Bookstruck

गोड निबंध - २ 18

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

येथील शिक्षणहि हिंदुस्थानांतील शिक्षणांपेक्षा किती निराळें!  समाजाच्या पुढें उपयोगी पडेल अशा रीतींने विद्यार्थी तयार केला जातो.  बुध्दिपूर्वक वागणा-या समाजाचा तो एक बुध्दिपूर्वक वागणारा घटक व्हावा अशी दृष्टि असते.  भ्रामक कल्पना, रूढी, बावळटपणा, अंधविश्वास यांस फाटा दिला जातो.  ठराविक शिक्षण देण्यासाठी येथे विद्यार्थी जमविले जात नाहींत.  आम्हीं ' एव्हकाई सियो '  येथील मेडिकल स्कूल पहावयास गेलों होतों.  त्यांत एक हजार विद्यार्थी होते.  स्कूलमध्ये नांव घालतांना पूर्वी किती शिकलास, पालकाचें उत्पन्न किती वगैरे प्रश्न विचारले जात नाहींत.  अगदीं अडाणी किसानकन्या वा किसानपुत्र त्या शाळेंत दाखल होतात.  साक्षराइतकाच निरक्षरालाहि त्या विद्यालयांत येण्याचा हक्क आहे.  त्यांना शिकविण्याची पध्दत वेगळी.  निरक्षरास मुळाक्षरें शिकविण्यापासून सुरुवात होते.  वैद्यकिय पुस्तकं साधारण समजूं लागतील इतकें ज्ञान त्यांना तेथें देतात.  हा खर्च सरकारचा असतो.  येथें फी तर नाहींच.  उलट प्रत्येकास महिना ८ आणे किरकोळ खर्चास दिले जातात.  विद्यार्थ्यांच्या खोल्या साध्या पण स्वच्छ होत्या.  सर्व कांही सरकारमार्फत पुरवलें जातें.  मुलामुलींचा एकच पोषाख.  हें लष्करी मेडिकल विद्यालय असल्यामुळें लष्करी पोषाख होता. साधें अन्न दिवसांतून दोन वेळा दिलें जाई.  आठवडयांतून किंवा पंधरवडयांतून एकदा मांसाहार दिला जाई .  या विद्यार्थ्यांत कोणी असमाधानी असे का ? एका विद्यार्थ्यानें आम्हांस सांगितलें 'आमचा देश फार गरीब आहे.  येथें जें कांही बरे वाईट आहे तें आमचेंच आहे.  तें सुधारण्याची खटपट आम्हीं करीत आहोत.  आम्ही सुखी आहोत.'  राष्ट्र, राष्ट्राचे स्वातंत्र्य, समाज, समाजाचें ध्येय, या गोष्टी त्यांच्यासमोर असतात.  कितीहि त्याग किंवा कष्ट पडले तरी त्यांना त्याचें वाईट वाटत नाहीं.

विद्यार्थ्यांस आठ आणे देतात.  ही रक्कम कमी नका समजूं.  चीनमधील अधिकारी कितीसा पगार घेतात?  तेथील अध्यक्ष व सेनापति दिवसाचा फक्त २॥ रु. पगार घेतात म्हणजे महिना ७५ रु. ज्यांना  थोडा पगार अधिक असतो, तेहि कम्युनिस्ट पार्टीला त्यांतून देऊन टाकतात.

स्त्री-पुरुषांचा येथें समान दर्जा, समान पोषाख, समान पगार, समान मजुरी.  त्यांना समान वागणूक, समान मतदानाचा हक्क, लग्नाच्या वेळेस एकच कुण्डली पाहिली जाते.  एकच नाडी पाहिली जाते.  ती कोणती? वधूवरांची राजकीय मतें समान आहेत ना?  राजकीय ध्येयें एकरूप आहेत  ना? लग्न झाल्यावर हें लग्न सेवेला विघ्नरूप तर होणार नाहीं ना?  एकमेकांचे काम बिघडणार नाहीं ना? ही गोष्ट पाहून लग्नें केली जातात!  खरी धर्ममय अनुरूप व सनातन धर्मीय लग्नें.  लग्नाचे वेळेस मुलीचें वय कमीत कमी १८ व मुलाचें वय २० असलें पाहिजे.  कोणत्याहि रजिस्टर कचेरींत उभयंतांच्या संमतीने विनामूल्य लग्न केलें जातें.  पटलें नाही तर घटस्फोटास परवानगी पटकन मिळते.  मात्र मुलांची जबाबदारी दोघांवर असते. 

असो.  ऑगस्ट महिन्यांत आम्हांला येऊन एक वर्ष होईल.  काँग्रेसनें परवानगी दिली तर आणखी सहा महिने येथें रहावें असे मला वाटतें.  रशियांतहि जाण्याची मला फार इच्छा आहे.   पासपोर्ट मिळाला तर जाईन.  कांहींहि होवो.  रशियांत जाऊन यायचेंच असें निश्चित केले आहे.

-- वर्ष २, अंक २.

« PreviousChapter ListNext »