Bookstruck

गोड निबंध-भाग १ 76

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

थोरांचे तरी ऐका
खिरोदें येथें हरिजनांना मंदिर खुलें झालें. त्यामुळें सनातनी मंडळींत अस्वस्थता माजली आहे असें कळतें. पारतंत्र्यांत स्वस्थ बसणारे कोणत्या तरी कारणानें अस्वस्थ झाले हेंहि एकपरि बरें. देव जर सर्वांचा असेल, सारीं आपण त्याचीं लेंकरें हें जर यथार्थतेनें आपण म्हणत असूं तर देवाजवळ हरिजन गेल्यानें सर्वांना सध्दर्म आला असेंच वाटलें पाहिजे. धुळ्याचे महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक यांनीं अस्पृश्यतेला शास्त्राधार नाहीं म्हणून सुंदर शास्त्रीय विवेचनाचा ग्रंथ लिहिला आहे. महाराष्ट्रांतील वाईची प्राज्ञपाठशाळा कोणास माहीत नाहीं ? नवमतवादी शास्त्री महाराष्ट्रभर पसरवण्याचें काम जर कोणी केलें असेल, तर तें प्राज्ञ-पाठशाळेनें. आज तर्कतीर्थ भाई लक्ष्मणशास्त्री जोशी तिचे चालक आहेत. परन्तु पूर्वीचे प्राज्ञपाठशाळेचे प्राण म्हणजे परमपूज्य नारायणशास्त्री मराठे; आज ते संन्यासी आहेत. केवलानंद म्हणून ओळखले जातात. ज्या वेळेस ते प्राज्ञाशाळेंत चालक होते, त्या वेळची एक गोष्ट माझ्या मित्रानें मला सांगितली, तो माझा मित्र हिमालयांत देव भेटावा म्हणून जाणार होता. गुरुदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठीं तो गेला. त्या वेळेस पूज्य नारायणशास्त्री त्याला म्हणाले 'तुला देव पाहिजे ना ? हरिजनांच्या मुलांचीं ढुंगणें धू म्हणजे तुला देव मिळेल.'

आज उभ्या महाराष्ट्रांत परमपूज्य केवलानंदांहून हिंदुधर्माचा आत्मा अधिक कोण जाणूं शकणार ! वर्ध्याचे पूज्य विनोबाजीहि नारायणशास्त्र्यांच्या पायाशीं शिकलेले आहेत. असे हे थोर आजचे महर्षि ते देव कोठें तें सांगत आहेत. हरिजनांना मंदिर उघडें करायचें कीं नाहीं, याची चर्चा करीत बसणार्‍यांनीं हे वरील थोर उद्गार ऐकावे. निरहंकारी होऊन हरिजनांना जवळ घ्यावें व हिन्दुधर्माचें खरें उज्वल रूप प्रकट करावें.

पूज्य नारायणशास्त्री यांची दुसरी एक गोष्ट त्याच मित्रानें सांगितली. १९३१ सालीं महात्माजीं लंडनला गेले होते व वाटाघाटी चालूं होत्या. परन्तु आमचे जातीय प्रश्न सुटेनात. महात्माजींनीं मुसलमानांना इतकें देतों म्हटलें तर ब्रिटिश सरकारनें अधिक देऊं करावें. शेवटीं महात्माजी म्हणले 'कोरा चेक देतों, परन्तु लढा सुरू झाला तर आमच्या खांद्यांशीं खांदा लावून लढा.' परन्तु शेवटीं कांहीं निष्पन्न झालें नाहीं. जगासमोर हिन्दुस्थानचे धिंडवडे निघाले. त्या वार्ता ऐकून महाराष्ट्रांतील दोन महापुरुषांस मरणप्राय वेदना झाल्या. एक महर्षि सेनापति बापट व दुसरे श्री केवलानन्द. ऐक्याची नितान्त आवश्यकता राष्ट्रास पटविण्यासाठीं बलिदान करावें असें त्या वेळेस सेनापतींच्या मनांत आलें. आणि केवलानन्द वाईस होते. वर्तमानपत्रांतील त्या हकीगती वाचून ब्रिटिशांनीं हिन्दुस्थानची चालवलेली फजीति ऐकून नारायणशास्त्री यांच्या डोळयांतून एकसारख्या जलधारा वहात होत्या.

महाराष्ट्रा, त्या अश्रूंतील अर्थ तुला कळेल तर तूं निराळा वागशील. हिन्दु-मुसलमानांत ऐक्य उत्पन्न करण्याच्या मार्गावर राहशील. निदान द्वेष तरी पसरवणार नाहींस. वातावरण निर्मळ ठेवण्याचा आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. आगींत तेल ओतून कसें चालेल ?

परन्तु पुण्याला कांहीं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक 'तूं माणूस आहेस कीं मुसलमान आहेस ?' असा नवीन प्रयोग 'तूं माणूस आहेस कीं जनावर आहेस ?' या प्रयोगाऐवजीं करूं लागले आहेत. एवढा द्वेष शिकून आपण काय साधणार ? ब्रिटिश मात्र  उरावर अधिक बसणार. कांहीं मुस्लीमपुढारी जातिनिष्ठ असले तरी आपण अशा हीन मार्गानें नाहीं जातां कामा. काँग्रेस मुसलमानांजवळ निर्मळ बोलणें करते. त्यांनीं न ऐकलें तर स्वातंत्र्याचा लढा तिचा नाहीं थांबणार. महाराष्ट्रा, ते थोर अश्रू लक्षांत आण व वाग.
वर्ष २, अंक ४६.

« PreviousChapter ListNext »