Bookstruck

मेंग चियांग 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्या लहानशा देवळात ती बसली. देवासमोर अश्रू ढाळित बसली, ''देवा, अश्रूंनी तुझे मंदिर मलिन करित आहे म्हणून रागावू नको. मुलीला क्षमा कर. मी दुर्दैवी आहे. थंडीवा-यात तुझ्या पायी निवारा; उबारा.''

तेथे जागा झाडून दात शिवशिवत ती झोपली. कोठली झोप? तिच्या फाटक्या वस्त्रांतून वारा घुसत ओता. ती गारठली. आकाशात अष्टमीचा चंद्र मावळत होता. ती देवाला म्हणाली, ''देवा, माझ्या पतीला स्वप्न पाड. मी गरम कपडे घेऊन येत आहे. सांग, त्याला धीर येईल. माझ्या दया कर. वीस वर्षेहि माझ्या वयाला नाहीत! लहान मी. परंतु जाईन त्याला शोधीत.''

गालांवरून अश्रु घळघळले. ती पुन्हा जुडी करून पडली. स्वप्नात अस्थिपंजर पतीला ती बघते.

''कशाला तू आलीस?'' तो म्हणतो.

''नाथ, या, या,'' असे म्हणत त्याला ती हृदयाशीं धरू बघते, तुम्हांला ऊब देतें म्हणते.

बाहेर सों, सों वारा करतो. तिला जाग येते. अनंत तारे चमचम करीत असतात. सभोवती पृथ्वी धुक्यांत वेढलेली. हे स्वप्न दुर्दैवाचे सूचक का? तो नाही भेटणार?

तो स्वप्नात म्हणाला, ''माझी मूठभर हाडे, माझी माती, हीच तुझ्या अनंत श्रमांची भरपाई, दुसरे काय  तुला मिळणार?''

माझे विचार भरकटत गेले असतील. ते स्वप्न प्रचंड नद्या नि उंच पर्वत यांवरून येत होते. त्यामुळे ते अस्ताव्यस्त झाले असावे. मी का त्याला मातीच्या खाली पाहीन? हे का माझ्या नशिबी असेल? निदान त्याच्याजवळ मीहि पडेन. हें का कमी?

उजाडले. धुके पडून सारे ओलसर आहे. कावळे हिंडू फिरू लागले. देवाला नमस्कारून ती निघाली. हृदयांत आशा-निराशा. म्हणाली, ''किती संकटे असोत, कष्ट असोत, पतिपत्नीचे ऐक्य - त्याची कसोटी आहे.''

दंवाने तिचे वक्ष:स्थळ ओले झाले आहे आणि अश्रुंनीही. कठोर वारा तिला मिठी मारीत आहे. ती थरथरत आहे. पतीला हांक मारून म्हणते, ''कोठल्या बाजूला वळू, कोठें तुला पाहूं? कधी पुन्हा माझ्या केसांत फुलें घालशील? माझ्या कानांत कर्णफुलें घालशील? आपण रात्री चांदण्यांत फुलबागेत सारंगी वाजवित होतों. उत्तरेच्या भिंतीकडे मी येत आहे. भेटशील का? पुन्हा घरी जाऊन आपण सायंकाळचे जेवण करू का? जिन्यांतून दोघे बरोबर जाऊं का? नाथ, पूर्वजन्मी आपले काय पाप घडले कीं हें भोगायला लागावें? तळवे फाटले रे. सुकलेल्या फुलागत माझी दशा.'' वाटेंत कधी प्रचंड जंगले, प्रचंड वाळवंटे, प्रचंड नद्या, प्रचंड दर्या. कधी रस्ता नसे. कधी चार पावलें उमटलेलीं दिसत. कधीं झोपडी आढळे. कुत्रा भुंके. कोंबडा आरवतांना कानावर येई. कधी रस्त्यांत खानावळ लागे. तेथे चार घांस खाई. तिच्याकडून बघून खानावळवाला म्हणे, ''थोरा मोठयांची दिसते. दृष्टीत दु:ख आहे. परंतु किती सुंदर आहे ही नाही?''

« PreviousChapter ListNext »