवून देतों. साबण लावतों.' रहिमू देईना. तो म्हणाला 'तुम्ही राजकीय कैदी, आम्ही चोर, डाकू आमचे कपडे तुम्ही कां धुवावे ? तुम्ही स्वराज्याचे लोक. तुमची सेवा आम्ही करावी.' रामदास ऐकेना. त्यानें रहिमूच्या कपड्यांस साबण लावून ते धुवून दिले.

रविवारीं गूळ मिळत असे. जे मांस खाणारे असत त्यांना गुळाऐवजीं मांस मिळत असे. रहिमू मांस घेत असे. परन्तु त्यानें मांस खाणें बंद केलें. तो गूळ घेऊं लागला, इतर कैद्यांस आश्चर्य वाटलें. रहिमूं संत होऊं लागला, अवलिया होऊं लागला, अशी ते त्याची थट्टा करीत.

त्या सोमवारीं रहिमू रामदासाला म्हणाला, 'बेटा, हा लाडू घे.' रहिमूनें बाजरीची भाकरी कुस्करून त्यांत गूळ घालून लाडू केला होता. रामदाससाठीं त्यानें तो आणला होता. रामदासनें खाऊन टाकला. तो म्हणाला, 'माझी आई माझ्यासाठीं असाच लाडून ठेवून देई.' रहिमूचे डोळे चमकले. अश्रुबिंदु ! रामदासानें विचारले, 'डोळयांत कां     पाणी ?' रहिमू म्हणाला, 'पुढें केव्हां तरी सांगेन.'

« PreviousChapter ListNext »