Bookstruck

मरीआईची कहाणी 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. पाच सुना; दोन्ही लेकी सासरी सुखाने नांदल्या सवरल्या. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही. रोग नाही, राई नाही. कशाचा म्हणून उपद्रव नाही. सारे लोक सुखी होते. पण होता होता काय झाले, एकदा आखाडाचा महिना आला. झिमझिम पाऊस पडू लागला. शेते हिरवीगार दिसू लागली. गायीगुरांना चारा झाला; दूधदुभत्याची चंगळ झाली. शेतातील कामे संपली; सासुरवाशिणी माहेरपणाला माहेरी आल्या. आईबापांना आनंद झाला. माझी नव्या नवसाची, भरल्या चुडयाची बाबी आली, तिला कोठे ठेवू असे झाले. रोज नवी नवी पक्वान्ने होऊ लागली. नगरात आनंदीआनंद होता. खाण्यापिण्यात ताळतंत्र राहिले नाही.

इकडे काय झाले? मरीआई देवीने हे सारे पाहिले. तिने मनात विचार केला, राजाच्या राज्यात जावे. लगबगा उठली. तिने कुंकवाचा मळवट भरला, केस मोकळे सोडले नि अनवाणी चालत निघाली. नगराच्या वेशीपाशी आली आणि तिने आत डोकावून पाहिले. तिला मोठा आनंद झाला. नगरात ती शिरली. तिचे रूप कसे होते? गाल बसलेले, डोळे खोल गेलेले, तोंड पांढरे फटफटीत व हाडांचा सांगाडा; फाटकेतुटके वस्त्र नेसलेली अशी ती होती.

मरीआई रस्तोरस्ती फिरू लागली. प्रत्येक घरात डोकावून पाही. घाण दिसली, की शिरली तेथे, मरीआईची कृपा पुष्कळांवर होऊ लागली. लोक पटापट मरू लागले, मोठा कहर गुदरला. रोज पाचपन्नास माणसे मरू लागली. वार्ता राजाच्या कानी गेली. राजाला फार वाईट वाटले; माझी प्रजा कोण का मारते? मी कधी कुणाचे वाईट केले नाही. देवाच्या सेवेत अंतर केले नाही; गोरगरिबांना नाडले नाही; कर वाटेल तसे घेतले नाहीत. मग देवाचा माझ्या राज्यावर कोप का? राजा दुःखी झाला, त्याला खाणेपिणे रुचेना, सुखविलास सुचेना. अनन्यभावाने देवाला शरण गेला व म्हणाला, ''देवा नारायणा, शेषशायी भगवाना, चुकले-माकले क्षमा कर. माझी प्रजा सुखी कर.''

राजाच्या स्वप्नात देवाने दृष्टान्त दिला. ''राजा, राजा, उठ, अरे, निजतोस काय? तुझ्या नगरात मरीआईचा फेरा आला ना? तिला नगराच्या बाहेर घालव. ती उद्या राजवाडयाकडे येणार आहे. तिच्या स्वागताची तयारी ठेव.''

राजा उठला. मरीआईच्या स्वागताची त्याने तयारी केली. सर्व राजवाडा झाडूनझुडून स्वच्छ केला होता; कण्या-रांगोळया घातल्या होत्या; धूपदीप लावले होते; चंदनाचे सडे घातले होते. घाणीचे कोठे नाव नव्हते. उंची उंची आसने मांडून राजा मरीआईची वाट पाहात बसला.

मरीआई त्या दिवशी लवकर उठली व राजवाडयाकडे जाऊ लागली. परंतु राजवाडयातील स्वच्छता पाहून ती दुःखीकष्टी झाली. राजाने मोठया मानाने तिला सिंहासनावर बसविले. राजा म्हणाला, ''आई, आपण दुःखीकष्टी का? सेवेत काय न्यून आहे?'' मरीआई म्हणाली, ''काय सांगू? राजा, मला तुझ्या राज्यात फारसे खायला मिळाले नाही.'' राजा म्हणाला, ''आई, इतकी प्रजा बळी पडली तरी तू सुखी नाहीस?'' मरीआई म्हणाली, ''राजा, माझी भूक तुला माहीत नाही. मी जाते तेथे गावची पांढर (स्मशानातील राख) मात्र शिल्लक ठेवते. तुझ्या नगरात मला पोटभर खायले मिळाले नाही. मी उपाशी आहे.''

« PreviousChapter ListNext »