Bookstruck

गोड निबंध-भाग १ 69

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके ठिकाणीं फारच रम्य स्थान आढळलें. गार वारा तेथें येत होता. आम्हांला आश्चर्य वाटलें. सर्वांना हांकारे केले. सारे आलों. आम्ही हिंडून हिंडून दमलों होतों. त्या गार वार्‍यानें श्रम गेले. येथेंच कोठून गार वारा असें वाटलें. जरा आणखी पुढें गेलों. तों स्वच्छ आरसपानी दगडाचें मयूरासन आढळलें. किती गुळगुळीत व गार गार. वरच्या बाजूस दोन मोठे कोनाडे होते. पंधे गुरुजी एकांत जाऊन बसले. मीहि त्यांच्या शेजारीं बसलों. एकानें फोटोचें बटन दाबलें. आमचा फोटो निघाला. तेथून जाऊं नये असें वाटे. आमच्या बरोबर बाबाजी होते. ते म्हणाले, या रे या रे तुम्हांला जहागिरी देतों. तुला माळव्याची घे, तुला बुंदेलखंडची घे, मी येथला राजा आहें. तें शहाजहानचें मयूरासन तुच्छ आहे. हें खरें सिंहासन. अम्हांला निघणें भाग होतें. कारण ६४ योगिनींच्या देवळांतील मूर्तीचीं पंधेगुरुजी व त्यांचे शिष्य स्केचिस करणार होते.

आम्हीं निघालों. नर्मदेचा विचार करीत निघालों. नर्मदेनें स्वत:ला बंधनें घालून तपस्या चालविली होती. दोहों बाजूस आरसपानी प्रचंड भिंती होत्या. मधून नर्मदा जात होती. किती वर्षे तिची ही तपस्या चालली आहे, देव जाणें. आम्ही विचार करीत जंगलांतून जात होतों. तो मोटारस्टँडजवळ आलों. योगिनीमातांचें मंदिर पाहावयास निघालों. १०८ पायर्‍या होत्या. वर गेलों. देऊळ किल्ल्याप्रमाणें आहे. मध्यवर्ती देवीच्या अंगणांत सभोंवतीं ६४ योगिनी आहेत. प्रत्येक दोरींत एकेक देवी आहे. कोठें काली, कोठें भैरवी, अशा त्या देवता आहेत. एकच रूप पुन्हां नाहीं. कोठें कमलासनावरची, कोठें सिंहावरची, कोठें वाघावरची, कोठें महिषावरची अशी देवी कोरलेली आहे. गळयांत मुंडमाळा आहेत. वाईट वाटतें कीं, या देवतांचीं तोंडें फोडलेलीं आहेत. वाहनांचीं तोंडें भ्रष्ट झालेलीं आहेत. तरीहि उत्कृष्ट शिल्प तेथें दिसतें. आमचे छोटे मित्र चित्रकार वह्या घेऊन स्केचिस करूं लागले. प्रेक्षक त्यांच्या वह्यांत डोकावत व 'यांना यांतील समजतें. आपणांस काय कळे ?' असें म्हणून निघून जात. एके ठिकाणीं देवीच्या पायाशीं दोन स्त्रिया हातांत वीणा घेऊन बसल्या आहेत असें एक डिझाईन आहे. फारच सुंदर आहे. नागेशनें त्याचें स्केच केलें. दुसर्‍या एका मूर्तीजवळ एक स्त्री पायां पडत आहे असा सुंदर प्रसंग आहे. परंतु हें घाईघाईनें किती पाहणार ? एके ठिकाणीं देवतेचें स्वरूप केवळ अस्थिंचर्ममय असें दाखवलें आहे. ही मरणदेवता असें कोणी सांगितलें. औरंगाबादजवळ जीं लेणीं आहेत, त्यांतील एका लेण्यांत अशाच अस्थिचर्ममय पाषाण मूर्ति खोदलेल्या आहेत. शेवटीं आम्ही निघालों. पंधे गुरुजी व नागेश वगैरे सायंकाळपर्यंत स्केचिस करीत बसणार होते. मी, शंकर, मल्हारी वगैरे सारे निघून पुन्हां कांग्रेस नगरांत आलों. तें आरसमयूरासन आम्ही विसरणार नाहीं, तें नर्मदास्नान विसरणार नाहीं. जीवन स्वच्छ होण्यासाठीं निर्मळ अशीं पवित्र भक्कम बंधनें घालून घ्यावीं, स्वत:ला संयमावर घांसून, कर्वतून घ्यावें, असा नर्मदेचा संदेशहि विसरणार नाहीं.
३ एप्रिल, १९३९.

« PreviousChapter ListNext »