Bookstruck

किसन 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

लिली तर दोघांची मैत्रीण, तिला किसन जरा जास्त आवडे. कारण तो नाना प्रकारचे खेळ शोधून काढी. टेकडीवर सर्वांत आधी तो चढे. समुद्रात पोहण्यात तो पटाईत. म्हणून हा चपळ खेळाडू किसन तिला आवडे. ती म्हणाली, ''किसनदादा, रडू नको. अरे मी तुम्हां दोघांची लहानशी बायको, तर मग झाले-भांडू नका. आपण खेळू.'' लिलीच्या काल्पनिक जगात सर्व गोष्टी त्या वेळेस शक्य होत्या. व्यावहारिक जगाच्या घडामोडी अजून तिच्या मनास कोठे माहीत होत्या? लिलीच्या शब्दांनी किसन आनंदी झाला. ती तिघेजण गमतीचे खेळ खेळनू रात्र पडू लागल्यावर आपली माघारी गेली.

बरीच वर्षे गेली. लिली व किसन यांचाच शेवटी विवाह झाला. कारण लिली काही घरची फार श्रीमंत नव्हती. तेव्हा रतनच्याच घरी देण्यास पैशाची अडचण आली. किसनचे घर लहानसे होते. त्याला रोज कामधाम करावे लागे. लिली पण घरी शिवणाचे वगैरे काम करी व या प्रकारे त्यांचे नीट चालले होते. किसन दमूनभागून घरी आला म्हणजे लिलीने गोड बोलून व काही खावयास देऊन त्याचा श्रमपरिहार करावा. घराशेजारी लिलीने लहानशी बाग केली होती. तेथे मोगरी, शेवंती लावल्या होत्या. शेवंतीची ती पिवळी फुले सोन्यासारखी शोभत. लिली मोठी टापटिपीची व गृहदक्ष गृहिणी होती. मिळेल त्यात मौज करावी व भालप्रदेशावर कधी म्हणून तिने आठी दाखवू नये. आठयांचे गाठोडे तिने समुद्रात फेकून दिले होते.

रतनची व यांची आता कधी गाठ पडत नसे. रतनने विवाह केला नाही. रतनचे आईबापही त्यास सोडून गेले. रतनच्या घरात संपत्ती भरपूर होती; परंतु तो उदासीन असे. रात्र झाली तरी तो त्या टेडीवर बसे व 'मी तुमची दोघांची लहानशी बायको होईन.' हे शब्द तो आठवी, लहानपणच्या सर्व गोष्टी त्याला आठवत व त्या समोर पसरलेल्या सागराकडे त्याचा हृदयसागर मिळविण्यासाठी अश्रुपुराने बाहेर येई.

किसन यास दोन मुलगे व एक मुलगी अशी तीन गोजिरवाणी नक्षत्रासारखी मुले होती. कोणीही त्या मुलांस उचलावे, त्यांचे मुके घ्यावे. सुंदर फुलास कोण घेणार नाही? शिरावर धरणार नाही? सुंदर वस्तू जगाचे दु:ख दूर करते.

सुंदर वस्तू सुंदर असण्यानेच धन्य आहेत. तिने आपल्या सौंदर्याने समस्तांस रिझवावे व संसारास शोभा आणावी. किसन याची सोन्यासारखी मुले-पण किसन दिवसेंदिवस गरीब होत होता. मोलमजुरी अलीकडे भरपूर मिळत नसे. थंडीत त्या गोजि-या बाळांचे देह आच्छादण्यास पुरेसे कपडे नसत. त्यांना दूध वगैरे देता येत नसे. खेळणी आणता येत नसत. त्यामुळे किसन कष्टी होई. लिली त्याचे समाधान करी, परंतु तो असमाधानीच राही.

एक दिवस किसनच्या मनात आले. आपण व्यापारास जावे. दूरदूरच्या देशांत जाऊन व्यापार करावा व श्रीमंत व्हावे. 'साहसे श्री: प्रतिवसति।' साहस केल्याशिवाय भाग्यदेवता येणार कशी? येथे माश्या मारीत बसून काय होणार? धाडस करावे असे त्यास वाटले. त्याने आपला विचार लिलीस सांगितला. त्याबरोबर ती चरकली व म्हणाली, ''नको गडे! असे वेडेवाकडे धाडस करू नये.

« PreviousChapter ListNext »