Bookstruck

गोड निबंध - २ 49

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१८ एका फुलाची इच्छा  (हिंदी कवितेवरून)

तो एक हरिजन होता.  त्याची एकुलती मुलगी होती.  तिचें नांव सुखिया.  मोठीं खेळकर होती ती.  बाप काम करून आला म्हणजे सामोरी यायची.  त्या गांवाला तापाची सांथ आली.  बाप सुखियाला म्हणे ''बाहेर नको जाऊं.  घरीच खेळ.''  परन्तु पांखराला का पिंजरा आवडेल?  सुखिया इकडे जाई , तिकडे जाई .  एक दिवस बाप घरी आला तों सुखिया अंथरुणावर होती.  तिला ताप आला होता.  बाप म्हणाला, '' मृत्यो, तुला भूक असेल तर मला ने.  या कळीला नको नेऊं. ''  बाप उशाशीं बसे.  मुलीच्या केसावरून हात फिरवी.  एकदम मुलगी म्हणाली '' बाबा, देवीच्या देवळांतील प्रसादाचें मला एक फूल द्या ना आणून.  जा ना बाबा!''

तो हरिजन देवीच्या मंदिरात कसा जाणार?  त्याने इतर फुलें सुखियाजवळ आणलीं.  तिनें तीं कुसकरून फेकून दिलीं. '' बाबा, देवीच्या प्रसादाचें द्या ना फूल '' ती म्हणाली.  सुखियाचा ताप कमी होईना.  ती ना बोले, ना डोळे उघडी.  निपचित पडली होती.  सारी खोली, सारें वातावरण ''देवीच्या प्रसादाचें फूल द्या '' असे जणुं मुकेपणानें गर्जत होतें.  एके दिवशीं बाप पहांटे उठला.  आणि अंघोळ करून आला.  पूजासाहित्य हातांत घेतलें. सुखियेजवळ उभा राहिला.  तिच्या तोंडावरून हात फिरवावा, तिचा पापा घ्यावा त्याला वाटलें.  परन्तु ओवळा झाला असता.  तो मंदिराकडे निघाला.  टेकडीवर होतें मंदिर.  एक प्रवाह मंदिराला जणुं प्रदक्षिणा घालीत डोंगरातून वहात होता.  भक्तजनांची गर्दी होती.  ''पतित तारिणीं अंबे '' जयघोष होत होते.  तो हरिजन उभा राहिला.  जगन्मातेचें मुखकमल पाहून उचंबळला.  गर्दीबरोबर पुढें ढकलला गेला.  त्यानें पूजा दिली.  पुजा-यानें फुलांचा प्रसाद दिला.  तो प्रसाद घेऊन झटकन् निघून जाण्याचें तो विसरला.  आज कृतार्थ झालो असें त्याला वाटलें.  हळुहळू भावनांनी ओथंबलेला असा तो निघाला.  सिंहद्वाराजवळ गेला नाहीं तो त्याला कोणी ओळखलें.  'अरे अस्पृश्य, पकडा, ओढा, भ्रष्ट केले मंदिर, मारा धक्के' आवाज झाले.  त्याला धक्के बुक्के देत निघाले.  तो म्हणाला, '' मातेच्या पावित्र्यापेक्षां का माझें पाप मोठें आहे?  मातेच्या महिम्यापेक्षां का माझा महिमा मोठा? तुम्ही जगदंबेचा हा अपमान करता.''  परंतु भक्तांचे रक्त सळसळत होते.  त्यांनी ढकललें त्याला.  तो पडला.  पूजेची फुलें धुळीत गेलीं.  त्याला न्यायासनासमोर नेलें.  एकदम अटक व ७ दिवसांची कैद.  शिक्षा झाली.  तुरुंगाच्या कोठडींत तो रडे, रडे.  कोणी त्याला म्हणे, 'देवळांत जायचें काय अडलें होतें?  जवळ मशीद होती, जवळ चर्च होता.  तेथें का नाहीं गेलास? ' परंतु  मुलीची इच्छा त्यांना काय माहीत?  तो सुटला.  जड पावलें घराकडे वळत ना.  घराशीं येतों तों सामसूम.  हंसरी सुखिया दिसली नाहीं.  तो स्मशानांत गेला.  सुखियेची माती तेथें होती.  'या मातीवर मला ठेवूं दे फूल' द्या रे एक देवाचें फूल.  सुखियेच्या आत्म्याला तें मिळेल.'  तो अश्रुपूर्ण वाणींने म्हणाला.  परन्तु कोण ऐकणार?

--वर्ष २, अंक २४.

« PreviousChapter ListNext »