Bookstruck

गोड निबंध - २ 44

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१५ बालदिन

'मूल म्हणजे जिवंत काव्य '      -- अमेरिकन कवि लाँगफेलो.

आज हजारों ठिकाणीं बालदिन साजरा होईल.  संक्रातीच्या दुस-या दिवशीं बालदिन पाळण्याची पध्दत सुरू आहे.  तिळगूळ घ्या, गोड बोला, असे सांगितल्यावर दुस-या दिवशीं सर्व संसाराला गोडी देणारीं जीं मुलें त्यांची पूजा करावयाची.  जगांत जर खरोखरीच सुख यावयास हवें असेल तर उद्यांची जी पिढी, ती पिढी तनानें व मनानें सुंदर व निर्मळ होईल, याची काळजी घेतली पाहिजे.

हसणारें खेळणारें मूल म्हणजे केवढा आनंद.  आईला मूल म्हणजे कल्पवृक्षाचे फूल वाटतें.  बायकांच्या ओव्यांत मुलाचे वर्णन करतां करतां बायकांची प्रतिभा किती उंच जाते तें पहावें.  मातींत खेळून मूल आलें तर आईला ती माती पवित्र वाटते.  ती म्हणते :-

माती का लागली माती ना तो रे बुक्का ।
चुंबीन तुझ्या मुखा तान्हेबाळा ॥
माती का लागली माती ना ती कस्तुरी ।
सोन्याच्या शरीरीं तान्हेबाळाच्या ॥

असें हें मूल, आईबापांचे सर्वस्व.  कामधाम करावें, दमून भांगून जावें;  परन्तु मुलांची हंसरी मुखें पाहून सारें विसरावें.   तें मूल कांही करीत नाहीं, नुसते हंसतें.  परन्तु हंसण्यानें श्रमपरिहार होतो.  अकिंचिदपि कुर्वाणो सुखं दु:खान्यपोहति.  प्रिय वस्तू कांही न करतांहि सहज दु:ख दूर करते.  लहान मूल म्हणजे संसारातील मधुरता व कोमलता.  अजून मानवजातीस मी विटलों नाहीं, असा देवाचा संदेश घेऊन ती संसारांत येतात.  फुलांप्रमाणे ताजीं, सुगंधी, घवघवीत व गोड.  परन्तु या मुलांची काय दशा होत असते?

आज आपण मुलांच्या मिरवणुका काढून चांगल्या बाळसेदार मुलांना, घाटदार मुलांना बक्षिसें देऊं.  मुलांचे महत्त्व वर्णू. आई-बापांनी, मुलांची काळजी घ्यावी म्हणून सांगूं.  मुलांना एक दिवस खाऊ वाटूं.  मुलांचे महत्त्व वर्णिणारी ब्रीदवाक्यं मिरवूं.  सारें करूं.  परंतु एवढयाने, खरोखर एवढयानें हा प्रश्न सुटेल काय?

« PreviousChapter ListNext »