Bookstruck

राम-रहीम 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शिक्षक : खाली बैस. तुला पोराला काय समजते? संघटना म्हणजे काय पाप आहे?

राम : संघटना दुस-याच्या द्वेषासाठी नको, शेजारी शेजारी राहणा-यांचा द्वेष शिकविणे पाप. निदान आम्हां मुलांना तरी या नरकात, या अग्नीत फेकू नका.

शिक्षक उपहासाने हसले. रामला वाईट वाटले. तो त्या शिक्षकांच्या तासाला जातनासा झाला. ते विष त्याला सहन होत नसे. त्या तासाला वाचनालयात जाऊन 'हरिजन' वाची, 'सर्वोदय' वाची, 'क्रांती' वाची. हेडमास्तरांच्या कानांवर ही गोष्ट गेली. ते रामला म्हणाले, ''वर्गात बसले पाहिजे. शिस्त सांभाळली पाहिजे.'' राम म्हणाला, ''मग ती प्रार्थना तरी बंद करा. शिक्षकांची जाहिरात देताना इतर पदव्यासंबंधी लिहिता; परंतु तो मुलांत भेदाचे विष पसरविणारा असता कामा नये, अशीही महत्त्वाची एक अट का घालीत नाही ?'' हेडमास्तर म्हणाले, ''तुम्हाला अजून जगाचा अनुभव यायचा आहे. शाळा चालवताना संस्था चालवताना, काय अडचणी येतात, तुम्हांला काय कळणार ? जा, वर्गात बस. त्या विषाचा परिणाम होऊ देऊ नको.''

राम म्हणाला, ''माझ्यावर नाहीच होणार. इतर मुलांचे काय ? त्यांच्या जीवनाला हे द्वेषाची कीड लावणार, तुम्हांला काय कळणार ? जा, वर्गात बस. त्या विषाचा परिणाम होऊ देऊ नको.''

राम म्हणाला, ''माझ्यावर नाहीच होणार. इतर मुलांचे काय ? त्यांच्या जीवनाला हे द्वेषाची कीड लावणार, तुम्हाला वाईट नाही वाटत ?''

हेडमास्तर म्हणाले, ''तू माझा गुरू आहेस. परंतु माझे ऐक. माझ्यासाठी वर्गात बसत जा.''

राम वर्गात बसू लागला. त्याच्या वर्गात एक नवीन मुलगा आला. त्याचे नाव रहीम. रामचे त्या विषारी शिक्षकाशी खटके उडत. रहीमला कौतुक वाटे. रहीम व राम मित्र झाले. ते दोघे बागेत फिरावयास जात. त्या बागेत अनेक प्रकारची फुले फुललेली पाहून दोघा निर्मळ मित्रांस आनंद होई. त्यांचे संवाद चालत.

रहीम : राम, निरनिराळी फुले बगीच्यात फुललेली आहेत. त्यांचे भांडण नाही.

राम : या हिंदुस्थानात नाना धर्म, नाना जाती प्रेमाने फुलतील, एकमेकांस शोभा देतील.

रहीम : परंतु काही मुसलमान हिंदुस्थानच्या बाहेर पडतात.

« PreviousChapter ListNext »