Bookstruck

आशा आणि समीर 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आशा बोलत नसे. ती समीरला धुंडीत हिंडे फिरे. रानात जाई. ती मोळी घेऊन येई. विकी. दोन घास खाई. उरलेला वेळ पतीला शोधण्यात दवडी. समीर, समीर ती हाका मारी. परंतु धों धों करणारा वारा उत्तर देई. कधी उन्हातून ती हिंडे. पाय चटपट भाजायचे. परंतु तिला शुध्द नसे. काटयांतून जायची, तिला शुध्द नसे. प्रेमाच्या प्रकाशात तिला काटे दिसत नसत, दगड टुपत नसत. प्रेमाच्या प्रकाशात अंधारहि तिला प्रकाशमय वाटे. असा कसा समीर? कोठे गेला तो? अपघात तर नाही ना झाला? डोहात नाही ना बुडाला, दरीत नाही ना पडला, श्वापदाने नाही ना त्याला खाल्ले? आशाच्या मनात शत शंका येत. परंतु तिचे मन म्हणे, ''समीर सुरक्षित आहे. तो येईल.''

समीर त्या दिवशी भटकत गेला. कोठे जातो त्याला कळेना. आणि एका भेसुर गावात आला. ती पृथ्वी होती का ते पाताळ होते? कोणाची ती दुनिया, कोणता लोक? तेथे नाना पशु होते, नाना प्राणी. उंदीर, घुशी, सरडे, साप, विंचू, वाघ, लांडगे, कोल्हे - नाना प्रकार. समीरच्या भोवती ही गर्दी. त्याला कोणी चावत नव्हते. जो तो त्याला ओढू बघे. काय आहे हे सारे? कोठून आली ही मानवेतर दुनिया? कोठले साप नि सरडे, उंदीर नि घुशी?

''आम्ही तुझीच रूपें. तुझ्याच नाना वासना येथे आम्ही तुझ्यासमोर मूर्त झालो आहोत. तुझीच ही अंत:सृष्टी. आम्हांला दूर नको लोटू - नावे नको ठेऊं. डोळे नको मिटून घेऊ. अरे तुझीच आम्ही रूपे, तुझीच,'' असे उंदीर, घुशी, कोल्ही, कुत्री त्याला म्हणत. त्यांचा पिच्छा ती पुरवीत. तो जिकडे जाईल तिकडे ती येत. कशी सुटका व्हायची?

परंतु तो मुक्त झाला. एके दिवशी ते सारे जंगल दूर झाले. तो खिन्न होता. कोठे आलो तेहि कळेना. आपण म्हातारे झालो असे त्याला वाटले.

तो समोर त्याला समुद्र दिसतो.
तेथे एक गलबत असते. गलबतात कोणीतरी असतात.

''कोठे जाते गलबत?''

''वेडयाच्या गावाला''

''मी येऊ?''

''ये.''

तो गलबतात चढला. वारा अनुकूल होता. बाणाप्रमाणे गलबत चालले. वेडयांची नगरी आली. तेथे सारे वेडे. समीर त्यांना पाहून घाबरला.

« PreviousChapter ListNext »