Bookstruck

प्राचीन ऋषिवर 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ऋताचा कायदा
या विश्र्वाचा पसारा कोण चालवतो ? कोण नियमन करतो ? कोण सूर्याला पाठवतो ? ऋतू कसे येतात ? पावसाला कोण धाडतो ? हे सारे देव कायद्याने वागतात. त्यांना त्या कायद्याचे-ऋताचे उल्लंघन करता येणार नाही.

कोणता खरा देव ?
परंतु खरेच का असे देव आहेत? कोणी पाहिले आहे त्यांना? तो बलाढ्य देव कोठे राहतो? दाखवा मला ! आणि हे शेकडो देव ? खरा कोणता ? याला प्रणमावे तर तो रागावायचा. काय आहे ही भानगड ? कोणत्या देवाला भजू, कोणाला आहुती देऊ ? कोणी तरी आहे का ? हे पर्वत कोणी उभे केले ? प्रथम हे हालत असतील. कोणी त्यांना स्थिर केले ? आणि या नद्यांना कोण वाहवतो. आकाशाला कोण पसरतो ? वा-यांना कोण थांबवतो ? दिवस-रात्र कोण करतो ? पूर्वी काहीच नव्हते ना ? म्हटले तर होते, म्हटले तर नव्हते. अशातून हे सारे विकसन आले ? ते चैतन्य म्हणजे का देव ? म्हणजेच तो सर्वत्र आहे. सारे त्याचे रुप. हे वन म्हणजे ब्रह्म, हे आकाश म्हणजे ब्रह्म. सारे ब्रह्मच. नावे निराळी, आहे एकच. नदी, नाला, विहीर, समुद्र, तळे, सरोवर परंतु पाणी एकच. अग्नी असो की सूर्य असो ; वारे असोत, तारे असोत. एकाच शक्तीची ही विविध रुपे.

एकाच चैतन्याचा विकास
“एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति-सत् एकच आहे. विचारवंत लोक त्याला विविध नावांनी हाक मारतात.” कोणा तरी विचारवंताने गोंधळलेल्या बुद्धीला हा थोर विचार दिला. भव्य विचार ! उत्तरेचा उत्तुंग हिमालय नि तिन्ही बाजूंचा अनंत तरंगधारी  सागर हाच नाही का संदेश देत ? माझी हजारो लहान-मोठी शिखरे आहेत ; सोन्याप्रमाणे झळकणारी कांचनगिरीसारखी आहेत ; रुप्याप्रमाणे चमकणारी धवलगिरीसारखी आहेत. परंतु या सर्वांच्या मुळाशी, पाठीशी मी एक हिमालय आहे. ही सारी माझीच रुपे. असा हिमालय विविधतेत एकता पाहण्याचा संदेश देत आहे. आणि या अनंत लाटा लहान मोठ्या माझ्यावर उसळत आहेत. परंतु त्या सा-या माझ्या. एकच पाणी सर्वांत आहे. त्या माझ्यातूनच उठतात, माझ्यातच विलीन होतात. खाली खोल पहाल तर मीच एक सागर-गंभीर तुम्हाला दिसून येईन ? असे सागर सांगतच आहे. सारे स्थिराचर हेच सांगत आहे. एकाचा सारा पसारा. एकाचे हे विविध वैभव. एकाच बीजातून विविध फांद्या, फुले, फळे, त्याचप्रमाणे एकाच चैतन्याचा हा विराट विकास चालला आहे.



« PreviousChapter ListNext »