Bookstruck

सुख आणि दु:ख

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रा. प्रविणकुमार हेमचंद्र वैद्य
(जयसिंगपूर)

जीव आणि ज्ञान यांचा अनादि अनंत संबंध आहे. जीव आहे पण ज्ञान नाही असे कधी झाले नाही, होत नाही, होणार नाही. ज्ञान जीवाच्या प्राप्त जन्म व इंद्रिये यांच्या तरतमतेनुरूप ते कमी-अधिक असू शकते. पण जीव आहे आणि तो सर्वथा ज्ञानशून्य आहे असे कधीही आढळत नाही. एवढेच नव्हे तर केवळ एकच स्पर्शनेंद्रियधारक जीव एवं वनस्पतीला, अग्निला, वायुला, पाण्याला देखील ज्ञान असते हे आता अनेक प्रयोगांती शास्त्रज्ञांनी नव्याने सिद्ध केले आहे, मान्य केले आहे. वस्तुत: ते सर्वज्ञांनी कित्येक हजार वर्षापूर्वी सांगितले होते. पण त्यावरचा डळमळीत विश्वास आता सिद्ध झाला आहे.

शूद्र जीवाला सुखदुःखाचे अनुभव ज्ञानानेच होते. पण प्रगत जीवांना त्याची मीमांसा करता येते, वाढविता येते. त्याद्वारे सुखाचे अनुभव करता येते, यावरून असा निष्कर्ष निघतो की, ज्ञान हे सुखाचे व अज्ञान हे दु:खाचे मूळ कारण आहेत.

मीमांसा: व्यवहारात आपण एखाद्याला तुलनेने. तरीही सामान्यत: कोणालाही अज्ञानी, मूर्ख म्हटलेले आवडत नाही, जरी तो तसा असला तरी, शहाण्याला कोणी मूर्ख म्हणेल तर तो मनाशी असा विचार करेल की, अन्यत्र जे काही थोर ज्ञानी आहेत त्यांच्या तुलनेत मी मूर्ख असू शकतो तेव्हा त्याबद्दलचा विषाद काय मानायचा! ह्या उलट एखाद्या जातिवंत म्हणजे खर्‍याखुर्‍या मूर्खाला 'मूर्ख' म्हणून संबोधताच तो अंगावर धावून येईल. कदाचित जीव घेईल. तेव्हा सावधान! सुबुद्ध मानवाने जन्माला येऊन जर काही सार्थक्य साधावयाचे असेल तर त्याने इतर सर्व उद्योग गौण करून ज्ञान संपादन करावे, 'ज्ञान' मग ते कोणत्याही विषयाचे असो. आनंद व सुखकारक असते.

    ज्ञान समान न आन जगमे सुखको कारण ।
ज्ञानासारखी सुखकारक अशी दुसरी कोणतीही वस्तू नाही.        

    नही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
ज्ञानापेक्षा अधिक पावित्र्य, मांगल्य दुसर्‍या कशातही नाही.

दिवस उजाडताच आपणाला वर्तमानपत्र हवे असते कारण विश्वातील घडामोडींच्या ज्ञानासाठी आपला जीव आसुसलेला असतो, सुबुद्धाला सर्वच गूढ आणि अकल्पिताचे औत्सुक्य सतावीत असते व त्याच्या आकलनासाठी अनेक ग्रंथ वाचतो तथापि त्याची पिपासा शांत होत नाही, पण जेव्हा हवे ते सापडते तेव्हा त्याच्या आनंदाला पार नसतो. काही आपल्या आवडत्या विषयाचे सखोल अध्ययन करण्यात सबंध हयात घालवितात, त्यांच्या आनंदाला पार नसतो.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर किंवा अन्य साधुसंतांना जे ज्ञान अपेक्षित आहे ते केवळ 'आत्मज्ञान' कारण त्यावरच जीवाचे सुख-दुःख, बंधन-मोचन, हिताहित अवलंबून असते. इतर विषयाचे ज्ञान फारतर या जन्मातील प्रतिष्ठा आणि आधिभौतिक सुखाला कारण ठरेल.
         
         धनकन कंचन राजसुख सबही सुलभ करजान ।         
         दुर्लभ है संसार में एक यथार्थज्ञान ॥


या संसारात धन, सुवर्ण, राजसुख, अधिकार सर्व काही सुलभ आहे. दुर्लभ आहे ते 'यथार्थज्ञान'. हे यथार्थज्ञान म्हणजे जीवन मुक्ततेचे ज्ञान ते नसेल तर जन्म व्यर्थ गेला असे समजावे.   

         अध्ययनं एवं ध्यानम् ।

ज्ञानार्जनाच्या आनंदाची बरोबरी दुसरी कोणतीच क्रिया करू शकत नाही. त्याअर्थी अज्ञानरूप राक्षसाचा नि:पात केवळ ज्ञानरूप तलवारीनेच शक्य आहे. 

« PreviousChapter ListNext »