Bookstruck

राजा शुद्धमती 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

राजा म्हणाला, ''प्रिय प्रजाजनहो व माझ्या मंत्र्यांनो, आपण हे सर्व सांगता हे माझ्यावरील अंधप्रेमामुळे सांगता. परंतु थोडा विचार करून पाहा बरे! शरीर हे नाशवंत आहे. निश्चयासाठी, स्वत:च्या वचनासाठी जो शरीरावर पाणी सोडतो, तो इंद्रालाही पूज्य होतो. तो निश्चय पवित्र असला म्हणजे झाले. दानासारखे महापुण्य दुसरे काणते आहे? या ब्राह्मणास जे सुख आजपावेतो मिळाले नाही व जे मी आजपर्यंत उपभोगिले, मनमुराद उपभोगिले, ते सुख या ब्राह्मणास आता देण्याची सुसंधी प्राप्त झाली यात वाईट वाटण्यासारखे काही नसून उलट ही आनंदाची पर्वणी आहे. नश्वर शरीर देऊन चिरंतन टिकणारी सत्कीर्ती व पुण्य यांची जोड होत असेल तर त्यात अयथार्थ व अविचारचे असे काय आहे? दधीची ऋषीने आपली स्वत:ची हाडे विश्वाचा त्रास जावा म्हणून नाही का इंद्राच्या हवाली केली? श्रियाळाने पोटचा गोळा दिला, शिबी राजाने मांडीचे मांस हसत कापून दिले. मयूरध्वज राजाने आपले अर्धांग करवतीने करवतून दिले, जीमूतवाहन राजाने नागांचा प्रतिपाल करण्यासाठी गरुडास आपला देह दिला. थोरामोठयांची ही उदाहरणे माझ्यासमोर आहेत. शरीर हे मृण्मय आहे; मातीचे शरीर मातीत आज ना उद्या जाणार; हे कमलपुष्पांप्रमाणे असलेले डोळे आणखी थोडया दिवसांनी लोळयागोळयाप्रमाणे होतील. शरीराचे सौंदर्य व या इंद्रियांची शक्ती ही क्षणिक आहेत. यांचा मोह कशाला धरावा? धर्म हा सत्य व शाश्वत आहे. शाश्वत धर्माचा संग्रह करण्यासाठी मी अशाश्वत देऊन टाकीत आहे, यात वेडेपणा का आहे? सांगा.'' राजाचे हे उदात्त भाषण ऐकून सर्व विस्मित झाले. नारीनर रडू लागले; त्यांच्या डोळयांत अश्रू आले.

राजास पुन्हा एकदा त्याचे मंत्री म्हणाले, ''राजा, तू हे सर्व कशासाठी करतोस? आपल्या जीविताकरिता, सौंदर्याकरिता, शक्तीकरता, कीर्तीकरिता? तुझा हेतू तरी काय?''

राजा म्हणाला, ''ह्यांपैकी कशासाठीही नाही. हे सर्व दान करून जो एक सात्त्वि आनंद मिळतो, त्यासाठी मी हे करण्यास उद्युक्त आहे.''

राजाच्या शस्त्रवैद्यास बोलविण्यात आले. या शस्त्रवैद्यांचे हात ते कर्म करण्यास धजेनात. परंतु करणार काय? मोठया कष्टाने त्याने राजाचा एक कमलनेत्र काढला. राजाने तो डोळा ब्राह्मणाच्या खाचेत बसविण्यास सांगितले. एखाद्या नीलोत्पलाप्रमाणे तो डोळा ब्राह्मणास लागला. दुस-या डोळयाने त्या याचकाकडे पाहून राजा म्हणाला, ''आपणांस माझा डोळा फारच सुंदर दिसतो; दुसरा डोळा पण तुम्ही घ्याच.'' राजाने दुसरा डोळा पण ब्राह्मणास दिला. राजाच्या खाचा रक्ताने भरून गेल्या व ब्राह्मणाच्या मुखमंडलावर ते सुंदर विशाल डोळे दोन ता-यांप्रमाणे शोभू लागले.

राजाचे चर्मचक्षू गले, पण ज्ञानचक्षू त्यास मिळाले. त्या राजाच्या अंत:करणात डोकावून पाहा. परमेश्वरकृपेने त्यास दिव्यज्ञान झाले. त्याच्या अंतरी ज्ञानदिवा प्रशांतपणे प्रकाशू लागला. ज्या दृष्टीने केवळ सत्य दिसते, अशी दैवी दृष्टी देवाने त्यास दिली. त्या राजाने पुढे काही वर्षे न्यायाने व नीतीने राज्य केले आणि लोक त्याच्यापासून जगात कसे राहावे, परमेश्वर कसा मिळवावा, हे शिकते झाले.

थोर लोक दुस-याचे दु:ख स्वप्राणत्यागानेही दूर करण्यास मागेपुढे पाहात नाहीत, असा हा भारतवर्ष होता. हाच मनाचा थोरपणा आज भारतवर्षात कितपत दृष्टीस पडतो? आपण पैशाने गरीब झालो आहोतच; आता मनाची श्रीमंती, हृदयाचीही श्रीमंती, ती पण आपण गमावून बसत आहो का? प्रत्येकाने विचार करून पाहावे झाले.

« PreviousChapter ListNext »