Bookstruck

गोड निबंध-भाग १ 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

खरें म्हटलें तर आतां तुम्हीं विश्रांति घ्यावयाची. परन्तु न्यायमूर्ति रानडे म्हणत 'मरणानंतर विश्रांति. तोंपर्यत विश्रांति नाहीं' स्त्रियांच्या शिक्षणाचें काम योग्य लोकांच्या हातांत देऊन, आज वृध्दपणीं तुम्ही पुण्यांत घरोघर प्राथमिक शिक्षणासाठी फंड जमवीत असतां. विद्यार्थी निजलेले असावेत, आणि प्रभातकाळीं आपली पवित्र मूर्ति दारांत शिक्षणार्थ भिक्षा मागावयास आलेली असावी ! अंधार दूर करणारा सूर्य वर उगवलेला, आणि तरुणांच्या मनांतील अंधार हरण करण्यासाठीं आपला दारांत अवतार ! लाजेनें विद्यार्थी उठत व तुमचा सत्कार करीत. जवळचे रुपये तुमच्या हातीं ठेवीत.

तुम्हांला कर्तव्य प्राणांहून अधिक प्रिय आहे. कर्तव्य नीट पार पाडतां यावें म्हणून तुमचें वर्तन किती नियमित व संयमी ! अमळनेरमध्यें पुष्कळ वर्षांपूर्वी तुम्हीं आलां होतांत. श्री.गोखले गुरुजी यांच्याकडे उतरलां होतांत. पहाटे थंडी होती. तरी तुम्हीं उठलां होतांत. अंथरुणांत पडून तुमच्यानें रहावेना. तुम्ही बरोबर सामानहि पूर्वी स्वत: नेतां येईल तेवढेंच बाळगीत असां. पुण्याच्या स्टेशनवर टांगा करावा लागूं नये, म्हणून तुम्ही फार सामान बरोबर नेत नसां. प्रत्येक पैन् पै शिक्षणाच्या कामांत तुम्ही खर्च करीत असां.

आज ८१ व्या वाढदिवशींहि तुमचा उत्साह कायम आहे, बुध्दि स्वच्छ आहे, उद्योग अविरत सुरू आहे. महाराष्ट्रांतील लाखो लोकांस तुमच्यापासून स्फूर्ति मिळेल. चिकाटी, स्थिरता, निर्भयता, निंदास्तुति-निरपेक्षता, एका कार्यास वाहून घेणें, दीर्घोद्योग, निरहंकारता, स्वच्छ विचारसरणी, त्याग प्रेमळ स्वभाव-किती तुमचे गुण मी वानूं ! तुमची स्तुति करणें सोपें आहे. परंतु तुमचें स्वल्पहि अनुकरण करणें कठिण.

परमेश्वर आम्हांला स्फूर्ति देण्यासाठीं तुम्हांला उदंड आयुरारोग्य देवो.
१८ एप्रिल, १९३८.

« PreviousChapter ListNext »