Bookstruck

खेळ कुणाला दैवाचा कळला !

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

खेळ कुणाला दैवाचा कळला ?*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
'खेळ कुणाला दैवाचा कळला ? दैव लेख न कधी कुणा टळला ....'
हे त्रिवार सत्य आहे ...! ,
दैवाचा लेख आजवर कुणाला ही टळलेला नाही . आजवर दैव लेख कुणीही वेळेआधी वाचू शकलं नाही . याला देव सुध्दा अपवाद नाहीत , आपण तर साधारण मनुष्यच आहोत .
रामायणात एकीकडे श्री रामाच्या राज्यभिषेकाची तयारी तर दुसरीकडे रामाला वनवासात पाठविण्याचा डाव त्यांच्या सावत्र आई ने रचला . आणि लगेच रामाला  वनवासात जावे लागले ..
दैवाचा लेख देवताही बदलू शकले नाही .
प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक रहस्यमय चित्रपट .. आपापल्या चित्रपटाचा प्रत्येक जण मुख्य कलाकार असतो . प्रत्येकजण आपापल्या  जीवनात येणाऱ्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो . जीवनात एक कोडे सोडवत नाही तोपर्यंत दूसरे तयारच असते .. असा रहस्यमय चित्रपटासारखे प्रत्येकाचे आयुष्य असते ..
'पडद्यावरील चित्रपटातील नायक नायिकेला चित्रपटाची कहाणी माहित असते.' पण प्रत्यक्ष जीवनातील भूमिका करणार्या नायक नायिकेला आपल्या जीवनाची कहाणी वेळेआधी माहित नसते .
मनुष्य जन्माला यायच्या आधीच तर
त्याचं जीवनरुपी रहस्यमय पुस्तकात दैव लेख लिहून ठेवले असतात . त्यातील काही लेख सुखाचे , काही दुःखाचे, काही आनंदाचे तर काही लेख संघर्षाचे असतात . त्यातील प्रत्येक भाग म्हणजे हिशोब असतो आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचा आणि ऋणानुबंध असतो  नात्यांचा ..  कर्माचे फळ आणि नात्यातील ऋणानुबंध कोणालाही चुकत नाही ... मग ते नाते कोणतेही असो ...
प्रत्येकाच्या आयुष्याच्या पुस्तकातील पाठ निरनिराळे असतात ... आणि त्यानुसार प्रत्येकाच्या परीक्षा वेगवेगळ्या असतात . म्हणून तिथं कोणी कोणाचीही नक्कल करून शकत नाही .. ज्याची त्याची परिक्षा ज्याला त्यालाच द्यावी लागते.
एकाच आईच्या कुशीतून एकाच वेळी जन्मलेले दोन जुळ्या बालकांचे भाग्य निरनिराळे असते ..
प्रत्येकाचे कर्म बंधन निरनिराळे असतात . कुणाच्या दैवामध्ये  दुःखाचे क्षण जास्त तर कोणाच्या दैवामध्ये सुखाचे क्षण जास्त !
आपण सर्वत्र पाहतो एकाच घरातील भावंडे एक इंजिनिअर, एक वकील, एक शिक्षक तर एक शेतकरी . सर्वच आई-वडील आपल्या सर्वच पाल्यांना सारखेच संस्कार आणि सारखेच पालनपोषण करतात . पण प्रत्येकाला आपापले कर्मफळ खेचत असते .जिथे आपले ऋणानुबंध कर्मफळानुसार लिहलेले असतात . तिकडेच आपला कार्यभाग नेमलेला असतो .
प्रत्येक मूल त्याच्या दैव लेखाप्रमाणे घडत असते .
कुठं दैव साथ देत तर कुठं दैव पाठ फिरवतं ... कुणाला सर्वच गोष्टी सहज प्राप्त होतात तर कुणाच्या हातात येऊन निसटून जातात ..
एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षा असते दैवा कडून परिक्षेत ८० टक्के मार्क मिळतील , आणि त्याला ९० टक्के मार्क पडतात .. आणि एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षा असते ९० टक्के मार्क मिळतील पण त्याला पडतात ८० टक्केच ! यातील एक जण खुश होतो आणि एक जण दैवाला दोष देत रहातो .
"कुणी दैवावर खुश असतं तर कुणी दैवाला आयुष्यभर दोष देत राहतं .."
   तसं पाहिलं तर सुखदुःख हा खेळ असतो आपल्या मनातील विचारांचा .. दैवावर आणि एकमेकांवर ठेवलेल्या अपेक्षांचा ...
आयुष्यातील घडणाऱ्या घटनांना आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर आपलं सुखदुःख अवलंबून असते . कुठल्याही घटने कडे अथवा परिस्थिती कडे आपण जर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला दुःख होईल आणि जर आयुष्यात प्रत्येक घटने कडे पहायचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर आपण दुःखी न होता त्यातून सहज मार्ग काढू शकतो ..
गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले आहे "जे होते ते चांगल्यासाठीच "!
अपेक्षा ठेवायच्या असतील तर फक्त आपल्या मेहनतीवर आणि विश्र्वास ठेवायचा तो आपल्या कर्मांवर !
प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ आपला दैव लेख लिहीत असते ..
भगवंताचे गीतेमधले बोल आहेत "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सग्डोऽस्त्वकर्माणि।।
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖✍🏻 Sks@
©®

Chapter ListNext »