Bookstruck

गोड निबंध - २ 77

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बरें, ज्या गरिबाला हें सारें महाग पडतें, तो निरुद्योगी असतो का?  नाहीं.  तो रात्रंदिवस श्रमतो, कष्ट करतो.  त्याच्यामुळें जगांतील सर्वांची पत असते.  आज ब्रिटिश साम्राज्याची पत आहे, व्यापा-यांची पत आहे, ही पत कोण टिकवतो?  शेतकरी शेती करणार नाहीं व कामगार काम करणार नाहीं तर ही पत टिकेल का?  घराचा पाया गेला, तो खचला तर घर टिकेल का?  ज्या श्रमणा-या किसान कामगारांच्या घामानें दुनियेंतील सर्वांची पत टिकते त्या श्रमजीवी लोकांची मात्र आजच्या समाजांत पत नाहीं.  त्याला महाग धान्य, त्याला घाणेरडा माल, त्याला भरमसाठ व्याजाचा दर! केवढा अन्याय, केवढें असत्य!

ज्या धनिकांनी शेतक-यांस कर्जें दिलीं ते पैसे धनिकांनीं कोठून आणले? सारी संपत्ति श्रमांतून निर्माण होते.  जे १०० रुपये आज मी माझे म्हणून शेतक-यांस कर्ज देतों ते १०० रुपयेहि त्या शेतक-याच्या श्रमांतूनच जन्मले होते.  ते त्याचेंच पैसें आहेत.  ते पैसे तुझ्याकडे ठेव होती.  ती ठेव नम्रपणें त्या शेतक-यांस परत कर.  परंतु तसें करण्याऐवजीं त्या शेतक-याचा अपमान.  ते त्याला दारांत उभे करीत नाहींत.  त्याला शिव्या देतात.  शंभर देऊन दोनशें लिहून घेतात.  व्याजाचें भरमसाठ दर.  आणि या प्रकारास न्याय व सत्य अशी पुन्हां संज्ञा दिली जाते.  शिव शिव!

सर्व संपत्ति श्रमजीवींनीं निर्मिली आहे असें कबूल केलें तर कर्ज हा शब्दच शिल्लक राहाणार नाहीं.  परंतु आज ही गोष्ट शक्य नाहीं.  सारें कर्ज रद्द करा असें जर कोणीं म्हटलें तर त्यांत केवळ सत्यच आहे असें मला वाटतें.  आज तसें करणें शक्य नाहीं.  परंतु दुस-या कांही गोष्टीं मनांत आणूं तर करूं शकूं.  त्यासाठीं प्रयत्न तरी व्हावा.  मग गव्हर्नर आड आला तर बघतां येईल.

शेतक-याच्या कर्जाचा विचार करतांना शें. ३ पेक्षा अधिक व्याजाचा दर धरणें पाप होईल.  ज्याला तहशील भरतां भरतां मरण बरें वाटे, खंड भरतां भरतां डोळयांत पाणी आणावें लागे ; ज्यास मुलाबाळाच्या तोंडचा घास काढून ठेवावा लागे, बायकोच्या अंगावरची लक्तरें बघावीं लागत, त्याचे जवळून कसलीं मागतां व्याजें, कसलें धरतां दर! परन्तु तेवढी उदारता, तेवढी न्यायप्रीति  आज नसेल तर घ्या व्याज.  परन्तु तें अत्यंत कमी घ्या. शेकडा ३ दर पुरे.  सावकारांनी, कारखानदारांनी आपण कोणावर जगतों हें ध्यानीं घ्यावें.  कृतज्ञता दाखवावी.  नाशिक जिल्ह्यातील सावकारी व्यापारी परिषदेंत शेंकडा १२ दर सुचविण्याऐवजीं बिलांतील ६ व ९ हें दर कमीं करून ३ च दर धरावा, मोठमोठया साम्राज्यांपेक्षां शेतकरी अधिक संपन्नमान नाहीं, असें जर ठरलें असतें तर त्या परिषदेंत माणुसकी व कृतज्ञता असलेंली माणसें जमलेलीं होतीं असें देवाने म्हटलें असतें.  परंतु त्यांनी बाराचा ठराव केला!  गरिबांच्या संसाराचे बारा वाजण्याचीं बाबांनो वेळ आली.  आतां बारा एके बारा, न बोलता, बे एके बे किंवा तीन एके तीन बोला.  परंतु जगांत माणुसकी मोठया वर्गांत उरली नाहीं.  जे स्वत:ला काँग्रेसचे सेवक म्हणवतात, महात्माजींचे प्रामाणिक अनुयायी म्हणवितात, गरिबांशी हृदये जोडणारी खादी अंगावर घालतात, त्या श्रीमंतांनी,  त्या व्यापा-यांनी,  त्या कारखानदारांनी, तरी काँग्रेस सरकारला सांगितलें पाहिजे ' तीनच व्याजाचा दर धरा व हिशेब करा.  ४ म्हणजे डोक्यावरून पाणी '  महात्माजींचे होणें म्हणजे मरणाचें होणें, त्यागाचें होणें.  ती गंमत नाहीं.  सत्य व अहिंसा शब्द आज स्वस्त झाले आहेत.  कांहीं व्यापा-यांनी व सावकारांनीं सत्य अहिंसेच्या पूजेसाठी माझें हें काँग्रेस पत्र खेडयांतून जात असे तेथील शेतक-यांना ते बंद करावयास लाविलें.  ज्या सावकारांना सत्याची येवढी चाड ते कुळांना त्यांच्या जमिनी परत देतील का, हरिजनांना प्रेमानें घरांत घेतील का, व्याजाचे दर कमी व्हावे म्हणून मरतील का?  काँग्रेसपत्र असत्य व हिंसा यांचे कांटे पेरीत असेल तर जगाच्या कल्याणासाठीं ते बंद करणें सेवाच ठरेल.  परंतु तुम्ही तरी सेवेचे, सहानुभतीचे, प्रेमाचे, माणुसकीचे जीवनदायी मेघ बना व संसार सुंदर करा.

« PreviousChapter ListNext »