Bookstruck

देवाचे हेतु 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''तो मालक मोठा कंजूष. आजपर्यंत त्याने कधी कोणाला आश्रय दिला नव्हता. परंतु, आपणाला मध्यरात्रीला त्याने घरात घेतले. फाटके तुटके का होईना आंथरापांघरायला, नेसायला दिले. सकाळी उठल्यावर त्या चिंध्यांच्याजवळ जेव्हा ते चांदीचे भांडे तो पाहिल तेव्हा म्हणेल, 'मी यांना फाटक्या चिंध्या दिल्या तर चांदीचे भांडे मिळाले. मग त्यांना अधिक चांगल्या रीतीने वागविले असते तर?' तो मनुष्य आता उदार होऊ लागेल. त्याच्या जीवनात क्रांति होईल. माझ्या वागण्याचा कळला अर्थ?''
''हो. परंतु नंतरच्या त्या वाडयात तुम्ही चांदीची भांडी चोरलीत.''

''त्याचाहि अर्थ ऐक. त्या माणसाला आपले ऐश्वर्य दाखवावयाची फार हौस. आता त्या गोष्टीला जरा आळा बसेल. थोडा विवेक येईल त्याच्या जीवनात.''

''आणि त्या बालकाचा गळा का दाबलात?''

''मूल होण्यापूर्वी तो मनुष्य देवाचे स्मरण करायचा, लोकांच्यामध्ये मिसळायचा. परंतु मूल झाल्यावर ते मूल म्हणजे सारे त्रिभुवन त्याला वाटू लागले. त्या माणसाचा विकास थांबला. मुलाची देणगी देवाने त्याला दिली परंतु त्याने त्याचा अध:पात होऊ लागला म्हणून ती देणगी देवाने परत नेली.''

''आणि नदीवरचा पूल दाखवायला जो आला, त्याला तुम्ही नदीत का लोटलेत?''

''अरे आपल्या धन्याचा आज तो खून करणार होता!''

''देवदूता, देवाचे हेतु कोणाला कळणार? आम्ही क्षुद्रदृष्टि लोक.''

''या विश्वाच्या अनंत रचनेत कोठे काय हवे याचा तुम्हांला पत्ता कसा लागणार? म्हणून संशयी न होता शेवटी सारे चांगल्यासाठीच ती विश्वशक्ति करीत असेल असे मनात धरून आपापली कर्तव्ये तुम्ही करीत रहा. अच्छा'' तो म्हणाला.

''नमस्ते'' साधु म्हणाला.

देवदूत अदृश्य झाला. साधु पुन्हा त्या पूर्वीच्या वनात प्रभूंचे नामस्मरण करीत शांतीने राहू लागला.

आमची गोष्ट सरे, पोट तुमचे भरे.

« PreviousChapter ListNext »