Bookstruck

गोड निबंध-भाग ३ 28

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

लहानसें-इवलेंसे गवत. पण हें मूठभर उंचीचें असलें तरी सारी धरणी तें व्यापून टाकतें. सर्व भूतलास आपल्या पायांनी त्यानें आक्रांत करुन सोडलें आहे. लहान वस्तूंतहि ऐक्यामुळें व दृढ निश्चयानें पहा कसें सामर्थ्य उत्पन्न होतें तें. एवढेंसे गवत ! परंतु त्यानें विस्तृत पृथ्वीस हिरव्या शालूनें नटवली आहे. या तृणानें डोंगराच्या पाठीवर हिरव्या झुली घातल्या आहेत; पर्वतांच्या माथ्यावर हिरवे मंदील बांधले आहेत.

कधीं कधीं हें तृण उंचहि वाढतें. वार्‍याच्या झुळकेसरशी तें मंद डुलत असतें. कबीराचा मुलगा कमाल हातांत विळा घेऊन गवत कापण्यासाठीं गेला असतां या तृणाच्या मंद डोलण्यानेंच तो कमाल मोहून गेला, प्रेमाचा धडा शिकला. त्या डोलणार्‍या तृणानें माना हलवून कमालास सांगितलें, “कापूं नको, नको रे कापूं.” जरी या तृणाची प्रार्थना कोणी ऐकिली नाहीं व त्याला कापलें तरी तें कुरकुर करीत नाहीं. सारा देह या तृणानें परार्थच दिलेला असतो. मनुष्यें त्यास कापून काढतात, आगगाडीचे मालक त्यास आग लावतात, गुरें त्यावर चरतात व दातांनी कुरतडतात. परंतु तें तृण कुरकुर करीत नाहीं, उलट जरा पाऊस पडला; चार दंवाचे थेंब पडले तर तें पुन्हा वैभवानें वाढूं लागतें, डुलूं लागतें, खुलूं लागतें. तुणाचें हें वाढणें कोणासाठीं आहे ? तृणाची हिरवी संपत्ति कोणासाठीं आहे ? तें वैभव दुसर्‍यानें लुटावें, त्या वैभवानें दुसर्‍यानें संपन्न व्हावें, गाईगुरांनी पुष्ट हावें, दुध द्यावें, म्हणून आहे.

तृण हें समदृष्टि आहे. कधीं कधीं त्याच्या मृदु अंगावर विषारी भुजंग पसरलेले असतात. त्या विषधरांस तें नाहीं म्हणत नाहीं. आपला सुंदर मृदु देह त्यानें सर्वांसाठीं पसरला आहे. हरिणांसाठीं, गाईगुरासाठीं, सर्पांसाठीं, क्रूर जनावरांसाठीं-मनुष्यासाठीं सर्वांसाठी हा गालिचा परसला आहे. हा हरितवर्णाच्या गादीचा वारस ज्याची इच्छा असेल तो आहे. कोणीहि येवो त्याला तेथें मज्जाव नाहीं.

बा तृणा ! तुझी धन्य आहे. तुला कापतात, जाळतात, खातात. परंतु तूं आपला देह विश्वदेहास अपर्ण केला आहेस. कोणी तुला तुझ्या बाळपणींच कापून टाकतात. कोणी तुला वाढूं देतात व वृध्दपणीं कापतात. वृध्दपणीं तुझी किंमत जास्तच वाढते. तुला बांधतात व आगगाडींत घालून वाटेल तिकडे नेतात. कधीं कधीं रणांगणावर घोडेस्वारांस तुझी फारच जरुर पडते. कधीं कधीं तूं वाढूं लागतोस हे सूर्यासही पाहावत नाही. ऑस्ट्रेलियासारख्या देशात तो सूर्य तू वाढू लागलास म्हणजे तुला जाळून टाकतो. तृणा ! असें आहे तरी तूं जगास कंटाळत नाहींस. पुन:पुन्हां तूं अनंत जन्म घेतोस व जगाचें कल्याण करतोस !

तुका म्हणे गर्भवासी ! सुखें घालावें आम्हासी

« PreviousChapter ListNext »