Bookstruck

स्वतंत्रतादेवीची कहाणी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हळूहळू भाग्यबाईच्या नगरातील लोकांनी आपले धंदे सोडले, गोरा व्यापारी स्वस्त व भरपूर माल आणी व विकी. गो-याची सत्ताही पैशाबरोबर वाढू लागली. वखारीच्या रखवालदारीसाठी तो प्रथम शिपाई-प्यादे ठेवू लागला. हेच शिपाई तो दुस-यांना पण मदतीसाठी कधी कधी देई. गोरा मोठा हुशार, शिपाई चांगले शिकवी. त्यांना कवायती सांगे, चांगली शस्त्रास्त्रे देई. भाग्यबाईच्या नगरात कोणाला शिपाई लागले तर गो-या व्यापा-याजवळ मागत. गो-याचे सैन्य वाढू लागले. आपले शिपाई नाहीसे होऊ लागले. असा गो-याचा व्याप वाढत होता. हळूहळू एकेक वेढा भाग्यबाईच्या नगराला देत होता.

भाग्यबाई भोळी व तिची मुले पण भोळी. हळूहळू ती परावलंबी होऊ लागली. त्यात या गो-याने त्यांना दारू व विडीची व्यसने लावली. चहा विडयांची चटक लावली. त्यांना शुध्द राहात नाहीशी झाली. गो-याने एकेक घर, एकेक शेत सर्व बळकावले.

आता तो तो-याने राहू लागला. लोकांच्या डोळयांत लख्ख प्रकाश पडला. अरे, आपण मायेला भुललो, परावलंबी झालो, त्यांचे शिपाई ठेवू लागलो, त्यांचा माल घेऊ लागलो, आपण होऊन त्यांच्या हातात आपली शेंडी दिली. अरेरे! आता काय करावे? चला, पुन्हा आपले उद्योगधंदे सुरू करू-चला, म्हणा हरहर महादेव-घ्या देवाजीचे नाव, घ्या अल्लाचे नाव.

परंतु गोरा व्यापारी कसला वस्ताद. तो व्यापा-यांचा आता राजा झाला. फौजफाटा ठेवू लागला; तागडी जाऊन तरवार दिसू लागली. गो-यांचे जातभाई टोळांसारखे सर्वत्र हिंडू-फिरू लागले. त्यांच्या हातात व्यापार गेला; त्यांनी सर्व धंदे घेतले. जेव्हा भाग्यबाईच्या मुलांचा निश्चय या गो-याच्या जातभाईस कळला, तेव्हा गोरे गुरगुरू लागले. आम्हांला धंदे करू देईनात. आमच्या मालावर जकाती बसविल्या, शेकडो नियंत्रणे घातली. मलमल विणणा-यांनी मलमल विणू नये, गलबते बांधणा-यांनी गलबते बांधू नयेत. सर्वत्र मज्जाव! विणक-यांनी संतापाने आपआपले आंगठे तोडले. ज्या बोटांनी आम्हांला मलमल विणू देत नाही ती बोटे काय शोभेला ठेवायची? त्यांना संताप आवरेना, क्षोभ आवरेना. टाकली स्वत:चीच बोटे तोडून, चावले स्वत:चेच दातओठ-परंतु गो-याला त्याचे काय होय! तो आपला फिदीफिदी हसे व दु:खावर डागण्या देई. त्यांचे एका गोष्टीकडे लक्ष असे. ते म्हणजे पैसा. पैसा हा त्यांचा देव. तो पैशाशी बसे, पैशाशी उठे. असे त्याचे चालले.

भाग्यबाईची बाळे दीन दिसू लागली. तिला स्वत:ची चूक समजली. अरेरे, उगीच मी गो-या पायांना येथे येऊ दिले. दाढीवाले, टोपवाले आले तरी तेही पत्करले. त्यांनी मला तितके छळले नाही, जितके हा छळतो. आता काय करावे? आता रडावे. केली चूक नि जन्माचे दु:ख! भाग्यबाई म्लान झाली. तिची मान खाली झाली. तिच्या तोंडावरचे ते दैवी प्रसन्न तेज लोपले. तिच्या लावण्याला अवकळा आली. ती दु:खीकष्टी-दीनवाणी झाली. आपल्या मुलाबाळांचे हात पाहून तिला वाटे 'मरून जावे आता. कोठे माझ्या मुलांची विद्या, कोठे त्यांचे ज्ञान, कोठे त्यांचे शील, कोठे त्यांची संपत्ती? सर्व-सर्व या चोरांनी नाहीसे केले. आत, बाहेर, जनात व मनात नागविले. अरेरे! कोठे त्या दुधातुपाच्या नद्या, कोठे ते खंडोगणती धान्य! कोठे त्या कला, कोठे ते सुखभोग-अरेरे! नंदनवनाला यांनी स्मशान केले; भरल्या गोकुळाचा मसणवटा केला. बाळांनो, सोनुकल्यांनो, नाही रे मला तुमचे हाल पाहवत!' असे ती म्हणे व आपल्या डोळयांतून टिपे काढी. खरोखर वै-यावरही असा प्रसंग येऊ नये.

« PreviousChapter ListNext »