Bookstruck

गोड निबंध - २ 30

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

समर्थांच्या नंतर याच तेजस्वी विचारांचा व ऐक्याचा, संघटनेचा प्रसार करणारे महंत झाले नाहींत.  तरवारबहादूरांची या वीरप्रसू महाराष्ट्रास वाण आतापर्यंत पडली नाहीं.  पण विचार-प्रसार करणारांची वाण पडली.  राजवाडे म्हणतात, ' शिंदे होळकरांच्या ढाला अटकेपर्यंत गेल्या.  परंतु या जिंकलेल्या प्रदेशांत विचार-प्रसार करणारे कोण होते?  रजपुतांस, जाटांस, स्वधर्माची जाणीव देऊन ऐक्याचा संदेश सांगण्यास कोण होते? निरनिराळया सरदारांत स्पर्धा पसरत असतां त्यांस ऐक्याचें महत्त्व कोण शिकवावयास होते? कोणी नाहीं.  उलट याची कागाळी त्याला सांगणार, ब्रह्मेंद्र मात्र झाला. 'पानपतची लढाई पराक्रम नसल्यामुळें गमावली असें नाही.  त्या लढाईत भारती वीरांप्रमाणें महाराष्ट्रीय वीरांनी पराक्रम केला.  परंतु थोर विचार, ऐक्याची भावना, संघटना, मराठा तेवढा मेळवावा वगैरे तत्त्वांचा तरवारी धरणा-यांस विसर पडत चालला होता.  हा विसराळूपणा, ही थोर तत्त्वशिकवणुकीबद्दलची विस्मृति आमच्या नाशास कारणीभूत झाली.

मुलांनो, आज पुन्हां अशाच विचारांची राष्ट्रास जरूरी आहे.  विवेकानंद, लोकमान्य टिळक, न्या. रानडे, यांनी हेंच काम केलें.  महात्मा गांधीसारख्यांनी हेंच काम आज चालविलें आहे.  परंतु लक्षांत ठेवा, या थोर विचाराप्रमाणें आचार करण्यासहि तयार राहिलें पाहिजे.  नाहीं तर '' फुकाचें मुखीं बोलता काय वेंचे? '' असें समर्थांनीच म्हटलें आहे.  क्रियेवीण होणारी वाचाळता व्यर्थ आहे.  हेंच समर्थांनी स्वत:च्या आचारानें शिकविलें.  ते खरोखरच निरिच्छ होते.  त्यांना स्वत:ला कांही मिळवावयाचे नव्हतें.  परंतु राष्ट्राच्या उध्दारासाठी त्यांनी आटाआटी केली आणि स्वराज्य स्थापन झालेले पाहून ते म्हणाले, ' उदंड जाहलें पाणी, स्नानसंध्या करावया.'  त्यांना कसली आसक्ति नव्हती.  रामनामाच्या आनंदात राहावें हेंच त्यांचे ध्येय.  परंतु वैयक्तिक इच्छा दूर ठेवून जनांच्या कल्याणासाठी थोर लोकांस खटपटी कराव्या लागतात.  टिळकांना ज्ञानाचा, विद्येचा, तत्त्वज्ञानाचा ध्यास होता.  परंतु राजकारणाच्या धकाधकीच्या मामल्यांत त्यांस लोकांसाठी पडावें लागलें.  यावरूनहि एक गोष्ट, मुलांनो तुमच्या ध्यानांत येईल कीं, राष्ट्राच्या कल्याणासाठी आपल्या आवडी नावडी क्षणभर बाजूस ठेवाव्या लागतात.  राष्ट्र स्वतंत्र करावें व मग आपापल्या आवडीप्रमाणें कोणी ग्रंथ लिहावे, कोणी ग्रंथ वाचावे, कोणी स्नानसंध्या करावी, कोणी गायनवादन करावें, कोणी चित्रकार व्हावें -  परंतु हे सर्व मागून.  प्रथम राष्ट्र स्वतंत्र करण्याच्या मार्गास थोरामोठयांनी, लहानासहानांनी लागलें पाहिजे.  हाच समर्थांच्या चरित्राचा बोध आहे.

भीष्माचार्य व समर्थ यांची दिव्य चरित्रें विसरूं नका.  म्हणजे तुमच्या उध्दाराची आशा तरी आहे. 

--विद्यार्थी मासिकांतून

« PreviousChapter ListNext »