Bookstruck

गोड निबंध-भाग ३ 50

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अशा बेकारीला, व उपासमारीला कंटाळून मनावर विषारी इंजक्शनें ते देत असतात. ठायीं ठायीं असे लोक आहेत. यांना जग काय, कोठें जात आहे, कांही माहीत नसतें. अजून ब्राह्मणाच्या तार्‍यांतच ते असतात. आपण गुलाम आहोंत ही गोष्टहि ते विसरुन गेले आहेत. मुसलमान तेवढा वाईट एवढाच एक वेद ते घोकतात व मुलांस घोंकवितात. कांही विद्यार्थी मला म्हणाले, “तुम्ही आमच्या शाळेत या. विद्यार्थी फेडरेशन सांगा, नवीन विचार सांगा. आमच्याकडे कुणी येतच नाही.” मी त्यांना येण्याचें कबूल केलें. मी इकडून तिकडे येतांना कदाचित् रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागांत हिंडून येईन. उन्हाळ्याच्या सुटींत खानदेशांतील काँग्रेसप्रेमी विद्यार्थ्यांच्या सेना बरोबर घेऊन इकडील खेड्यापाड्यांतून गाणीं गात हिंडावें असें मनांत येतें.

इकडे हरिजनांत आंबेडकर प्रचार, ब्राह्मणांत हिन्दुमहासभा प्रचार, इतरेजनांत कांही प्रचारच नाही. रिक्रुट भरती इकडे होत आहे. तुम्ही जर त्यांना म्हणालां कीं कां जातां रिक्रुट भरतींत ? तर ते विचारतात, “आमचा पोटाचा प्रश्न आज तुम्ही सोडवतां का ? आम्ही मरुं तर मरु परन्तु घरीं पेन्शन घेत जाईल, जमिनी इनाम मिळतील.” इकडे कांही नांही तसे लोक रिक्रुटांत जातात. घरचीं उपाशीं पोरेंबाळें पाहून ते परकी सत्तेखालीं लढायला जातात. परन्तु ब्रिटिश सरकारचे हजारों कारकून व नोकरचाकर हेंच नाहीं का करीत ? रिक्रुट भरतींत जाणारे व सरकारच्या इतर नोकर्‍या करणारे, यांत फरक काय ? सारे पोटासाठी बि० साम्राज्यशाहीचीं चाकें चालवीत आहेत.

अशा ह्या सर्व निराशामय परिस्थितींत आशेलाहि जागा आहे. माझ्याच ह्या सनातनी गांवात एक माझा जुना जरा घरचा सुखी मित्र श्री. रावजी केळकर यानें अधिक मासनिमित्त हरिजन भगिनी घरीं बोलावून, त्यांना खणाचीं वायनें आपल्या आईकडून देवविलीं, त्यानें आईला पटविलें, व त्या माउलीला तो सध्दर्म पटला. गांवांत जरा कुईकुई झाली. परन्तु बहिष्कारापर्यंत मजल गेली नाहीं.

याच दापोली तालुक्यांत दापोलीस श्री. भार्गव फाटक म्हणून एक तरुण आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्राण, महान् सेवक अप्पासाहेब पटवर्धन यांचे हे निष्ठावंत अनुयायी. यानीं दापोली येथें सुंदर-चर्मालय सुरु केलें आहे. मागील वर्षी डिसेंबरांत पंतसचीव बाळासाहेब खेर यांचे हस्तें ते उघडण्यांत आले. जवळ सुरुचें दाट जंगल आहे. अशा सुंदर जागीं हे चर्मालय आहे. या फाटकांच्या घरीं मीं लहानपणीं फणस, आंबे खाण्यासाठीं गेलेलों आहे. त्यांची सेवा पाहून मी नम्र झालो. प्रथम ते चामडी सोलण्याचें काम शिकून आल्यावर त्यांना अनेक श्रीमंत, मदत देऊन आमचे येथें चर्मालय काढा असें सांगत होते. परन्तु श्री. फाटक म्हणाले, “माझ्या जन्मग्रामीं, जेथे मला विरोध; तेथेंच मी आरंभ करीन, तेथेंच माझी कसोटी.”

« PreviousChapter ListNext »