Bookstruck

देवाचे हेतु 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''काही नको. उगीच उशीर होईल. गळ घालतील, रहा म्हणतील. चला निघू.''
''ठीक तर.''
परंतु निघताना तेथे जो चांदीचा गडवा होता व पाणी पिण्याचे फूलपात्र होते, ती तरुणाने आपल्या झोळीत घातली.

''हे काय करतोस?'' साधूने विचारले,
''तुम्हांला कळत नाही. चला'' तो म्हणाला.

दोघे निघाले. रस्त्याने जात होते. कोणी बोलत नव्हते. त्या तरुणाची साधूला थोडी भीती वाटू लागली. पुन्हा चालता चालता सायंकाळ झाली. एक गाव दिसला. त्या गावात दोघे शिरले.

''येथे कोठे आधार मिळेल का?'' साधूने विचारले.

''त्या पलीकडच्या वाडयात जा तेथे तुमचे स्वागत होईल,'' लोक म्हणाले.
ते वाटसरू त्या मोठया हवेलीजवळ आले. मुलाला खेळवीत एक म्हातारा तेथे बसला होता.

''यावे महाराज. बसा. हा बघा तुमच्याकडे बघत आहे एवढासा आहे पण सारे त्याला कळते. अहो इतके दिवस मूलबाळ नव्हते. देवाच्या दयेने आता झाले. बघा ऐकतो आहे लबाड,'' मालकाची टकळी सुरू झाली. रात्री चारी ठाव जेवण सुरू झाले. मऊ गाद्यांवर दोघे पहुडले. रात्र केव्हांच संपली. परंतु अजून सृष्टी झोपेत होती. तो साधु नि तो तरुण उठले.

''चला जाऊ'' तरुण म्हणाला.
''आभार नाही मानायचे?''
''उगीच घोळ घालतील. चला जाऊ.''
''ठीक तर.''

परंतु त्या तरुणाने काय केले. आत पाळण्यात मूल निजले होते, तेथे जाऊन त्याने मुलाचा गळा एकदम दाबला. मुलाचा प्राण गेला.

''अरे काय करतोस?'' साधु म्हणाला.
''तुम्हाला कळत नाही,'' तरुण म्हणाला.

« PreviousChapter ListNext »