Bookstruck

आशा आणि समीर 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आशा भटकून दमली. गावातील लोकांची बोलणी ऐकायला न यावीत म्हणून रानात झोपडी घालून ती राहिली. तेथे दिनरात चरक्यावर ती सूत कातीत बसे. तो येईल, येईल, असे म्हणे. ते सूत ती विकी नि दोन घास खाई.

ती आता आंधळी झाली होती. ती चरक्यावर गाणे गात काठी टेकीत गावात जाई. नि सूत विकी. ती वृध्द झाली. तरी तिची श्रध्दा वृध्द झाली नव्हती. आणि समीर झोंपडीच्या दारात येऊन उभा होता.

आशा गीत गात होती, ''येईल, माझा समीर येईल. कोठे अडचणीत सापडला माझा समीर? जग त्याला वाईट म्हणे. वेडे आंधळे जग. समीरसारखा सुंदर कोण आहे? त्याच्या सारखा चांगला कोण आहे? ये, समीर ये. फुलांच्या सुगंधाबरोबर ये. वा-याच्या झुळकेबरोबर ये. पाखरांच्या किलबिलीबरोबर ये, सूर्यचंद्राच्या किरणांबरोबर ये. पर्जनधारांबरोबर ये, वसंत ऋतूच्या बहराबरोबर ये. शहर ऋतूंतील शांत वैभवाबरोबर ये. ये समीर ये.''

''आशा, हा बघ समीर समीर आला आहे.''

''ये. दमला असशील समीर. ये. या माझ्या मांडीवर नीज.''
तो तिच्या मांडीवर डोके ठेवतो. तिचे आंधळे डोळे प्रेमाने त्याच्याकडे बघतात. आनंदाश्रु घळघळतात.

''आशा तुला वाईट वाटले?''
''नाही रे राजा, हे आनंदाचे अश्रु.''
''मी वाईट, तुला टाकून गेलो.''
''असे नको म्हणू, तू किती चांगला, तू दमला आहेस नीज.''
''मी तुला अजून चांगला दिसतो?''
''अजून म्हणजे?''
''कोठे आहे मी चांगला?''
''माझ्या आशेत, माझ्या स्वप्नांत, माझ्या श्रध्देत तू नेहमी सुंदर नि चांगलाच दिसतोस. नीज, तुला गाणे म्हणते.''
समीर झोपला, ती का चिरनिद्रा होती?
आशा गाणे म्हणत बसली होती. तिच्या श्रध्देच्या डोळयांना सारे 'सत्य, शिव सुदरं'च दिसत होते!

इब्सेनचे 'पीर जिंट' स्मरून

« PreviousChapter ListNext »