Bookstruck

गोड निबंध - २ 47

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१७ चीनमधील क्रान्ति; हुतात्मा हॅन

दहा वर्षापूर्वीची ती गोष्ट.  तें एक लहानसें गांव होते.  जमीनदारांचे तेथें प्रस्थ होते.  लालसेना या गांवी येणार असें कळतांच कित्येक किसानांचा जमिनदाराने शिरच्छेद केला.  जमिनदारांचे किल्लेवजा प्रचंड घर होते.  गांवाला जमिनदाराच्या वंशाचें नांव होतें, शेतक-यांचा छळ करावा, त्यांना गुलामाप्रमाणे वागवावें ; संशय येईल त्यांचे हालहाल करावें असें चाललें होतें.

लालसेना येणार असें वारें म्हणत.  जमिनदारानें पलटणींची मदत मागितली.  पिस्तुलें बरोबर घेतल्याशिवाय जमिनदारांची मंडळी बाहेर पडत नसें.  एके दिवशीं जमिनदाराचा मुलगा पिस्तुल घेऊन गांवात हिंडत होता.  एके ठिकाणी शेतकरी जमून हळुहळू बोलत होते.  परन्तु सैतानाला पाहतांच त्यांची तोंडें थांबली.  जमिनदाराच्या मुलानें टवकारून पाहिलें व तो पुढें गेला.  शेतकरी पुन्हां बोलू लागले.  तो राक्षस माघारा वळला.  त्यानें त्या लोकांकडे पुन्हां  पाहिले.  त्यांतील  एकाकडे  तो  दुष्ट  डोळयांनी  पहात  होता. त्या शेतक-याचे नांव होते हॅन.  हॅन नेहमी स्वाभिमानानें वागे.  जमिनदारापुढें तो गोंडा घोळीत नसे.  सहा शेतकरी हॅनप्रमाणें गोळी घालून ठार केले गेले.  तरीहि हॅन डरला नाहीं;  हॅनचा स्वाभिमान चिरडला गेला नाही.

वांकडया नजरेनें मारक्या हेल्याप्रमाणें पाहून, जमिनदाराचा मुलगा निघून गेला.  कांही वेळ हिंडून तो पुन्हां एके ठिकाणीं आला.  तो तेथे पुन्हा हॅन त्याला दिसला.  कांही मजूर व शेतकरी तेथें होते.  हॅनचें म्हणणें उत्कंठेने सारेजण ऐकत होते.  त्यांत जमिनदाराचीं कुळेंहि होती.  तो जमिनदाराचा मुलगा आंत शिरला आणि तेथें त्यांच्यात बसला.  सर्वांच्या मनांत काळें आलें.  सर्वांना भीति वाटली.

तें चहाचें दुकान होतें.  दुकानाचा मालक व मालकीण तेथें होती.  मालकिणींने चहा ओतून जमिनदाराच्या मुलासमोर ठेवला.  चहा ओततां ओततां ती म्हणाली, ' गरिबांचे फार हाल आहेत.  दिवस वाईट आहेत.  गरिबांपासून श्रीमंतांनी एवढें घेऊं नये.'  जमिनदाराचा मुलगा कर्कशपणें म्हणाला, ' दिवस कठीण येत आहेत, कारण हे लाल दरवडेखोर पिसाळलेले आहेत.  आणि शेतकरी आळशी झाले आहेत.  त्यांना कर्जे द्यायला नकोत. '  समोरच्या डोंगराकडे पहात एका मजुरानें विचारलें, 'लाल दरवडेखोर खरोखरच जवळ आले आहेत की काय?'  तो म्हणाला, 'होय.  तुम्हालाहि ते माहीत आहेत.  हे दरवडेखोर मालमत्ता लुटतात.  मोठमोठया घरांची अब्रू घेतात, खून करतात.'  चहा ओतणारी बाई दचकून म्हणाली, 'अय्या इतके का क्रूर आहेत ते लोक? '

क्षणभर कोणी बोललें नाहीं.  चहा न पितां तो जमिनदाराचा मुलगा म्हणाला, 'आपल्या गांवाकडे लाल दरवडेखोर येणार आहेत.  परन्तु त्यांतील आपण एकहि जिवंत जाऊं देणार नाहीं.  सरकारी पलटणी आमच्या मदतीस येत आहेत.  लाल दरवडेखोरांस जो मदत करील त्यानें सांभाळून राहावें.  गांवांतील सर्व सभ्य पुरुषांनी गांवाचें रक्षण करावें.  आमचा वाडा सांभाळावा.  आमची लूट होऊं देऊं नये.'

« PreviousChapter ListNext »