Bookstruck

गोड निबंध - २ 26

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

घरांच्या व नांगरांच्या स्वच्छतेबद्दल मय लोक फार काळजी घेत.  आपल्याकडील दिवाळीच्या सणासारखाच त्यांचा एक सण असे.  त्या दिवशी प्रत्येक मयानें आपलें घर, घरांतील सामानसुमान, वस्त्रपात्रें, सर्व धुऊन, घांसूनपुसून, झाडून स्वच्छ केलेंच पाहिजे असे नियम असत.  देवळांची तर विशेष काळजी घेतली जाई.  सर्व देवळें धुऊन त्यांस सुंदर रंग देत, उत्तम चित्रें काढीत. विनोदी चित्रें काढण्यांत मय कुशल असत.  घरे स्वच्छ करणें, त्यांना रंगरंगोटी देणें ही कामें स्त्रिया करीत.  त्यांना हीं कामें करण्याची मोठी हौस असे.

बायका घरेंदारें शृंगारण्यांत गुंतलेल्या असत तर पुरुषवर्ग त्या दिवसांत खेळ खेळत.  हिंदुस्थानांत टेनिस गो-या पायांबरोबर आला, परंतु हे गोरे लोक कोणापासून चोरते झाले? मयांपासून.  अमेरिका म्हणजे रबराचें आगर. टेनिससारख्या खेळास लागणारे चेंडू तयार करण्यास रबराची आवश्यकता.  मय लोक टेनिस किंवा तत्सदृश्य खेळ फार आवडींनें खेळत.  स्त्रिया घरकामांत मग्न असतां व इतर उत्सवप्रसंगीं व करमणुकीच्या वेळी मयलोक हा खेळ खेळत.  हा खेळ खेळण्यासाठी त्यांनी तयार केलेलीं क्रीडांगणें (टेनिस कोर्टें ) आज सांपडली आहेत.  हीं टेनिसकोर्टे अजून जशींच्या तशींच आहेत.

परंतु सर्वांमध्यें आश्चर्यकारक अशी जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मयांचे पंचांग.  आज रशियामध्यें पांच दिवसांचा आठवडा व सहा आठवडयांचा महिना व बारा महिन्यांचे वर्ष असे ३६० दिवस करून उरलेले पांच दिवस राष्ट्रीय उत्सवाचे मानावयाचे असें ठरलें आहे.  ही पध्दति मयांच्या राजवटींत चालू होती.  फक्त फरक हा कीं, रशियन लोकांनी पांच दिवस राष्ट्रीय उत्सवाचे ठेवले आहेत.  तर मय लोकांनी ते घरादारांची व शहराची स्वच्छता निर्माण करण्यासाठीं ठेवले होते!  मयांच्या पंचांगांत मुळींच चूक नसे.  त्यांचे अगदीं जुनें पंचांग म्हणजे ६ आगष्ट ६१३ चें आज उपलब्ध आहे.  या पंचांगाच्या सहाय्याने ते मयलोक ख्रिस्तपूर्व १४ आक्टोबर ३३७३ पर्यंतचा वाटेल, तो दिवस, तिथि, वार, नक्षत्रसुध्दा बिनचूक सांगत!  हे त्यांचे पंचांग इ. स. १५८२ पर्यंत चालू होतें.  परंतु पिशाच्चसम राक्षसी स्पॅनिश लोकांनी इतर सर्व विध्वंसक कामगिरीबरोबर हें ऊत्कृष्ठ पंचांगहि जाळून टाकलें.

दिवसमान हे सूर्य व इतर ग्रह यांच्या गतीवर अवलंबून असतें.  यामुळे कांही वर्षांनी पंचांगात थोडी फार चूक पडते.  ही चूक काढून टाकण्याकरितां लीप वर्ष, अधिक मास वगैरे युक्त्या योजाव्या लागतात;  इतकें करूनहि थोडी फार चूक राहतेच.  परंतु मयांचे पंचांगात चूक नाहीं.  एक दिवसाची चूक पडण्यास तीन लक्ष वर्षें लागली असती - इतकें त्यांचे पंचांग शुध्द होते!  मय लोक वाटेल तितका मागला किंवा वाटेल तितका पुढला दिवस अगदीं बिनचूक सांगत असत.  कालाच्या अनंतत्वाची कल्पना त्यांच्या हांडीमाशीं पूणर्पणें बिंबली होती.  प्रत्येक दिवसाचें ५२ वर्ष होईपर्यंत नवीन वेगळें नांव असे -  ५२ वर्षांनी पुन्हा तेंच नांव परत येई!  आपल्याला साहजिकच वाटेल कीं इतकीं हजारों नांवे त्यांना सुचत तरी कशी?  परंतु मय होतेच तसे कल्पक.  त्याच नांवाचा दिवस ५२ वर्षांनी परत येणार म्हणून वाढदिवस करणारांची मात्र निराशा होई .  कारण ५२ वर्षे वाट पाहिली पाहिजे.  ज्याला ही संधि मिळेल तो भाग्यवान मानीत.

« PreviousChapter ListNext »