Bookstruck

गोड निबंध-भाग ३ 46

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महापुरुषाचें काम हजारो सेवकांनी मुकेपणें निरहंकारपणें करीत राहिलें पाहिजे. मग तो महापुरुष येतो; एक शब्द बोलतो, एक कृपाकटाक्ष फेंकतो. आणि सारें मांगल्य फुलतें, सारें वैभव उभवतें. गुजराथेंत सेवक कामें करीत असतात. सरदार मधून जातात. जलसिंचन करुन येतात. बार्डोलींत महात्माजी थोडे दिवस जाऊन येतात. सेवेनें आधीं वातावरण तयारच असतें.

विधायक सेवा अनेक प्रकारची आहे. साक्षरताप्रसार, हरिजनसेवा, सफाई, खादीप्रसार, ग्रामोद्योग, हिंदुमुस्लीम ऐक्य, कोणत्या तरी सेवेंत आपण रमलें पाहिजे. परंतु अशा सेवेत सर्वस्वी सारे कसे वाहून घेणार. सेवक असतील ते त्या सेवेंत रमतील. जनतेनें त्यांना सहानुभूति द्यावी.

परंतु, आपणां सर्वांस एक गोष्ट करतां येईल. रोज यज्ञ म्हणून सूत कांतणें सर्वांस जमेल. स्त्री पुरुष, लहान थोर, तरुण वृध्द सर्वांना हें जमेल. यज्ञ म्हणजे झीज भरुन काढणें. राष्ट्राची झीज आपण रोज भरुन काढली पाहिजे. हा नित्य यज्ञ हवा. खादीचीं उत्पत्तिकेंद्रे आहेत. खादी थोडी महाग पडते. परंतु आपण कोट्यवधि लोकांनी मिळेल तो फुरसतीचा वेळ जर सूत कातण्यांत दवडला व तें सूत यज्ञ म्हणून खादीकेंद्रास दिलें तर खादीची उत्पत्ति वाढून खादीहि थोडी स्वस्त होईल. पारोळें तालुक्यांत खादी केंद्र आहे. ३० हजार रुपयांची तेथें खादी उत्पन्न होते. आपण खानदेशांतील लोकांनीं जो जो रिकामा वेळ असेल त्या वेळेस सुरेख सूत कातून त्याच्या नीट लड्या करुन जर हें सूत मोफत या खादीकेंद्रास पाठवूं, तर किती छान होईल ? हीच खादी पुन्हां आपण विकत घ्यावयाची. रिकामा वेळ राष्ट्राची झीज भरुन काढण्यांत दवडूं या.

एका अमळनेर शहरांत २३ हजार लोकसंख्या आहे. त्यांतील ५००० लोक असे कां निघूं नयेत कीं ते दररोज ४०/४५ तार काततील ? दररोज असें कातूं तर महिन्याला ६४० च्या दोन गुंड्या जवळजवळ ४०० शेर होईल. प्रत्येक तालुक्यांत असें यज्ञीय सूत कातणारे व्रती लोक निघाले तर एका खानदेशांत ५ हजार शेर सूत महिन्यास जमेल. वर्षाला ६० हजार शेर झाले. ६० हजार शेर सुताची लाख दीड लाख रुपयांची खादी होईल.

हें सारे सूत मोफत म्हणून द्यायचें, यज्ञ म्हणून द्यायचें; देशासाठीं ही आपली देणगी. रिकाम्या वेळांत देशाची झीज भरुन काढली. देशाची अब्रू झांकली. ६० हजार शेर सूत बिन वेतनाचें यज्ञीय व त्यांत गरीब माणसांना वेतन देऊन कातून घेतलेलें सूत मिसळावें. खादी थोडी स्वस्त होईल. तीच मग गांवोगांव जाईल. कातणार्‍या बायामाणसांची मजुरी कमी न होतां, खादी स्वस्त व्हावयास हवी असेल तर फुरसतीच्या वेळेस सूत कांतून देण्यासाठी कोट्यवधि बंधु-भगिनी उभ्या राहिल्या पाहिजेत. रिकामा वेळेच नाहीं. हातांत टकली वा चरखा फिरतच आहे. ‘जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती’ असें चरखा टकलीस म्हणूं या.

« PreviousChapter ListNext »