Bookstruck

गोड निबंध-भाग ३ 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भारतीय ॠषींनीं व संतांनी ही दृष्टि दिली होती. दुसर्‍याच्या हृदयांतील पावित्र्य पहा. कोणास तुच्छ नको मानूं. परंतु आपण मानव जातीच्या जाति क्षुद्र मानीत आलों आहोंत. जो मंगलाची दृष्टि घेईल, ध्येयवाद दाखवील त्याची टर उडते. महात्माजींनीं अहिंसापंथ दाखविला. लोक म्हणतात, ‘तुम्हांला मारुन टाकतील ? काय करील अहिंसा’ मरण कोणाला टळलें आहे ! हें मडकें फुटावयाचेंच आहे. तें ध्येयासाठी फुटलें तर कृतार्थ होईल. अलेक्झांडर एक संन्याशासमोर समशेर हातीं घेऊन उभा राहिला. संन्याशी सूर्याचें ऊन खात बसला होता. अलेक्झांडरची तलवार पाहून तो प्रणाम करायला उठला नाहीं. विश्वविजयी अलेक्झांडर म्हणाला, “ऊठ, माझ्या समोर उभा रहा. तुला नाहीं तर मारीन.” संन्यासी प्रसन्नपणें हंसला. अलेक्झांडर चकित झाला. त्यानें तलवारीसमोर हंसणारा पाहिला नव्हता. संन्यासी म्हणाला, “तूं मारलेंस तर काय होईल ? या शरिराला मारशील, परंतु आत्मा परमात्मांत मिळून जाईल. या साडेतीन हात देहांतील चैतन्य, विश्वचैतन्याशीं मिळेल.” तें संन्याशाचें मरणें का मारणें झालें असतें ? तें मरणाला मारणें झालें असतें. प्लेटो हा ग्रीक तत्वज्ञानी म्हणे, “जगांत शेवटी विचार राहतात, ध्येयें राहतात ! माणसें मरायचींच आहेत. प्रभु रामचंद्र गेले, त्यांचें ब्रम्हचर्य राहिलें. शुक गेले, त्यांचें वैराग्य जिवंत आहे. ध्येयें मरत नाहींत. अहिंसा मानणारा मेला म्हणून अहिंसेचें ध्येय मरत नाहीं. तें त्याच्या मरणानें पल्लवितच झालें.

लोकांना जर म्हटलें दुसरा कसा का वागेना, तू चांगला वाग तर ते रागावतात. ते म्हणतात तो लांडगा तर मी वाघ. तो वाईट तर मी वाईट. जगांत एक वाईट मनुष्य होता, त्याऐवजीं दोन झाल्यानें जग अधिकच भेसूर होणार. प्रथम मीच कां चांगलें व्हावें असें म्हणतात. अरे, तूं माणूस व्हावास म्हणून तूं चांगला हो. जो अधिक चांगला होईल त्याच्यांत आधीं माणुसकी जागृत होईल. माझा चांगुलपणा दुसर्‍यांतील जीवनाच्या चांगुलपणास जागृत करील, आज नाहीं शतजन्मांनी करील. जगांत कांही फुकट जात नाहीं हा भौतिक व अध्यात्मिक कायदा आहे. परंतु वाईट मनुष्य चांगला होईल असें आम्हांस वाटतच नाहीं, या नास्तिकांना मला विचारावयाचें आहे, अरे; डांबरांतून सुंदर रंग बाहेर पडतात, साखर बाहेर काढतात. काळ्याकुट्ट डांबरांतून मधुरता व सुंदरता प्रकट होते. त्याचे शोध आम्हीं लावले. त्या शोधांचें कौतुक कोण करतो ? मग मानवी जीवनाच्या मातींतूनहि मांगल्य निर्माण करुं पाहणार्‍या बुध्दींचे कां कौतुक होत नाहीं ? मनुष्य डामराहून डामरट आहे का ? अशा आशयाचें मी बोललों. अध्यक्षांनीं समारोप केला. रात्रीं आम्हीं गोष्टीचा कार्यक्रम केला. दुसर्‍या दिवशीं हायस्कुलांतील विद्यार्थ्यांच्या गणपतीसमोर हायस्कुलांत भाषण झालें. शाळेचा हॉल भरुन गेला होता. मी म्हटलें : विद्यार्थ्यांस पाहून मला आनंद होतो. नवीन हिंदुस्थान बनविणारे तुम्हीं नवभारताचीं ध्येयें आपलींशी केलीं पाहिजेत. तुम्हीं संघटना करा. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेला येथील संघटना जोडा. येथें स्टूडंट फेडरेशनची शाखा नाहीं हें ऐकून मला वाईट वाटलें. ती शाखा आपण स्थापन करा. त्या शाखेमार्फत निरनिराळें काम करा. शाळा सांभाळून इतर गोष्टी आपणांस करतां येतात. मला असें कळलें कीं या हायस्कुलांतील लायब्ररींत जवाहरलाल, महात्माजी यांचींहि चरित्रें नाहींत, असलीं तर मुलांना मिळत नाहींत. माझ्या राष्ट्रनिर्मात्या महान् व्यक्तींचीं चरित्रें येथे नसतील तर विद्यार्थी स्वस्थ कसे बसतात ? महात्माजींचें हरिजन पत्र शाळेंत घ्यावयास शिक्षणाधिकारी म्हणे परवानगी, मंजुरी देत नाहींत. ज्याचा शब्द ऐकावयास जग अधीर असतें, त्याचें पत्र शाळेंत जाऊं नये, घेण्यास बंदी असावी ! राष्ट्रपुरुषाचा हा अपमान तुम्हीं मुलें सहन कसा करतां? तुमची संघटना करा व असले अभद्र प्रकार बंद पाडा. लोक म्हणतात, “मुलांनीं कशाला राजकारणांत पडावें?” मनुष्य जन्मांत अनेक ॠणें घेऊन येतो. तीं टळत नाहींत. देशाचें काम अमक्या वयीं सुरु करावयाचें असें नाहीं. आज मरण आलें तर देवासमोर सांगतां आलें पाहिजे कीं देशाचेंहि काम थोडें करीत होतों.
-वर्ष २, अंक २५.

« PreviousChapter ListNext »