Bookstruck

फरक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एक राजा जंगला मध्ये शिकारीला गेला. तेथे तो खूप दमला, त्याला पिण्यास पाणी हवे होते. तो शोधत शोधत एका झोपडीपाशी गेला. तेथे त्या राजाला तेथील माणसाने विचारपूस केली, खायला दिले व पिण्यास पाणी दिले. त्याच्या ह्या आदरातिथ्याने राजा भारावून गेला व त्याने त्या माणसाला खुश होवून त्या जंगलाचा एक विशिष्ट परिसर भेट देवून टाकला. पण ज्याला हे भेट मिळाले त्याला त्या गोष्टीची जाणीव नव्हती किंबहुना तो मूर्ख होता असेच म्हणा की कारण ते जंगल चंदनाचे होते. ह्या माणसाला ते जंगल भेट मिळाल्यावर त्याने तेथील एक एक झाड तोडावयास सुरुवात केली व त्याचा कोळसा बनवून विकण्याचा उद्योग सुरु केला. त्यातून त्याला त्याच्या उदरनिर्वाह पुरते धन मिळू लागले. असे करत करत त्याला भेट मिळालेल्या भागातील २-3 झाडे शिल्लक राहिली. काही काळाने पावसाळा सुरु झाला. पावसाच्या मुळे त्याला झाडे तोडली तरी त्याचा कोळसा बनविता येईना, मग त्याने तशीच लाकडे घेवून बाजाराचे ठिकाण गाठले, तेथे येणाऱ्या हुशार व्यापा-यांनी त्याच्याकडील चंदनाची लाकडे ओळखली व त्याला धन दिले. त्या मूर्ख माणसाला हेच कळेना कि मी ह्याच लाकडाचा कोळसा विकत होतो मला कमी पैसे मिळत होते पण आता मी लाकडे आणली तर इतके का पैसे मिळत आहेत. त्याने त्याचे कारण विचारले त्या वेळेला व्यापा-यांनी त्याला सांगितले '' अरे वेड्या ! चंदन आणि त्याचा कोळसा ह्यात काही तरी फरक आहे कि नाही. तुला जर हे कळत असते तर तू आता आम्हालाही विकत घेतले असते इतका श्रीमंत झाला असता. '' शेवटी त्या मूर्ख माणसाला चंदनाचे जंगले भेट मिळूनही त्याचा लाभ घेता आला नाही.

तात्पर्य-मिळालेल्या संधीचा ज्याला फायदा करून घेता येतो तोच शहाणा ठरतो

« PreviousChapter ListNext »