Bookstruck

पहिले पुस्तक 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक अत्यंत गरीब मुलगा होता. तो गरीब होता तरी त्याला शिकण्याची फार इच्छा होती. एक दिवस तो एका शेजारच्या मुलाजवळ खेळत होता. त्या मुलास तो म्हणाला, ''मला जर तू अक्षरे वाचावयास शिकवशील तर सहा अक्षरांस एक बैदुल याप्रमाणे मी तुला देईन.'' तो मुलगा तयार झाला. परंतु पुस्तकाची पंचाईत आली. तो गरीब मुलगा पुन्हा म्हणाला, ''पुस्तकाची व्यवस्था मी करतो.'' पुष्कळ प्रयत्न करूनही त्या मुलास पुस्तक मिळाले नाही. शेवटी त्याच्या कल्पक मेंदूने एक युक्ती शोधून काढली. मनुष्य मेल्यावर त्यास पुरतात व त्याच्या शवावर दगड ठेवतात व त्यावर त्या मृत माणसाचे नाव, जन्म, मृत्यू वगैरे लिहिलेले असते. तो गरीब मुलगा त्या शेजारच्या मुलास म्हणाला, ''चल रे, त्या कबरस्थानात कितीतरी पुस्तके आहेत. तेथे येऊन तू मला शिकव.'' त्या मुलाच्या लक्षात काही येईना. कबरस्थानात पुस्तके कोठून येणार? शेवटी ते दोघे प्रत्यक्ष कबरस्थानात गेले. त्या गरीब मुलाने त्या दगडावरील अक्षरे स्वतःस शिकवावयास त्यास सांगितले. त्या मुलाच्या लक्षात आता सर्व आले त्याने ती अक्षरे त्याला वाचावयास शिकविली. रोज तेथे येऊन तो ती दगडी पुस्तके वाची. हळूहळू तो वाचावयास शिकला.

नंतर तो एका अनाथ शाळागृहात गेला. गुरूजींनी विचारले, ''तुला वाचता येते का?'' ''होय'' असे म्हणून आपण वाचावयास कसे शिकलो हे त्याने सांगितले. गुरूजींस ते खरे वाटेना, परंतु इतर मुलांनी ''हे खरे आहे'' असे सांगितले. गुरूजी त्या मुलास म्हणाले, ''या पुस्तकातील ही प्रार्थना वाच. जर वाचशील तर हे सुंदर पुस्तक तुला बक्षीस देईन.

नम्रपणे तो गरीब मुलगा उभा राहिला व त्याने ती प्रार्थना वाचली. ते पुस्तक बक्षीस मिळाल्यावर त्याच्या चिमुकल्या हृदयास किती बरे खराखुरा आनंद झाला असेल! सारांश, दृढ इच्छेस उपाय हा असतोच.

« PreviousChapter ListNext »