Bookstruck

सभाधीटपणा 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

फ्रान्स देशातला फोंतेन म्हणून एक गोष्टीलेखक होऊन गेला. त्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत, त्यांपैकी एक देतो.

पॅरिसमध्ये एक तरुण विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करीत होता. तो विद्वान होता, परंतु वक्तृत्व त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे स्वत:चे विद्वत्व व्याख्यानातून वगैरे त्यास दाखविता येत नसे. एकदा त्याचा बाप त्याला भेटण्यास आला त्याचा बाप त्याला म्हणाला, ''तुझ्या अंगात सभाधीटपणा आला पाहिजे. यासाठी तू अभ्यास करीत जा. शहराबाहेर बागेत, मळयात वगैरे जावे आणि तेथे मोठमोठयाने पाठ केलेले म्हणावे, अशा रीतीने आत्मविश्वास अंगी आला म्हणजे हू समाजात चांगलाच पुढे येशील.''

वडील निघून गेले; मुलगा बापाच्या सांगण्याप्रमाणे वागू लागला. तो रोज एका कोबीच्या मळयात जाई व तेथील कोबीच्या कांद्यासमोर मोठमोठयाने व्याख्यान देई, काही दिवस असे चालले. त्या तरुणास आता असे वाटले की, आपण मोठया सभेतही व्याख्यान देऊ शकू, तो एका बडया कॉलेजच्या अधिका-यास भेटला व आपले व्याख्यान ठरवा असे तो म्हणाला. कॉलेजच्या अधिका-यांनी ही विनंती मान्य केली. दिवस  ठरला, सर्व तयारी झाली, सभागृह भरून गेले, मोठमोठे प्रोफेसर तेथे आले होते, ठरल्या वेळी आपला हा तरुण व्याख्यान देण्यासाठी उभा राहिला, परंतु तो चारपाच वाक्ये जेमतेम बोलला आणि गडबडला, शेवटी तो म्हणाला, ''कोबीच्या बागेत कोबीच्या कांद्यास विद्वान श्रोते समजून मी व्याख्याने देऊ शकतो; परंतु या सभेत विद्वान श्रोत्यांस कोबीचे कांदे समजून मला व्याख्यान देण्यास धीर येत नाही.'' असे बोलून तो तरुण लज्जेने खाली बसला.

मुलानो, सभाधीटपणा अंगी पाहिजे. त्याशिवाय आपणास पदोपदी अडचणी भासतील, तो जन्मतःच अंगी नसेल तर अंगी आणा, परंतु कोबीच्या बागेत अभ्यास न करता सभातूनच बोलण्याचा प्रयत्न व्हावा.

« PreviousChapter List