Bookstruck

गोड निबंध - २ 54

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

२१ चीनमधील जागृत विद्यार्थी

चीनमधील विद्यार्थी सारा देश जागवीत आहेत.  प्रचाराचे प्रचंड काम ते करीत आहेत.  कोठेंहि.  तेथें तुम्हांला असें दिसेल कीं शेकडों शेतकरी जमले आहेत.  लहानसें तात्पुरते स्टेज उभारलें आहे.  साधे पडदे सोडले आहेत.  चिनी विद्यार्थी नाटकें करीत आहेत.  साधीं अर्धा पाऊण तास टिकणारी नाटकें. एक चिनी मुलगी येते.  तिच्या कपाळावर माचुरिया असें लिहिलेंलें असतें.  नंतर एक क्रूर जपानी येतो.  दांत ओठ खात येतो.  त्या माचुरियाचें सोंग घेतलेल्या मुलीला तो मगराप्रमाणें झडप घालून पकडतो व पडद्याआड घेऊन जातो!  नंतर दुसरी मुलगी येते.  दुस-या एका चिनी प्रदेशाचें नांव तिच्या कपाळावर असतें.  पुन्हा पहिलें भक्ष्य पचवून लठ्ठ झालेला जपानी राक्षस येतो व नवीन भक्ष्य गट्टं करतो.  असे चालतें.  शेवटच्या प्रसंगी जपान हल्ला करत आहे.  अशा वेळेस एक नवतेजाचा चिनी नवयुवक येतो.  तो जपानला लाथ मारतो.  टाळयांचा कडकडाट होतो.  संपतें नाटक.  तरुण मंडळी सामान आटोपून दुस-या गांवी जातात!  २० वर्षाच्या आंतील ही सारी तरुण मंडळी असते. 

नाटकें, मेळें, संवाद यांच्याद्वारा चीन जागृत केला जात आहे.  त्याच प्रमाणें चित्रांच्या द्वारा चीनमधील सारे चित्रकार आज राष्ट्रजागृतीचें काम करीत आहेत.  राष्ट्राची जपानविरुध्द अढी वाढेल, स्वातंत्र्यप्रीति बळावेल अशीं चित्रें सर्वत्र काढण्यांत येत आहेत.  भिंतीवरून सार्सापरिल्याची जाहिरात नसून जपानी मालावर बहिष्कार घातल्याचें चित्र आहे.

बोलपट तेंच काम करीत आहेत.  सचित्र मुके चित्रपटहि तेंच काम करीत आहेत. नाटकें, चित्रें, सिनेमा यांद्वारे डोळयांना राष्ट्रीय प्रेम शिकवलें जात आहे.  आणि कानांना?  आज चीनभर राष्ट्रगीतें गायली जातात.  रणसंचार व रणावेश उत्पन्न करणारीं नवीन नवीन गाणीं गात पथकें हिंडत असतात.  लहान लहान मुलें-मुलीं गल्ली गल्लींतून हीं नवीन गीतें आवेशानें गात असतात.

आणि हस्तपत्रकें, वार्ताफलक, व्याख्याने यांच्या द्वाराहि अपरंपार प्रचार केंला जात आहे.  या सर्व प्रचार-कामांत तरुण विद्यार्थी मोठा भाग उचलीत आहेत.  २० वर्षाचे तरुण लढाईत गेले.  २० वर्षाखालचे अशी भूमिका तयार करीत आहेत.

आपल्याकडील विद्यार्थ्यांसहि सुटीच्या दिवशी मेळे घेऊन खेडयांत जाता येईल.  लहान लहान नाटकें करून दाखवता येतील. तद्द्वारा कां. प्रेम, स्वातंत्र्यप्रेम, खादीप्रेम, हिंदुमुस्लीम ऐक्य, ब्रिटिशांचे स्वरूप, संघटना, किसान कामगारांची स्थिति, अस्पृश्योध्दार, सारें दाखवतां येईल; शिकविता येईल.  परंतु विद्यार्थी तयार झाले तरी शिक्षक तयार हवेत.  आमचे साहित्यिक असें छोटें परंतु परिणामकारक साहित्य लिहून देण्यास तयार झाले पाहिजेत.  चीनपासून आम्हांस पुष्कळ शिकतां येईल.  परंतु इच्छा व तळमळ हवी.

-- वर्ष २, अंक ८

« PreviousChapter ListNext »