Bookstruck

* शहाणा झालेला राजपुत्र 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''कोण रे तूं, कुठला? रानावनांत एकटा कां?'' राजपुत्राने विचारलें.

''मला तुमचा भाऊ होऊ दे'' तो म्हणाला.
''ठीक. काही हरकत नाही'' राजपुत्र म्हणाला.

तिघे चालू लागली तो आणखी एक तरुण धावत आला.
''तू रे कोण?'' राजपुत्राने विचारले.
''मला तुमचा भाऊ होऊ दे, नाही म्हणू नका'' तोहि म्हणाला.

राजपुत्राने त्यालाहि आपल्या बरोबर घेतले. ती चौघे जात होती. सर्वांना भुका लागल्या. दोन लाडू शिल्लक होते. एका सरोवराच्या काठी चौघे बसली. राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले. त्यातूनही दोन रत्नें निघाली. अर्धा अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला. सर्वांना ढेकर आला. आईचा हातचा लाडू, त्याने नाही तृप्ती व्हायची तर कशाने? जवळच एक शहर दिसत होते. प्रासादांचे, मंदिरांचे कळस दिसत होते.
राजपुत्र दोन भावांना म्हणाला, ''त्या राजधानीत जा. ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा. तेथे नोकर चाकर ठेवा. आणि हत्ती, घोडे विकत घ्या. घोडेस्वार तयार करा. मला सन्मानाने मिरवत नेण्यासाठी या.''

दोघे भाऊ त्या नगरींत गेले. दोन रत्नें त्यांनी विकली. त्याचेच दहा लाख रुपये मिळाले. दुसरी दोन विकावी  लागली नाहीत. त्यांनी राजवाडा खरेदिला. नोकर चाकर ठेवले. राजवाडा शृंगारला गेला. ठायी ठायी गालिचे होते. ठायी ठायी आसने. फुलांचे गुच्छ होते, पडदे सोडलेले होते. चांदी सोन्याची भांडी होती. त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले. आणि हत्ती सजविला. त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली.

राजपुत्राला आणायला घोडेस्वारांसह, त्या हत्तीसह ते दोघे भाऊ गेले. आली सारी मंडळी वनात. राजपुत्र अंबारीत बसला. बहीण एका पालखीत बसली. दोन भाऊ दोन उमद्या घोडयांवर बसले. मिरवणूक निघाली. शहरात आली. दुतर्फा लोक बघत होते. राजपुत्र राजवाडयात उतरला. तेथील जीवन सुरू झाले. त्या नगरीच्या राजाच्या कानावर वार्ता गेली.

राजाचा एक खुशमस्क-या होता. राजाने त्याला विचारले.
''कोण आला आहे राजपुत्र?''

''मी बातमी काढून आणतो'' तो म्हणाला.

« PreviousChapter ListNext »