Bookstruck

गोड निबंध - २ 94

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

३५ ' वंदे मातरम् '

आपलें राष्ट्रगीत काय सांगते?

राष्ट्रीयत्वाची भावना ही अर्वाचीन आहे.  अखिल भारतवर्ष हा माझा आहे, ही वृत्ति अलीकडील आहे.  पूर्वी प्रांतिक स्वाभिमान देखील उत्कट असा असें.  वाङ्मयांत त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसत नाहीं.  कवींने रोमांचयुक्त होऊन अभिमानानें, प्रेमानें महाराष्ट्रभूंचें यशोगान केले आहे, असे मराठी वाङ्मय कोठे आहे?  राष्ट्रीय भावना आज जागृत झाली असली तरी ती आपल्या हाडींमासीं खिळून जाण्यास आणि आपल्या बोलण्या चालण्यांत व कृतीत दिसून येण्यांस अजूनहि बराच अवकाश आहे.

मनुष्य ज्या भूमींत राहतो ती त्याला प्रिय असते.  दक्षिण आफ्रिकेत राहणा-या नीग्रोला तेथील उष्ण हवा प्रिय वाटत असेल; वाळवंटातील अरबाला ती उन्हांत चमकणारी व मृगजळ प्रसवणारी वाळूच हि-यांच्या राशीहून प्यारी असेल.  प्रदेश कसाहि असो; जेथें आपण जन्मलों, राहिलो, वाढलों, खेळलों, जेथे आपलें पूर्वज राहिले; पराक्रम करते झाले, जेथील संस्कृति आपल्या रोमरोमांत भरलेली असते, जेथील थोर पुरुषांच्या कर्तबगारीचे, वैभवाचे, सत्कीर्तीचें आपण वारसदार होतों, जेथें आपला धर्म, आपलें कर्म, आपलें शर्म, आप्त गणगोत, आपल्या विद्या, कला, वाङमय इतिहास यांचा उत्कर्ष झाला तो भूप्रदेश कोणाला प्राणाहून प्रिय होणार नाहीं?   ज्याला म्हणून मन आहे, हृदय आहे, कृतज्ञता आहे त्याला ती भूमि प्रिय वाटल्याशिवाय राहणार नाही.

जगांतील प्रत्येक राष्ट्राच्या वाङ्मयांत त्या त्या राष्ट्राचीं स्फूर्तिप्रद अशीं गानें आहेत.  राष्ट्राची कीर्ति , उज्वलता, इतिहास, वैभव, तेज, सौन्दर्य, ही जरी अनेक कवींनी काव्यांत वर्णिलेली असलीं तरी त्या सर्वच काव्यांना राष्ट्रीयत्व प्राप्त होत नाही.  आकाशांतील अनेक ता-यांमध्ये तेजस्विता असली तरी चंद्राची शोभा अवर्णनीयच ठरते.  त्याप्रमाणें राष्ट्राच्या वैभवाची अनंत गाने असलीं तरी एकाद दुसरेंच गान अखिल राष्ट्रीय होऊन त्याला अग्र पूजेचा मान मिळत असतो. 

जे दिव्य गीत ऐकून शूरांचे बाहु स्फुरतील, वृध्दसुध्दां उभे राहतील, स्त्रिया मरावयास पुढें येतील, तरुण हंसत गोळे झेलतील, असें गान इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या प्रत्येक राष्ट्राचें आहे.  नेपोलियनचे लाखों शिपाई ' ला मार्सेलिस ' गाणे गातच विजय मिळवीत.  बँडवर हें गाणें सुरू होतांच हृदय उचंबळून येतें, दिव्य शूरता व प्राणाबद्दलची बेपर्वाई मनांत उभी राहते आणि आपली भूमि हेंच सर्वस्व आहे असें वाटू लागतें.

भारतात राष्ट्रीय वृत्तीचा जन्म ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडून आली आहे.  सर्व भारतवर्ष माझा ही भावना मनांत बाळगून प्रांतिक अभिमान शिथिल होत आहेत.  आपल्या वाड.मयात हा फरक दिसून येतो.  आपण जी गाणीं गातों त्यांत प्रांतिक देशभक्तीची गानें असली तरी ज्या वेळेस सर्व भारतातील प्रतिनिधी एकत्र येतात त्या वेळेस प्रांतिक वातावरण सोडून आपणांस वरच्या वातावरणांत जाणें भाग पडतें.  आधीं विशाल मग संकुचित.  आज हिंदुस्थानांतील निरनिराळया भाषांत राष्ट्रगीतें झालीं आहेत.  परन्तु अखिल भारतीय होण्याचा मान यांपैकी १/२ गीतांनाच प्राप्त झाला आहे.

« PreviousChapter ListNext »