Bookstruck

गोड निबंध-भाग ३ 44

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सूत्रयज्ञ
महात्माजी दिल्लीस जाऊन आले. या वेळेस ते निश्चयानें गेले होते. दिरंगाईचें काम नाहीं,  स्पष्ट काय तें बोला असें सांगण्यासाठीं ते गेले होते. शेवटीं कांहीहि निष्पन्न झालें नाहीं. हिंदी जनतेनेंच स्वत:ची घटना बनविली पाहिजे व तीच घटना हिंदी राष्ट्र मानील ही काँग्रेसची भूमिका ब्रि. सरकार मान्य करुं शकत नाहीं. अर्थातच पुढील बोलणें खुंटलें. पायाच नाहीं तर इमारत कोठून ?

आतां पुढें काय ? महात्माजी धीरोदात्तपणें निघून आले. पुढचें भवितत्व रामगडला ठरेल. तोपर्यंत काय होतें तें दिसेल. हिंदुमुस्लिम वाटाघाटी ठिकठिकाणीं इतरेजन करणार आहेत; त्यांची फलश्रुति दिसेल. जवाहरलालजींनीं घटना परिषदेशिवाय तडजोड अशक्य असें ठांसून बजावलें आहे. पुढें लढा सुरु होणार का ? सुरु झाला तर त्याचें स्वरुप काय ?

हिंदुस्थानांत अशांतता धुमसत आहे. वादळाचीं पूर्वचिन्हें आहेत. संयुक्तप्रांतांत चहाच्या मळ्यांतील कामगार संप करणार. ठिकठिकाणीं कारखान्यांतील कामगारहि संपाची भाषा बोलत आहेत. कम्युनिस्ट व पुरोगामी गटांची गळचेपी होत आहे. २०-२० वर्षांच्या सजा कठोरपणें म्हातार्‍या कम्युनिस्ट वीरांस दिल्या जात आहेत. साम्यवादी, क्रांतिवादी, सारे संयुक्त प्रांतभर पसरले आहेत. असें टाइम्ससारखीं पत्रें ओरडत आहेत. अहरार पक्षाचे पुढारी गिरफदार होत आहेत. तडजोडीच्या आशेनें आतांपर्यंत ब्रि. सरकार स्वस्थ होतें परंतु आतां दडपशाहीचा वरवंटा कदाचित् जोरानें फिरूं लागेल,  त्यांतून ठिणगी पडेल, आगडोंब पेटेल.

परन्तु केव्हां वणवा पेटणार, आणि कोठें पेटणार ? जेथें जेथें म्हणून जागृति आहे, प्रचार आहे. तेथें तेथें भडके उडतील. उद्यां लढा आला तर खानदेशांत कोठें कोठें पेट घेतला जाईल ? फैजपूरच्या पंचक्रोशींत. ज्या फैजपूर काँग्रेसच्या वेळेस भगिनींनी अनवाणी पवित्र भावनेनें खानदेशभर प्रचार केला; पायांना फोड आले तरी चिंध्या बांधून गाणीं गात हिंडल्या; ध्वजज्योतीच्या मासिक वंदनास सहा सहा कौस सौ. गीताबाईसारख्या भगिनी चिखलांतून पावसाळ्यांत खिरोदे गांवी पायीं जात, त्या भगिनींच्या भोंवतीं ही ज्वाला पेटेल. फैजपूर काँग्रेसच्या वेळेस दे. भ. रावसाहेब पटवर्धन व देशभक्त शंकरराव देव हे खाजगी भाषणांत म्हणाले होते, “फैजपूरला काँग्रेस भरवीत आहोंत. उद्यां लढा येईल तेव्हां फैजपूरचें फौजपूर होवो. येथून स्वातंत्र्यांच्या पलटणी बाहेर पडोत.”

ते शब्द खरे होतील. त्यागमूर्ति दादासाहेबांनी खिरोदें गांव पवित्र्यानें, सेवेनें पेटवला आहे. तेथील भगिनींचा आत्मा जीवंत झाला आहे. गांव-सफाईला, हरिजनांना जवळ घ्यायला, शिकायला, कातायला, सर्व गोष्टींना भगिनी आधीं धांवतात. खिरोद्याचे तरुण व जरा वडील मंडळीहि तेजस्वी भावनांनी उचंबळत आहेत. जवळपासचीं गांवे पेटत आहेत. लोढु भाऊचें रोझोदें, उखाभाइचें सावदें, हिरासींग पवाराचें कुसुंबे, तुळशीरामाचें चिनावनल, बन्सी आण्णाचें व हुनाभाऊचें न्हावी सारीं गांवें पेटत आहेत. तें रावेर जवळचें तेजस्वी वाघोड गांव पेटलें आहे. आसोदें, भालोद सारीं पेटणार !

« PreviousChapter ListNext »