Bookstruck

गोड निबंध - २ 82

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

३१ साक्षरता-प्रसार

भारताचें भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे.  एकदां राष्ट्रांत शिक्षण फैलावलें म्हणजे सर्व शक्य होईल. सुशिक्षितांस सर्व साध्य आहे  अशिक्षितांस सारें असाध्य आहे.  शिक्षण अनेक प्रकारचें आहे.  परन्तु सर्वांत महत्त्वाचें शिक्षण म्हणजे लोकशिक्षण. सर्व जनतेला शहाणें करून सोडावयाचे हें थोर कार्य करण्यांसाठी आज राष्ट्रानें कंबर बांधली आहे.

व्यक्तीला समाजाचे ऋण असतें, ही गोष्ट भारतीय संस्कृतीनें अनादि काळापासून सांगितली आहे.  कितीहि दरिद्री भारतीय मनुष्य असला तरी तो भुकेलेल्यास आपल्या चतकोरांतील नितकोर देईल.  अन्नदान करणें हें जसें सर्वांस बंधनकारक असें भारतीय संस्कृतीचें अंग आहे, त्याप्रमाणे दुसरेंहि एक अंग आपण निर्माण केले पाहिजे.  ज्ञानदानहि प्रत्येकानें केलें पाहिजे.  ज्याच्या जवळ जें ज्ञान असेल तें त्यानें इतरांस देत राहिले पाहिजे.

आपणांस भारताचे ऐक्य साधावयाचें आहे.  हें ऐक्य साधावयास सारें राष्ट्र एका ध्येयासाठीं उठलें पाहिजे.  एक विचार सर्वांच्या हृदयांत संचरला पाहिजे.  शिक्षणाचा प्रचार व प्रसार केल्याशिवाय हें कसें होईल ?  सार्वत्रिक शिक्षणप्रसारानें राष्ट्रीय बळ वाढेल, गोंधळ व अव्यवस्था कमी होईल.

भरतखंडात ही जागृति उत्पन्न झाली आहे.  मद्रास सरकारनें ५० लोकांची एक तुकडी अशा दहा तुकड्या करून त्या शिक्षण प्रसारार्थ पाठविण्यांचे ठरविलें आहे. तीन महिने एकेका केंद्राभोवती काम होईल.  तीन महिन्यांनी केंद्रें बदलतील.  तुकड्यांतील सेवकास पगार मिळणार आहे.  ६५ रुपये मद्रास सरकार ह्यासाठीं खर्च करणार आहे.  तिकडें बंगालमध्यें कलकत्ता विद्यापीठानेंच हे थोर काम अंगावर घेतलें आहे.  बिहार प्रांतानें तर प्रौढशिक्षणांत आघाडी मारली आहे.  सिंध प्रांतांतहि जिल्ह्याजिल्ह्यांत साक्षरता-प्रचार सुरू झाला आहे.

आपला मुंबई प्रांतहि मागें नाही.  मुंबई शहरांत जवळ जवळ तीन हजार स्वयंसेवक व स्वयंसेविका शिक्षणप्रसार करीत आहेत.  १०/२० हजार विद्यार्थी शिकत आहेत, ज्ञानाचा नवीन डोळा लाभत आहे.  १ में १९३९ हा दिवस भारताचें इतिहासांत सोन्याच्या अक्षरांनी लिहिला गेला पाहिजे.  या दिवशीं मुंबापुरीनें ज्ञानाची विराट ज्योत पेटवली व तिची प्रभा खेड्यापाड्यातहि गेली.  १ मे चे दिवशीं साक्षरतेच्या मिरवणुका निघाल्या.

आतां सर्वत्र साक्षरताप्रसारक मंडळे निघालीं पाहिजेत.  हे संघटनेंचें युग आहे.  सामुदायिक रीत्या आज प्रश्न हातीं घेतले पाहिजेत.  मी एकटा जगाला हलवीन या पोकळ घमेंडींत राहण्याचे हे दिवस नाहींत.  एकाच ध्येयाच्या भक्तांनीं एकत्र यावें.  कोणत्या तरी देशबांधवाच्या हिताच्या कामास वाहून घ्यावें.  सांघिक उत्साहाची नवीन भावना आपणांस आपली करून घ्यावयाची आहे.

« PreviousChapter ListNext »