Bookstruck

गोड निबंध - २ 64

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

२६ 'साक्षरता प्रदर्शन'

अमळनेरच्या साक्षरता  प्रदर्शनांत  जळगांवच्या  साक्षरता  समितींचे  चित्र व अमळनेरच्या श्री. टिल्लू व श्री. सोनार या शिक्षकांनी काढलेलीं एकूण ५०/६० चित्रें होतीं.  ही चित्रें समजावून सांगतांना जवळ जवळ व्याख्यानेंच द्यावी लागत.  लोक किती  शिकतात तें  पाहूं.  परंतु हजार बायामाणसांच्या कानांवर प्रदर्शनाच्या निमित्तानें निर्भय व निर्मळ विचार गेले, हेंहि एक मोठेंच काम झालें.  चित्रें काय होतीं, आम्हीं कसें सांगत असूं याची कल्पना खालील वर्णनावरून थोडी होईल.

चित्र :-- एक शेतकरी कर्जाच्या बोज्याखालीं वांकला आहे, त्याच्या हातापायाच्या काड्या झाल्या आहेत.  कोप-यांत एक कामगार क्षयरोगानें पडला आहे.  एक बाजूस भटजी शनिमाहात्म्य वाचिताहेत.

असें हे चित्र होतें.  आम्ही सांगत असूं :

हा पहा शेतकरी.  हा दुनियेला पोसतो.  खंडोगणती धान्य निर्माण करतो.  परन्तु त्याच्या पोटाला भाकर नाहीं.  त्याचीं मुलेंबाळें उपाशी.  त्याच्या बायकोला नीट वस्त्र नाहीं.  कां  हें  असें?  हा अन्याय नाहीं का?  त्याला असो नसो,  सावकार जप्ती आणतो.  त्याला असो नसो तहशील चुकत नाहीं.  त्याच्या धान्यावर दुनियेचा हक्क;  परन्तु तो उपाशी आहे.  त्याचें धान्य विकून व्यापारी हवेल्या बांधतात ; परन्तु त्याचें घर पावसांत गळतें.  जगाला हा सुखाच्या स्वर्गांत ठेवतो, परन्तु स्वत: उपासमारीच्या, गुलामगिरीच्या, अपमानाच्या, नरकांत राहतो.  असे कां?  आणि हा पहा कामगार.  त्याच्या अंगावर कपडा नाहीं.  त्याचे गाल बसले आहेत.  क्षयी आहे तो.  त्याच्या भोंवती डांस गुणगुणत आहेत.  हा कामगार हजारों वार कपडा तयार करतो;  परन्तु त्याच्या अंगावर चिंधी नाहीं.  त्याला पगारी रजा नाहीं.  कोठला दवा, कोठली चांगली हवा ?  असें कां? शेतकरी, कामकरी दैवाला बोल देतात.  भटजींकडे जाऊन म्हणतात, 'कुंडली पहा.  ग्रहमान बघा.  साडेसाती आहे का बघा.'  हे कुडबुड्ये जोशी म्हणतात ; 'शनि वाकडा आहे.  दान करा, अभिषेक करा. 'शनि हा सूर्यचंद्रासारखा एक ग्रह आहे.  भिंगातून पाहूं तर त्याचें रूप दिसेल.  तो वांकडें पहात नाहीं.  तो कंदिलासारखा जळत आहे.  वांकडें जर बघत असेल कोणी तर तो मालक बघतो.  गिरणीचा मालक पगारी रजा देईल, हवेशीर चाळी बांधील, तर कामगार जगेल.  सावकार छळणार नाहीं.  सरकार तहशील कमी करील, तर शेतकरी जगेल. शनि नाहीं, मंगळ नाहीं.  साडेसाती नाहीं, कांही नाहीं.  आपण विचार केला पाहिजे.  जगांत काय चाललें आहे, ही अशी स्थिति कां हें समजून घेतलें पाहिजे, संघटना केली पाहिजे.  यासाठी शिकले पाहिजे.

चित्र :-- गाडींत एक  ढब्बू गृहस्थ आहे.  त्याची गाडी मरतुकडा मजूर ओढीत आहे.  ढब्बू त्याला जोरानें ओढ असें हात लांब करून सांगत आहे.

हें पहा चित्र.  श्रीमंताचे संसार तुम्ही चालवले आहेत.  त्यांचे गाडे तुम्ही ओढीत आहांत ; परन्तु तुम्ही मेलेत तरी त्यांना पर्वा नाहीं.  त्या मजुराचें पोट पाताळांत गेलें आहे.  या ढब्बूचें पोट बघा.  तरीहि गाडी जोरानें ओढ म्हणून म्हणतच आहे.  तेलाच्या गिरण्यांतून १२/१२, १४/१४ तास काम करून घेतात.  मेलेत तर दुसरे मिळतील म्हणतात.  तुम्हीं हें ओळखून घेतलें पाहिजे कीं, सारी दुनिया आपल्यावर जगते.  आपण नांगरलें नाहीं तर हे का माती खातील ?  गाडा खाली ठेवूं या.  संप पुकारूं या.  मग हे मरूं लागले म्हणजे ताळयावर येतील.  परन्तु आपली एकी हवी.  इतर देशांत किसान, कामगार, कसे पुढें आले तें वाचलें पाहिजे.

« PreviousChapter ListNext »