Bookstruck

गोड निबंध-भाग ३ 32

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हिंदुस्थानांतील संपत्तीचें प्रमाण पाहूं. जास्तीत जास्ती उत्पन्नाची सरासरी काढिली तरी हिंदुस्थानचें सर्वसाधारण उत्पन्न दर माणशीं दर दिवसास १॥ आण्याचें पडतें ! दीड आण्यांत प्रत्येकानें चुरमुरे विकत घेऊन पोटाची खळगी भरावी. अमेरिकेंत प्रत्येकाचें उत्पन्न दररोजचें सरासरीनें १२० आणे, इंग्लंडमध्ये ८० आणे, जपानांत ६८ आणे असें आहे. आणि हिंदुस्थानात दीड आणा ! हर हर ! आम्हांस तर हें दृश्य रडूं आणतें. मग सरकारला काय वाटत असेल तें वाटो.

‘हिंदुस्थानांतील दुष्काळ’ म्हणून एक मराठींत सुंदर पुस्तक आहे. त्यांत असें लिहिलें आहे कीं, पूर्वी शतकांत दोन चार दुष्काळ पडत. परंतु हल्लीं पन्नास वर्षांत ४० दुष्काळ पडतात ! दरवर्षी कोठे दुष्काळ नाहीं असें होतच नाहीं. दुष्काळ पडत आहेत तरी जंगलांची अमर्याद तोड चालली आहेच जुने पाटबंधारे होरुन किंवा नद्या सांचून जात आहेतच. ठिकठिकाणीं जास्त रेल्वे बांधण्यासाठीं म्हणून किंवा वीज निर्माण करण्यासाठीं म्हणून पूल व धरणें बांधून नानाप्रकारची नासाडी चाललीच आहे. बंगालमध्यें दामोदर नदीच्या एका धरणानें ५० लक्ष मण तांदुळाची जमीन बुडून गेली. मुळशीच्या धरणानें उत्कृष्ट पिकाची जमीन अशीच नाहींशी झाली. काय आम्हांला विजेचा प्रकाश खावयाचा आहे ? मोठ्या शहरांतील आगगाड्या, ट्राम, गिरण्या चालाव्या व तेथें विजेची रोषणाई व्हावी हें सर्व खरें. परन्तु हें करतांना अमोलिक धान्य उत्पन्न करणारी जमीन नाहींशी होत आहे. धान्याच्या बाबतींत, हिंदुस्थान दुसर्‍याच्या तोंडाकडे पहात नसे. परन्तु अशा रितीनें जमिनी घेऊन याही बाबतींत, आम्ही कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांच्याकडे भुकेल्या दृष्टीनें पहावयास लागूं.

शेतें नि:सत्व होत चाललीं तरी शेतांस कसदारपणा आणणारीं हाडें प्रत्येक मिनिटास ७ मण याप्रमाणे परदेशांत रवाना होत आहेत. पूर्वी हीं गुराढोरांची हाडें शेतांमधून पडलेलीं असत तीं फुकट जात नसत. तीं शेतांस सुपीक करीत. हे हाडांचे खत शेतांस सर्वोत्कृष्ट. परंतु परदेशीं जाणार्‍या या हाडांस सरकार कोठें बंदी करीत आहे ? हिंदुस्थानांतील हाडेंन् हाडें दिसूं लागली तरी कोण आमची कींव करणार ? हिंदुस्थानांतील गुरेंढोरें अशींच कमी होत आहेत. दर महिन्यास ४५ हजार गायी परदेशांत चालल्या आहेत ! गायी हें आम्हां हिंदूचें खरें धन, परंतु हिंदुस्थानच्या लेंकरांस दुधाचा थेंब उरला नाहीं. हे दुधाच्या सागरांत शयन करणार्‍या नारायणा, आमची करुणा तुजवांचून कोणास येणार ?

देशांत दुष्काळ पडत असले तरी परदेशीं धान्य चाललें आहे. दर महिन्यांस ४॥ लक्ष मण गळिताचीं धान्यें परदेशांस जात आहेत. हिंदुस्थानास लागलेली ही गळती कोण थांबविणार ? हिंदुस्थानाला शेंकडों भोकें पडलीं आहेत, आणि त्यांतून त्याची संपत्ति गळून जात आहे. हिंदुस्थानास स्वराज्य ज्या कधीं काळीं मिळेल त्या वेळेस सर्व शोषलें जाऊन हिंदुस्थान मेलेलें मढें फक्त राहाणार असेंच वाटतें.

« PreviousChapter ListNext »