Bookstruck

गोड निबंध-भाग १ 78

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अशा महान् संस्थांना पाठिंबा द्या. थोडी खादी घ्या. पूर्वी अंमळनेरला गांधी जयंतीस हजार हजार रुपयांची खादी खपे. तें प्रेम कोठें आहे ? मी कांहीं जैन मुलांना विचारलें, 'तुम्ही पूर्वी खादी वापरत होतेत व आतां कां नाहीं ?' ते म्हणतात, 'आम्ही सोडून दिली.' यानें तुमची अहिंसा वाढली कीं कमी झाली ? मध्यें पाऊस पडला नव्हता. लोकांना मजुरी नव्हती. खादीचें काम मागत. खादी खपत नाहीं. काम कोठून देणार ? पाला शिजवून लोक जगत. मजजवळ पत्रें आहेत अशीं. पोटभर जरा खेड्यांतील लोकांस खायला मिळावें म्हणून महात्माजी म्हणाले, 'खादीचे दर वाढवूं.' कोणी घेत ना. त्या महापुरुषानें शेंकडा २५ टक्के किंमती पुन्हां खालीं केल्या. महात्माजींना आपण खालीं ओढलें. कसलें आपलें प्रेम ? आज अहिंसा धर्माचा महान् ऋषि महात्माजींहून कोण आहे ? त्यांचा शब्द खालीं पडूं न देणें हें आधीं तुमचें काम होतें. परंतु थोडी खादीहि घेववत नाहीं. धर्म म्हणजे गप्पा नव्हे. धर्म म्हणजे झीज, त्याग. येत्या गांधी जयंतीला एखादा सदरा तरी खादीचा करा.' असें भाषण झाल्यावर श्रीमुनिमहाराज महणाले, 'काँग्रेस सर्व जगांत अहिंसा आणूं पहाते तिचे सभासद व्हा. आणि खादी ? खादी तर आधीं हवी. चरबी लावलेला कपडा अंगावर घालून पूजा कशी करतां ? रेशमाचे किडे उकळून रेशीम होतें. ते रेशमी कपडे घालून पूजा करतां. देवालाहि जर व रेशीम लेववितां. हा अधर्म आहे. खरा धर्म नाहीं. पूर्वी घरोघर रोटिया असे. आज नाहींसें झालें. जैन लोकांनीं तर आधीं खादी वापरावी. वरून चांगले झक्क कपडे करून भागत नाहींत. आंत प्रेम हवें. तें प्रेम हृदयांत असेल तर खादीच वापराल. घरी बसल्या बसल्या खादी घेतल्यानें अनेकांना अन्न द्याल. अनेक खेड्यांतील बंधुभगिनींचें दु:ख दूर कराल.' शेवटीं श्री. बाबुभाई आभार मानतांना म्हणाले, 'पूर्वी आपण पुष्कळ सभासद होत होतों. आतां कोणी म्हणतात गुरुजींचें धोरण बदललें, काँग्रेस कामगारांची झाली. गुरुजी एक दु:ख ओळखतात. काँग्रेसचा अध्यक्ष कामगार बंधु झाला तरी तो आपलाच आहे.'
वर्ष २, अंक २४.

« PreviousChapter ListNext »