Bookstruck

राजा शुद्धमती 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणांस असे दिसून येईल की, सर्व माणसांच्या वाटयास दु:ख आले आहे. जरी काही लोक सुखात व वैभवात दिसले तरी त्यांस दु:खाने सोडले आहे असे नाही. शारीरिक रोग कोणास सुटले आहेत? मानसिक चिंता कोणास व्यग्र व व्यथित करीत नाहीत? मरण तर सर्वांनाच ग्रासावयास टपले आहे.

जर सर्वच जण या मर्त्य भूमीत दु:खात व विपत्तीत आहेत, तर अशा परिस्थितीत दुस-याने दिलेल्या साहाय्याची किंमत फार थोर आहे. आपल्या विपत्तीत दुस-याने दाखविलेल्या सहानुभूतीची व साहाय्याची जशी आपणास किंमत वाटते, त्याप्रमाणेच दुसरा विपत्तीत पडला असता त्यास आपण जर सहानुभूती दाखविली, त्यास मदत केली तर त्याला किती आनंद होईल? आपण सुखात असू त्या वेळेस दु:खी दरिद्री लोकांची सेवा आनंदाने आपण केली पाहिजे; परंतु ज्या वेळेत आपण स्वत: दु:खात असू त्या वेळेसही आपले दु:ख दूर सारून दुस-याच्या दु:खाच्या दूरीकरणार्थ आपण धावून जावे.

आपल्या या परमपूज्य भरतखंडात दुस-याच्या दु:खाने दु:खी होणारे व ते दु:ख दूर करण्याकरिता झटणारे, प्रसंगी प्राणदान करणारे असे थोर महात्मे कितीतरी होऊन गेले आहेत. अशाच एका थोर राजाची गोष्ट आज मी सांगणार आहे.

फार प्राचीन काळी आपल्या देशात शुध्दमती म्हणून एक राजा होऊन गेला. हा राजा दयाळू व उदार होता. लहानपणापासून त्याचे मन कोमल होते. हृदय हळुवार होते. लहानपणी मृगया करण्यास त्याने जाऊ नये, कारण कोमल हरणांचे बाणविध्द देह पाहून त्याचे स्वत:चे प्रंचप्राण कासावीस होत. झाडांचे पल्लव त्याने खुडू नयेत, पुष्पे त्याने तोडू नयेत, का? तर त्यास दु:ख होईल म्हणून! लहानपणापासून अशी ही त्याची वृत्ती. हाताखालच्या नोकरमंडळींचे मन कठोर शब्दांनी तो कधी दुखवीत नसे. कठोर शब्द बोलणे म्हणजे देवाघरी पातक केले असे होईल असे तो म्हणे.

राजपदप्राप्ती झाल्यावर राजाच्या उदारपणाची सर्वत्र ख्याती झाली. त्याच्या औदर्याची सर्व मुक्तकंठाने स्तुती करू लागले. त्याचा यशपरिमल दशदिशांत भरून राहिला. जो दुस-याच्या दु:खाने खिन्न होतो, जो गरिबांचा कैवार घेतो, अनाथांचा जो आधार, अशांच्या गुणांचे संकीर्तन विश्वजन का करणार नाहीत? अशा थोर पुरुषास दुनिया दुवा का देणार नाही?

राजा गोरगरिबांस सर्व प्रकारची भिक्षा वाटीत असे. हे काम तो आपल्या हाताखालच्या लोकांस सांगत असे. देणग्या वगैरे देण्याचे काम तो जातीने करी. कोणीही अतिथी त्याच्या दारातून विन्मुख होऊन परत गेला नाही. तो स्वत: भिक्षागृहात जाई व तेथे कोणी अनाथ निराश्रित नाही अशी खात्री करून घेई.

« PreviousChapter ListNext »